बधाई हो सरपंच साहब...

    22-Sep-2024
Total Views | 105
hockey player harmanpreet sing nomination award


भारतीय हॉकी संघाने सुरुवातीपासून या खेळात राज्य केले आहे. मात्र, भारतीय संघातील मोजक्याच खेळाडूंच्या नशीबात गोलांचे द्विशतक आले. त्यात सध्याचा भारतीय संघाचा कर्णधार हरमनप्रीतदेखील आहे. त्याच्या खेळातील योगदानाबद्दल त्याचे नामांकन आंतराष्ट्रीय पुरस्कारासाठी झाले आहे. या सरपंच्याच्या कामगिरीचा हा आढावा...

आपल्याला माहीत आहे का, की आपले हॉकीचे माजी कर्णधार दादा ध्यानचंद, थोरले बलबीर सिंग आणि विद्यमान कर्णधार हरमनप्रीत सिंग या आजी-माजी भारतीय हॉकीपटूंत सारखेपणा काय आहे? पहिले साम्य म्हणजे, त्या तिघांनीही अनेक ऑलिम्पिक पदके मिळवली आहेत आणि या तिघांच्याही खात्यात 200 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय गोल जमा आहेत. आंतरराष्ट्रीय हॉकीत 200 गोल करणे सहज सोप नसते. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद अर्थात दादांच्या नावावर, तीन गोल प्रतिसामना अशा सरासरीत 185 आंतरराष्ट्रीय सामन्यांत एकंदर 570 गोल आहेत. बलबीर सिंग यांनी चारच्या सरासरीत 61 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 246 गोल केले आहेत. त्या दोन दिग्गजांचा तो काळही असा होता की, जेव्हा हॉकी ही नैसर्गिक गवतावर, मातीवर खेळली जात असे. त्या मैदानांत चामड्याचे चेंडू म्हणजे ’लेदर बॉल’ वापरात होते. त्या चेंडूची गती आजच्यासारखी जास्त नव्हती. ते दोघे आपापल्या संघात फॉरवर्ड म्हणजेच आक्रमण फळीत खेळणारे, मैदानी-फिल्ड गोल करण्यात विख्यात हॉकीपटू होते. आजचा हरमनप्रीत हा डिफेंडर म्हणजेच बचावपटू असून, पेनल्टी कॉर्नरवर गोल डागणारा ड्रॅग-फ्लिकरही आहे. सप्टेंबर 2024च्या पहिल्या पंधरवड्यात आशियाई अजिंक्य चषक हॉकी स्पर्धेत, कोरियाविरुद्धच्या सामन्यात जेव्हा हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला, तेव्हा तो गोलांचे दुहेरी शतक नोंदवणारा तिसरा भारतीय हॉकीपटू ठरला. नेदरलँडचा पॉल लिजियंड, पाकिस्तानचा सोहेल अब्बास की जे ड्रॅग-फ्लिकर आहेत, त्यांच्या यादीत आता आपल्या सरपंचांचा समावेश झाला आहे.
 
ट्रॅक्टर गियर स्टिकचे हॉकी स्टिकमध्ये रूपांतर:

पंजाबातील अमृतसरच्या जंदियाला गुरु बस्ती येथील शेतकरी कुटुंबात, दि. 6 जानेवारी 1996 रोजी जन्मलेल्या हरमनप्रीतने, अनेकदा ट्रॅक्टरसारखी जड वाहने चालवली. शेतातील ट्रॅक्टरचे गिअर बदलण्याने त्याच्या हातांना मजबूती मिळाली. त्याचे हात बळकट झाले, ज्यामुळे त्याच्या शक्तिशाली ड्रॅग फ्लिकचा जणू मजबूत पाया रचला गेला. आपल्या गियर स्टिकचे हॉकी स्टिकमध्ये रूपांतर करणारा हा पंजाबी छोकरा, भारताचा सरपंच म्हणून आज ओळखला जात आहे.

