टिरा

    22-Jun-2025
Total Views | 94

बालनाट्याचे अप्रूप सर्वांनाच असते. लहान-लहान कलाकार मोठाली वाक्ये लक्षात काय ठेवतात आणि सादरीकरणही उत्तम करतात. यामागे त्यांची मेहनत असते. या नाटकांमधून ते जीवनावश्यक मूल्येही शिकतात. नाटकांमधून कोणी काय काय शिकले आणि नाटकामुळे काय बदल घडला, याचा बालकलाकारांकडून घेतलेला आढावा...

आफ्रिकेतल्या एका पांढरपेशा झेब्राच्या बाळाची कहाणी म्हणजे टिरा. आजही टिरा आफ्रिकेच्या जंगलात आहे. तिच्यावर बालनाट्य लिहावेसे वाटले. लॉकडाऊनमध्ये लिहिलेले हे नाटक. तेव्हा याचे अनेक प्रयोग ऑनलाईन आणि ऑफलाईन पुण्यात केले. न्यूनगंड वाटणार्‍या टिराची ही कहाणी आहे. तिच्या सामान्य न दिसण्यामुळे ती जंगलाचे आकर्षण ठरली, पण तिच्या या असाधारण दिसण्यामुळे झेब्रांच्या कळपात तिला स्वीकारले गेले असेल का? की ती उपहासास पात्र ठरली असेल? तिच्या अशक्त आणि दुबळ्या दिसण्यावरून, तिच्या मानसिक आणि बौद्धिक कुवतीचे निकष काढले असतील का?

दिसणे हेच सर्व काही नसते, जन्मतः कोणीच वाईट नसते. त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. त्या जीवाची पण काही बाजू असू शकते. आपल्याच समाजातला भाग म्हणून त्याला आपण स्वीकारले पाहिजे, त्यालाही समजून घेतले पाहिजे. टिराला नेमके काय वाटते? तिचा प्रवास संघर्षाचा होता का? ती तिच्या कळपात स्वतःसाठी स्थान मिळवू शकली का? ही तिची कहाणी आहे. बालनाट्याच्या माध्यमातून मुलांमध्ये ‘स्वीकृती आणि सामंजस्याची’ भावना जागृत करणारे हे नाटक.

आज माझे तीन बालकलाकार तुमच्या भेटीस घेऊन येत आहे. या तिघीही गेली दोन वर्षे नाटकाचे प्रशिक्षण घेत आहेत. या मुलींनी ‘टिरा’ या बालनाट्यात विविध भूमिका साकारल्या असून, राशी बिडकर, वयवर्षे ११, हिने टिराची भूमिका केली. रेवा पोटभरे, वयवर्षे नऊ हिने क्वीन झुलीया म्हणजेच टिराच्या आईची भूमिका केली, तर प्रिस्का डिमॉन्ति वयवर्षे १२ हिने फोटोग्राफर ऋताची भूमिका केली. प्रत्येक कलाकाराचे नाट्य प्रशिक्षण घेताना आणि सादर करताना स्वतःचे अनुभव असतात, ते त्या इथे मांडणार आहेत. हा लेख म्हणजे विद्यार्थी आणि माझ्यामधला संवाद आहे. लिहिताना मी त्यांच्याच शब्दात व्यक्त केला आहे.

टिरा नाटक करायचे ठरल्यावर तुम्हाला कसे वाटले. नाटक तुम्हाला आवडले का?

राशी : मला नाटक खूपच आवडले आणि असेही वाटले की, ही तर माझीच कहाणी आहे. मला असेही वाटले की, टिराचा रोल मलाच मिळणार आहे. कारण, मी आहे ११ वर्षांची, पण मला सगळे म्हणतात की, तू खूपच लहान वाटते. मला अनेकदा त्याबद्दल वाईट वाटले आहे. मी कुठे बोलून दाखवले नाही पण, तुला म्हणून सांगते. पण, आता मला त्याचे काहीच वाटत नाही, मी आहे तशी सुंदर आहे. तू पण मला म्हणालीस की, तू छान आहेस. ही गोष्ट माझ्या मनात घर करून बसली.

रेवा : तुला तर माहितीच आहे, मला नाटक किती आवडते. नाटक ऐकल्यावर मला लक्षात आले की, मुख्य भूमिका मला नाही मिळणार कारण, मी दुबळी, हतबल, निराश अशी वाटत नाही. मला खूप वाईट वाटले की, तशी का नाही दिसत. दिसत असते, तर मला मुख्य भूमिका मिळाली असती.

प्रिस्का : मला नाटक आवडले, सगळ्यांना समान काम होते. असे नव्हते की, टिरालाच काम आहे. पण, आपण वेशभूषा कशी करणार, खूप मोठे आहे नाटक, करू शकू का आपण? असे मला खूप प्रश्न होते

तुम्हाला जेव्हा सांगितले की, तुम्हाला ही भूमिका करायची आहे, तेव्हा तुम्हाला कसे वाटले?

राशी : मला तर खूपच आनंद झाला. कारण, मला कधी मध्यवर्ती भूमिका करायला मिळालीच नाही. पण, सगळेच मला पाण्यात पाहत होते. रॅडी, मला जमणार नाही असेच ते मला म्हणत आहेत,असे त्यांच्या डोळ्यात मला स्पष्ट दिसत होते आणि ते चुकीचेही नव्हते. कारण, सुरुवातीला माझा आवाजच निघत नव्हता. कार्तिक म्हणालासुद्धा तुझा आवाज उंदरासारखा येतो आहे, तू झेब्रा आहेस लक्षात ठेव. मला त्याच्या बोलण्याचे वाईट वाटायला हवे होते पण, नाही वाटले. मी गप्प राहिले आणि त्याला एक दिवस मोठा आवाज काढून दाखवीन असे ठरवले.

