विनाकारण ओला-उबेरची फेरी रद्द करताय? आता भरावा लागणार दंड! काय आहे शासन निर्णय?

    21-May-2025
Total Views |
 
Ola-Uber
 
मुंबई : विनाकारण ओला-उबेरची फेरी रद्द केल्यास आता चालकासह प्रवाशालाही दंड भरावा लागणार आहे. ओला, उबेरसारख्या सेवांसाठी सोमवार, २० मे रोजी राज्य सरकारच्या वतीने नवीन शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. यामुळे विनाकारण किंवा अनावश्यक फेरी रद्द करण्याच्या वृत्तीला आळा बसणार आहे.
 
या शासन निर्णयानुसार, अॅपवर फेरी स्विकारल्यानंतर चालकाने बुकिंग रद्द केल्यास एकूण भाड्याच्या १० टक्के किंवा १०० रुपये यापैकी जे कमी असेल तो दंड आकारला जाईल आणि अॅपवरील ग्राहकाच्या वापरकर्त्याच्या खात्यात जमा केला जाईल. तसेच अॅपवर फेरी बुक केल्यानंतर प्रवाशाने कोणत्याही कारणाशिवाय फेरी रद्द केल्यास एकूण भाड्याच्या ५ टक्के किंवा ५० रुपये जे कमी असेल तो दंड आकारण्यात येईल आणि तो चालकाच्या वापरकर्ता खात्यात जमा केला जाईल.
 
 
यासोबतच प्रवासाचे दर आणि अंतर निश्चित करण्याबाबतही या शासन आदेशात काही सूचना देण्यात आल्या आहेत. यानुसार, ऑटोरिक्षा किंवा कॅबकरिता प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने निश्चित केलेल दर आधार दर असतील. मीटर टॅक्सींना अन्यायकारक स्पर्धेचा सामना करावा लागू नये यासाठी मागणी कमी असलेल्या वेळेत देण्यात येणाऱ्या सूटीचा दर हा फेरीच्या दराच्या २५ टक्के इतका मर्यादित करण्यात यावा. जास्त मागणी असलेल्या वेळेत हे दर १.५ पटीपेक्षा जास्त नसावेत. तसेच किमान फेरीचे अंतर ३ कि.मी. असावे. चालकांना एकूण भाडे दराच्या किमान ८० टक्के रक्कम मिळावी, असे या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.