आज ऑलिम्पिक खेळणारा हा सरपंच, आता एका निवडणुकीत उतरला आहे. कोणताही सरपंच निवडणूक रिंगणात उतरतो, ते ग्रामपंचायत स्तरावर. पण हा सरपंच आता आंतरराष्ट्रीय स्तरावर निवडणुकीच्या रिंगणात उतरला असून, आपणही त्याला मतदान करणार आहोत. दुसर्‍या एका पदासाठी त्याचा वरिष्ठ सहकारीदेखील असेल की, ज्यालाही आपण आपले मतदान करणार आहोत. होय ! हे सत्य आहे . फरक फक्त सरपंच शब्दाच्या अर्थाचा आहे. तो काय ते आपण या लेखात जाणून घेत आहोतच.

मराठी शब्दकोशातला सरपंचाचा अर्थसार, म्हणजे प्रमुख आणि पंच म्हणजे पाच, गावातीलग्रामपंचायतीच्या पाच निर्णयकर्त्यांचा अर्थ प्रमुख देतो. पण आपला हा सरपंच थोडा वेगळा आहे.

नुकत्याच चीनमधील आशियाई चषक हॉकी स्पर्धेत विजेत्या भारतीय हॉकी संघाचे कर्णधारपद भूषविणारा, तसेच त्याआधी झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने स्पेनचा पराभव करत कांस्य पदक पटकावले होते, त्या अशा भारतीय हॉकी संघाचा मुखिया-कर्णधार, ’पंजाब दी पुत्तर’ हरमनप्रीत सिंह हाच होता.

क्रीडाक्षेत्रात सरपंच : जे क्रीडाप्रेमी हॉकीचे सामने बघत-ऐकत असतील, त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली असेल की, क्रीडासमालोचक भारतीय हॉकी संघाचा मुखिया असलेला हरमनप्रीत सिंग याला ‘सरपंच’ म्हणून संबोधत असतात. क्रीडावार्ताहारांपासून ते अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सगळे हरमनप्रीतचा ‘सरपंच’ म्हणून उल्लेख करत असतात.

सरपंच म्हटले तर तुम्हाला हेच वाटेल की, हरमनप्रीत सिंग एखाद्या गावचा सरपंच असेल. मात्र, हरमनप्रीत सिंग हा कोणत्याही गावाचा सरपंच नाही, ना त्याचे आई-वडील एखाद्या गावाचे सरपंच आहेत. कर्णधार हादेखील संघाचा मुखिया असल्याने, आपण त्याला सरपंच म्हणू शकतो. हरमनप्रीत सिंग ज्या गावात राहतो, त्या गावाच्या सरपंच कुलविंदर कौर या आहेत. गेल्या पाच वर्षांपासून त्या गावाच्या सरपंच आहेत. आपल्या गावाचा सुपुत्र भारतीय संघाचा कर्णधार आहे. त्याने ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पदक जिंकून दिले आहे, याचा कुलविंदर कौर यांना सार्थ अभिमान आहे.

भारतीय क्रीडाविश्वात क्रीडासमालोचक म्हणून सुप्रसिद्ध असलेले सुनील तनेजा हे त्यांच्या पंजाबी धातणीच्या हिंदीत, वारंवार ’प्रभू बधाई हो’ अशी हरमनप्रीतला शाबासकी देत पुढे त्याच्या नावाऐवजी ’सरपंच साहब... ’ असे त्याला संबोधू लागले. त्यांचे ते संबोधन लोकांना एवढे भावले की, आयपीएलमधील क्रिकेटपटूंपासून सारेच हरमनप्रीतला ’सरपंच साहब’ म्हणू लागले. सुनील तनेजा ह्यांनी आयपीएल सामन्यांचे समालोचन करत असताना, क्रिकेट संघाच्या कर्णधाराला ‘सरपंच’ असे संबोधणे चालू केले होते. ’सरपंच साहब’ ही उपाधी हॉकी कप्तानालाही चपखल बसते. आपला संघ पॅरिसमध्ये होता, तेव्हा स्पर्धा संपेपर्यंत खेळाडूंना मोबाईल वापरावर, तसेच अन्य माध्यमांशी संपर्क साधण्यास नियमानुसार मनाई असल्याने, हरमनप्रीतलाही आपल्याला ‘सरपंच साहब’ म्हणून ओळखले जात आहे, याची कल्पना नव्हती. सामने संपल्यावर त्याला ते कळले.

