
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ठाण्यातील ‘श्रीराम व्यायाम शाळा’ या क्रीडा, व्यायाम आणि संस्कार केंद्राला ९२ वर्षांचा प्रदीर्घ इतिहास आहे. ठाण्याचे मुख्य संघ केंद्रस्थान म्हणजे येथील छत्रपती शाखा आणि कार्यालय. ठाण्याच्या संघ स्वयंसेवकांच्या अनेक पिढ्यांच्या भावविश्वात या जागेचे एक वेगळे स्थान आहे. संघकार्य विस्तार आणि दृढीकरणाची संघाच्या पातळीवर आखण्यात आलेली उद्दिष्टे पार करण्याच्या प्रयत्नांचे एक प्रभावी केंद्र, या नात्याने ‘श्रीराम व्यायाम शाळा सेवा केंद्रा’ची नवी इमारत दिमाखात उभी राहिली आहे. तिच्या निर्मितीचा प्रवास मांडणारा हा लेख...ज्येष्ठ शुल तृतीया, संकष्टी चतुर्थी, युगाब्द ५१२७ शालिवाहन शक १९४७, म्हणजेच शनिवार, दि. १४ जून रोजी ठाण्यातील ‘श्रीराम व्यायाम शाळा सेवा संस्थे’च्या नूतन वास्तूमध्ये विधिवत श्रीगणेश पूजन आणि वास्तू प्रवेश सोहळा संपन्न झाला. त्याच दिवशी झालेल्या श्री गणेशपूजेच्या दर्शनाच्या निमित्ताने वास्तू पाहण्यासाठी सुमारे एक हजार, १००जणांचा संघमेळा जमला. औपचारिक उद्घाटनाचा कार्यक्रमही संपन्न झाला.
‘श्रीराम व्यायाम शाळा’ या क्रीडा, व्यायाम आणि संस्कार केंद्राला सुमारे ९२ वर्षांचा इतिहास आहे. ठाण्यातील क्रीडाप्रेमी स्व. विष्णु लक्ष्मण तथा आबा घाणेकर यांनी या स्थानी १९३२ साली व्यायामशाळा सुरू केली. विशेष म्हणजे, याच मैदानावर दि. २ फेब्रुवारी १९३४ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ठाण्यातील पहिली शाखा भरली. ज्येष्ठ प्रचारक स्व. दादाराव परमार्थ यांच्या प्रयत्नांमधून आणि उपस्थितीत अशा प्रकारे ठाण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम सुरू झाले. पुढे १९४२ साली येथे एका छोट्या कौलारू इमारतीची उभारणी होऊन संघाचे कार्यालय सुरू झाले. संघातील पूर्वापार प्रथेनुसार, येथे भरणारी शाखा ‘छत्रपती शाखा’ अशा नावाने ओळखली जाऊ लागली. पुढे क्रमाक्रमाने शहराच्या विविध भागांत शाखा सुरू झाल्या. मात्र, ठाण्याचे मुख्य संघ केंद्रस्थान छत्रपती शाखा आणि कार्यालय हेच राहत आले.
१९४२ या वर्षी ‘श्रीराम व्यायाम शाळा’ ही विश्वस्त संस्था (ट्रस्ट) निर्माण करण्यात आली आणि पुढे १९७२ साली पत्रे, कौले यांनी युक्त असलेल्या बैठ्या इमारतीचे एका नव्या भक्कम एकमजली वास्तूत रूपांतर करण्यात आले. ठाण्यातले आजही रम्य स्थान समजल्या जाणार्या मासुंदा तलावाचे सान्निध्य, खेळांसाठी विस्तीर्ण मैदान, सुमारे १५० ते २०० जण बसू शकतील असे सभागृह, ही छत्रपती संघ स्थानाची भौगोलिक वैशिष्ट्ये. मात्र, ठाण्याच्या संघ स्वयंसेवकांच्या अनेक पिढ्यांच्या भावविश्वात या जागेचे एक वेगळे, सांस्कृतिक शक्तिकेंद्राचे स्थान आहे. संघाचे काम विविध अंगांनी सामाजिक जीवनाच्या सर्व क्षेत्रांत वेगाने विस्तारत गेले. त्यातून संघ कार्यालय असलेल्या या ‘श्रीराम व्यायाम शाळे’ची नवी भव्य वास्तू (तिसरे पुनर्निर्माण) उभी व्हावी, याची आवश्यकता भासू लागली. वर्ष २०१६ पासून संघात त्या दृष्टीने पूर्वतयारीला प्रारंभ झाला. संघाचे तरुण कार्यकर्ते महेश भास्कर जोशी यांच्यावर नूतन वास्तूनिर्मितीच्या प्रकल्पाची जबाबदारी सोपविण्यात आली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली विश्वस्त संस्थेच्या पुनर्रचनेसह सर्व प्रकारच्या वैधानिक पूर्तता करून घेण्यास प्रारंभ झाला. समग्र विचारविनिमयाद्वारे नव्या वास्तूचा आराखडा २०१९ साली तयार करण्यात आला. मात्र, २०२० आणि २०२१ ही दोन वर्षे ‘कोरोना’ महासंसर्गाच्या संकटाने सगळाच सामाजिक व्यवहार ठप्प झाला. तो पुन्हा सुरू झाल्यानंतर रामनवमीच्या आधी एकच दिवस वास्तूच्या आराखड्याला पालिकेची मंजुरी प्राप्त झाली. त्यानंतर एप्रिल २०२३ साली जुन्या इमारतीच्या पाडकामाला प्रारंभ झाला. अक्षय तृतीया, दि. २२ एप्रिल २०२३ रोजी भूमिपूजन होऊन बांधकाम सुरू झाल्यानंतरच्या दोनच वर्षे कालावधीच्या आतच अक्षय तृतीया दि. ३० एप्रिल २०२५ रोजी ‘श्रीराम व्यायाम शाळा सेवा संस्थे’च्या नव्या, अत्यंत देखण्या, पाचमजली वास्तूचे बांधकाम पूर्णत्वाला गेले.