रेवा : मी टिरा नाही झाले पण, क्वीन झुलीया झाले. जे होते ते चांगल्यासाठीच. मला तसेही नेता व्हायला आवडते. इतर वेळेला माझे कोणी ऐकत नाही पण, नाटकात इतरांना ऐकावेच लागत होते. मला मज्जा आली.

प्रिस्का : मला फोटो काढायला आवडते. पण, जंगली प्राण्यांची फोटोग्राफर होणे काय असते? हे मला ऋताची भूमिका साकारताना समजले. यानिमित्ताने मी युट्यूबवर बरेच व्हिडिओ पाहिले. ते चालतात कसे, त्यांचे कपडे कसे असतात. माझ्या ताईने माझे स्टायलिंग करून दिले. मोठ्या बहिणीची कधीतरी चांगली मदत झाली.

अनेक दिवस नाटकाच्या तालमी होत्या. सगळीच मुलं मेहनत करत होते. एकंदर नाटकाचा प्रवास कसा होता? तुम्हाला असे वाटते का की, हे नाटकात नको होते. हे असते, तर जास्त चांगले झाले असते?

राशी : नाटकाच्या तालमीत जेवढी मजा येते ना, तेवढी प्रयोग करतानाही येत नाही. कारण, तालीम खूप दिवस चालते आणि आम्ही हळूहळू शिकत असतो. नाटक एकदाच सादर होते आणि थांबते, तर ते मला आवडत नाही. मला शनायाबरोबर थोडा प्रॉब्लेम होता कारण, ती वाय विसरायची आणि मग सगळेच विसरायचे. मग त्यात वेळ खूप जायचा. मला थोडे टेंशन आले होते. कारण, नाटक एक तासाचे होत होते आणि तुला हवे होते ४५ मिनिटांत संपायला. मला अशयच वाटत होते.

रेवा : मला ही असे वाटायचे की, एक तासाचे झाले, तर नाटक कंटाळवाणे वाटू शकते. पण, मग आपण ४५ मिनिटांवर आणले. मला वाटते सगळ्यांचाच आत्मविश्वास वाढल्यामुळे तसे झाले असावे. मला नाही वाटत की आमच्यापैकी कोणालाच असे वाटले की, आमचे नाटक कोणाला आवडणार नाही. सगळ्यांना आवडणारच! असेच सतत वाटले आहे.

प्रिस्का : मला वाटते आपण सगळ्यांनी मिळून ठरवले की, आपल्याला कसेही करून करायचेच आहे. मला असेही वाटायचे की, माझ्यामुळे पण नाटक स्लो होत आहे आणि इंद्राक्षी मला सारखे बोलावून काय काय सांगायची जे मला अजिबात आवडायचे नाही. तू तुझे बघ, मी माझे बघते. पण, इंद्राक्षी आपले डायलॉग्स व्यवस्थित घ्यायची आणि तिचे लक्षही खूप असायचे आणि तिचे काम खूप छान झाले. मग मी तिच्याकडून या गोष्टी शिकले.

एक संघ म्हणून तुम्हाला काम करायला त्रास झाला का?

राशी : राजनंदिनीबरोबर मला प्रॉब्लेम होत होता. ती माझे काही ऐकायचीच नाही. प्रेमाने सांगा, रागावून सांगा. मग मी सांगणेच बंद केले. मग अचानक ती माझ्याशी चांगले बोलायला लागली. सगळ्यांनाच नाटक आपले वाटत होते. त्यामुळे पॉझिटिव्हिटी खूप होती.

रेवा : रावी आणि माझे सतत भांडण व्हायचे. तिलाही क्वीन झुलीयाचीच भूमिका करायची होती पण, ती तिला नाही मिळाली. तू म्हणालीस, झाडाच्या मागे जाऊन आम्हा दोघींना लपायचे आहे. तालमीत आपण शिडी वापरायचो. रावी सारखीच त्या शिडीच्या खुंटीशी खेळायची. मी कितीदा तिला सांगायचे की, त्या खुंटीला हात लावू नकोस, त्याचा आवाज होतो. पण, ती माझे ऐकायचीच नाही. शेवटी तू आम्हा दोघींना वेगवेगळ्या झाडाखाली लपायला सांगितले. मग आम्ही ठरवले आपण दोघी शहाण्यासारख्या वागू म्हणून. बाकी मज्जाच यायची.

प्रिस्का : मला जे तू जास्तीचे काम दिले होतेस ना; काहींचा मेकअप करायचा, मग काही नेपथ्य हलवण्याचे काम ते मला खूप आवडले आणि सगळे माझे ऐकायचे, इंद्राक्षी सोडून. त्यामुळे आता तर आमचा आम्ही एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला आहे. रॅडी, कधी करते आहेस परत सुरू? आम्हा सगळ्यांना नाटकात काम करायची भूक लागली आहे.

वरील पाच मुद्द्यांवर मुलांचे म्हणणे वाचलेत. यानंतर मुलं वाय पाठ कशी करतात, याचे मजेदार किस्से, गुपित आणि आईबाबा लहान मुलांसारखे का वागतात, याचे मजेदार खुलासे, विनोदी प्रसंग, नाटक का करावे, नाटकाआधीचे आयुष्य आणि नाटकानंतरचे आयुष्य, प्रेक्षकांची मिळालेली दाद यांवर मुली मजेशीर बोलल्या आहेत. मुलांना बोलते करणे गरजेचे आहे आणि त्यांचे विचार महत्त्वाचे आहेत. जाणून घेऊया पुढील भागात.

रानी राधिका देशपांडे
reenaonstage@gmail.com
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121