22वा कर्णधार : वनवासी समाजाचे पाठीराखे आणि मुंडा या वनवासी समाजातील जयपाल सिंह मुंडा यांंनी, सन 1928 मध्ये भारतासाठी पहिले हॉकीचे कर्णधारपद भूषवले होते. नंतर 1932 मध्ये लाला शाह बुखारी हे कर्णधार होते. फाळणीच्या काळात सैयद लाला शाह बुखारी हे, पाकिस्तानचे राजदूत झाले होते. ध्यानचंद यांनी बर्लिनला नाईलाजास्तव कर्णधारपद स्वीकारले होते. असे एकेक कर्णधार होत 1956 मध्ये मेलबर्नला वरिष्ठ बलबीर सिंह, या कर्णधारांच्या नामावलीत काल-परवाच निवृत्त झालेला 2016 सालचा श्रीजेश, आज संघात कार्यरत असलेला 2020 सालचा कर्णधार मनजीत सिंह असे आजपर्यंतचे 21 कर्णधार भारतीय हॉकीने बघितले आहेत. आज आपण 2024 सालच्या पॅरिसपासून ते पद भूषविणारा, सरपंच अर्थात हरमनप्रीत सिंह हा 22वा कर्णधार अनुभवत आहोत.

आशियाई चॅम्पिअन : चीनमधील आशियाई चषक हॉकी स्पर्धेच्या विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग याला, स्पर्धेतील सर्वोत्तमखेळाडू म्हणूनही निवडण्यात आले आहे. भारताने आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत यापूर्वी 2023 मध्ये मलेशियाला हरवून, विजेतेपद पटकावले होते. भारतीय हॉकी संघ पुरुषांच्या आशियाई अजिंक्यपद हॉकी चषक स्पर्धेत, पाच विजेतेपदांसह सर्वात यशस्वी ठरला आहे. यानंतर पाकिस्तान तीन विजेतेपदांसह दुसर्‍या स्थानावर आहे. विशेष म्हणजे, आशियाई अजिंक्यपद हॉकी चषक 2018 सालचे विजेतेपद भारत आणि पाकिस्तान यांना विभागून देण्यात आले होते कारण, तो अंतिम सामना संततधार पावसामुळे रद्द करावा लागला होता. यावेळच्या आशियाई अजिंक्यपद हॉकी चषक स्पर्धेत भारताने सर्व म्हणजे पाचही सामने जिंकले असून, तो या स्पर्धेचा विजेता ठरला आहे. भारताकडून अंतिम सामन्यात पराभूत झालेला चीनचा संघ उपविजेता, कोरियाला नमवून पाकिस्तान तिसर्‍या, तर कोरिया चौथ्या स्थानावर राहिला. त्यानंतर मलेशिया आणि जपान यांचा क्रमांक लागतो.

पाकी प्रोत्साहन : चीन हा देश ऑलिम्पिक क्रीडाप्रकारांत सतत अग्रेसर असतो. जरी भारत हॉकीत चीनपेक्षा नेहमीच सरस असला, तरी चीनची जनता नेहमीच क्रीडाप्रेमीच राहिलेली आहे. भारतासारख्या बलाढ्य हॉकी संघाशी आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी, या स्पर्धेत प्रचंड गर्दी झाली होती. आधीचा सामना जरी चीनने गमावला असला, तरी आपण चीअर् अप केले, तर आपले खेळाडू चांगला खेळ करतील, हा उद्देश सफल करण्यासाठी चीनने पराकाष्ठा केली. पण शेवटी भारत वरचढच ठरला. हिरो आशियाई हॉकी करंडक 2024 स्पर्धेचे नियोजन, चीनमधील हुलुनबुर येथील मोरिंदावा या ऐतिहासिक व निसर्गरम्य शहरात केले होते. हजार एक वर्षे जुन्या हॉकीचा वारसा त्यांनी जतन केलेला आहे. स्थानिक समुदायाकडून स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद उल्लेखनीय होता. मोरिंदावा येथील स्टेडियमची क्षमता चार हजार असली तरी, भारत आणि चीन यांच्यातील अंतिम सामना पाहण्यासाठी तब्बल दहा हजार चाहते जमले होते. हा जबरदस्त पाठिंबा तेथील स्थानिक लोकांची खेळाविषयीची आवड अधोरेखित करतो. त्यामुळे सहभागी झालेल्या प्रत्येकासाठी हा खरोखरच संस्मरणीय अनुभव ठरला असेल. ‘आंतरराष्ट्रीय हॉकी संघटने’चे विद्यमान अध्यक्ष तय्यब इकराम यांनीही स्थानिकांच्या उत्साहाचे कौतुक केले आहे. आपल्याच देशात होणार्‍या स्पर्धेत, त्याच देशप्रेमी जनतेने आपल्याच संघातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात काहीच गैर नसते. पण जेव्हा अंतिम सामन्याच्या वेळी चीनचे झेंडे फडकावत पाकचा संघ सगळ्यांच्या नजरेत आला, तेव्हा सगळ्यांनाच ते खटकले. त्या चीनचे झेंडे फडकावत असलेल्या पाकिस्तानच्या संघाला समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले गेले. तर पाकिस्तान चीनधार्जिणा कसा आहे हे स्पष्ट होते.