हा झाला या वास्तूनिर्मितीचा, सणावळीच्या परिभाषेतील इतिहास. मात्र, एकूणच या वास्तू उभारणी प्रकल्पाची काही ठळक वैशिष्ट्ये स्वतंत्रपणाने लक्षात घ्यायला हवीत.
संघ शाखेच्या विस्तीर्ण मैदानावर बिलकुल अतिक्रमण न करता सदर वास्तू उभारली गेली आहे. बांधकामाचे साहित्य (सिमेंट स्टील इलेट्रिकल उपकरणे नळजोडणी रंग इत्यादी) कामाचा दर्जा आणि गुणवत्ता (पायाचा विस्तार मजबुती देखणेपण इत्यादी) याबाबतीत तसूभरही तडजोड न करण्याचा कटाक्ष कसोशीने पाळला गेला.
एकूण ११ ते सव्वा ११ कोटी रुपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. प्रत्यक्ष काम पूर्ण झाल्यानंतर केलेल्या हिशोबानुसार एकूण खर्च ११ कोटी, २७ लाख झाला आहे. अंदाजपत्रक किती काटेकोरपणे तयार केले गेले होते, याचेच हे द्योतक आहे.
महत्त्वाचे : खर्चासाठी केले गेलेले निधी संकलन केवळ आणि केवळ संघाचे स्वयंसेवक यांनी प्रचंड मेहनत करून एप्रिल २०२३ ते जून २०२५ या दोन वर्षांत केले.
सर्वांत महत्त्वाचे : निधी संकलनात तत्पर हिशोब, त्वरित पावत्या, जमाखर्चाचे दर तीन महिन्यांनी सविस्तर निवेदन तयार करण्याचा कटाक्ष. फक्त संघाचे स्वयंसेवक संघ विचारांचे समर्थक हितचिंतक यांच्या माध्यमातूनच संपूर्ण निधी गोळा केला गेला आणि तोही केवळ ठाणे शहरातूनच.
साधेपणा, पारदर्शी प्रामाणिक व्यवहार, समाजातील सर्व स्तरातील लोकांचा सहभाग या संघाच्या सर्व वैशिष्ट्यांना कसोशीने टिकवून ठेवत काम पुरे केले.
तांत्रिकदृष्ट्या ‘एकोस्टिस’ची परिपूर्ण रचना केलेली सभागृहे बैठक कक्ष, निवास कक्ष, उद्वाहन सेवा, अग्नीनियंत्रक यंत्रणा, सौरऊर्जा यंत्रणा आदी सर्व आधुनिक, अद्ययावत आणि तंत्रज्ञानाधारित सोयींनी इमारत सज्ज करण्यात आली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला यावर्षी विजयादशमीच्या दिवशी दि. २ ऑटोबर रोजी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यापूर्वी या कार्यालय इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले होते. प्रत्यक्षात त्यापूर्वी जवळजवळ सहा महिने बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. पूर्तता प्रमाणपत्र, व्याप्ती प्रमाणपत्र आदी आवश्यक प्रमाणपत्रे ही पालिकेकडून प्राप्त झाली आहेत.
शताब्दीपूर्तीच्या निमित्ताने संघकार्य विस्तार आणि दृढीकरणाची संघाच्या पातळीवर आखण्यात आलेली उद्दिष्टे पार करण्याच्या प्रयत्नांचे एक प्रभावी केंद्र या नात्याने ‘श्रीराम व्यायाम शाळा सेवा केंद्रा’ची ही इमारत दिमाखात उभी झाली आहे.
अरुण करमरकर