हॉकी स्टार्स पुरस्कार: या लेखात वर आपण सरपंच निवडणुकीचा उल्लेख केला आहे. ती निवडणूक आपण सगळे समजावून घेत, त्यात सहभागी होणार आहोत. आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेने गेल्या मंगळवारीच एफ. आय. एच. हॉकी स्टार्स पुरस्कार 2024चे आयोजन केले आहे. ते पुरस्कार आपल्या खेळाडूंस मिळावे, म्हणून त्यांनी प्रत्येकाला मतदानाचे आवाहन केले आहे. दि. 11 ऑक्टोबरपर्यत त्यासाठी मतदान करता येणार आहे. भारताकडून नुकत्याच संन्यास घेतलेल्या भारतीय गोलरक्षक पीआर श्रीजेशचे पुरुष हॉकीत, ‘गोलकीपर ऑफ द ईयर’ या पुरस्कारासाठी एकूण पाचांपैकी एक निवडण्यास नामांकन मिळाले आहे. तर भारताच्या हरमनप्रीत सिंगला पुरुषांमध्ये ‘प्लेयर ऑफ द ईयर’ पुरस्कारासाठी नेदरलँड, जर्मनी आणि इंग्लंड यांबरोबर नामांकन दिले आहे. नामनिर्देशित व्यक्तींमधल्यांना आपल्या पसंतीचे मत नोंदवण्यासाठी राष्ट्रीय संघटना, त्यांच्या संबंधित राष्ट्रीय संघांचे कर्णधार व प्रशिक्षक, क्रीडाप्रेमी हॉकीचे चाहते, खेळाडू, प्रशिक्षक, अधिकारी आणि माध्यमे असे दि. 11 ऑक्टोबरपर्यंत आपले मत नोंदवू शकतात. एकूण निकालाच्या 40 टक्क्यांसाठी तज्ज्ञ पॅनेलची मते मोजली जातात. राष्ट्रीय संघटनेतील लोकांची संख्या 20 टक्के आहे. चाहते आणि इतर खेळाडू (20 टक्के), तसेच माध्यमे (20 टक्के), उर्वरित 40 टक्के असे ते साधारण गणित आहे. त्यात आपण समस्त क्रीडाप्रेमी हॉकीचे चाहते आणि खेळाडू वगैरे https://www.fih.hockey/events/hockey-stars/poll येथे मतदान करू शकतो. मतदान दि. 17 सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता सुरू झाले असून, ते दि. 11 ऑक्टोबरच्या रात्री 11.59 वाजेपर्यंत असणार आहे. त्यानंतर लगेचच मतदान संपल्यावर त्याचे विजेते घोषित केले जातील.

चला तर मग मतदानाला. आपल्याला दोन मते द्यायची आहेत. एक आपल्या गृहरक्षकाला आणि दुसरे आपल्या सरपंचाला. त्यांना विजयी करण्यासाठी मतदान करुन भारतीय हॉकीचा झेंडा जागतिक स्तरावर आपल्याला फडकावून दाखवायचा आहे अन् तसे केले तर आपण ’हर मन(के) प्रीत’ असलेल्याला पुन्हा एकदा म्हणू शकतो ’बधाई हो सरपंच साहब’.
इति।


श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
9422031704
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121