नाठाळ बैलगाडी ओढण्यास नकार देत जागेवरच उभा राहिल्यास गाडीवानाची जी कुचंबणा होते, तशीच काहीशी कुचंबणा अमेरिका आणि ब्रिटनची झालेली दिसते. जगातील सर्वांत अद्ययावत आणि घातक लढाऊ विमान म्हणून ओळखल्या जाणार्या अमेरिकेच्या ‘एफ-३५ बी’ या लढाऊ विमानातील दोष कोणत्याच तंत्रज्ञांना सापडत नसून, हे अत्यंत आधुनिक विमान भारताच्या भूमीवर फार काळ कसे ठेवायचे, या विवंचनेत अमेरिका आणि ब्रिटन सापडले आहेत. त्यानिमित्ताने...
इस्रायल-इराणमध्ये चाललेल्या धुमश्चक्रीमुळे भारतात घडत असलेल्या एका रहस्यमय घटनेकडे भारतीय माध्यमांचे काहीसे दुर्लक्ष झाले. माध्यमांना कदाचित त्याकडे हेतुतः तसे दुर्लक्ष करण्यास सांगण्यात आले असावे. ते काहीही असो, पण गेल्या १४ जूनपासून केरळमधील तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक लढाऊ विमान उभे आहे. हे ब्रिटनच्या हवाई दलाचे लढाऊ विमान असून, ते अमेरिकेच्या ‘लॉकहीड’ कंपनीने बनविलेले ‘एफ-३५ बी’ हे अत्याधुनिक लढाऊ जेट. या विमानाने नवी समस्या उभी केली आहे.
अरबी सागरात ब्रिटनच्या युद्धनौकेवरील हे विमान हवाई सराव करताना खूप दूर आले आणि नंतर पुन्हा युद्धनौकेवर जाण्याइतके इंधन त्यात उरले नाही, असे वैमानिकाला जाणवले. त्यामुळे त्याने सर्वांत जवळ असलेल्या केरळमधील तिरुअनंतपुरम विमानतळावर हे विमान तातडीने उतरण्याची परवानगी मागितली. या विमानाची प्राथमिक चौकशी केल्यावर हे विमान तेथे उतरविण्यास परवानगी देण्यात आली. त्यानंतरच खरी समस्या उद्भवली. कारण, इंधन भरल्यावरही हे विमान चालू होईना. तेव्हा ब्रिटिश तंत्रज्ञांना पाचारण करण्यात आले. त्यांनीही बरीच खटपट केली, तरी हे विमान हलायला तयार होईना. शेवटी सिंगापूरहून काही तंत्रज्ञांची तुकडी आली. तरीही हे विमान अजूनही जागेवरच उभे आहे. आता लष्कराच्या मालवाहू विमानाला आणण्यात येणार असून त्यात हे विमान घालून ते ब्रिटनमध्ये नेले जाईल, असे सांगितले जाते. पण, केवळ या तांत्रिक कारणांमुळे रहस्य निर्माण झालेले नाही.
एक तर हे विमान भारतीय हवाई दलाने आपल्या रडारवर पाहिले, असे सांगितले जाते. ते लढाऊ विमान आहे, याची खात्री करून घेतल्यावर भारतीय रडारने ते ‘लॉक’ केले. आता हे ‘लॉक’ काढण्यात ब्रिटिश आणि अन्य परदेशी तंत्रज्ञांना यश येत नाहीये. तशातच, विमानाचा वैमानिक या विमानापासून दूर जाण्यास तयार नसून तो विमानाशेजारीच खुर्ची टाकून २४ तास विमानावर नजर ठेवत आहे. तसेच, हे विमान विमानतळावरील हँगरमध्ये नेण्यासही त्याने आणि ब्रिटनने नकार दिला. त्यामुळे विमानाचे गूढ अधिकच वाढले. यातील अमेरिका आणि ब्रिटनच्या दृष्टीने सर्वांत चिंताजनक बाब म्हणजे, हे विमान भारताने आपल्या रडारवर अचूक टिपले. कारण, जगातील सर्वांत अद्ययावत आणि ‘स्टेल्थ विमान’ म्हणून याचा गाजावाजा केला जातो. म्हणजे कोणत्याच हवाई दलाला हे विमान रडारवर दिसू शकत नाही, असा अमेरिकेचा दावा आहे. असे असताना, भारताने ते आपल्या रडावर कसे टिपले आणि नंतर ‘लॉक’ही कसे केले, याचा अमेरिकेला धक्का बसला.
पाकिस्तानबरोबर नुकत्याच उडालेल्या संघर्षात भारताने असे अनेक धक्के जगाला दिले आहेत. भारताकडील लढाऊ विमानांनी पाकिस्तानची हवाई बचाव यंत्रणा स्वतःचे कसलेही नुकसान न सोसता किती सहजतेने उद्ध्वस्त केली आणि अचूक लक्ष्यभेद कसा केला, हे पाहून सारे जग स्तिमित झाले. मुख्य म्हणजे, पाकिस्तानमध्ये ज्या गुप्त जागी अण्वस्त्रे दडवून ठेवली होती, त्या जागाही भारताला ठावूक होत्या आणि त्यातील काही ठिकाणांवर हल्ले चढवून ती अस्त्रे भारताने निकामीही केल्याची शक्यता वर्तविली गेल्याने अमेरिका आणि पाकिस्तान यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण, ती अण्वस्त्रे म्हणे अमेरिकेच्या मालकीची होती. अतिशय अद्ययावत समजल्या जाणार्या आपल्या ‘एचयू-९’ या हवाई टेहळणी यंत्रणेलाही भारताने दाद दिली नाही आणि ती क्षणार्धात नष्ट केल्याचा धक्का चीनलाही बसला. आपली ‘जे-१०’ वगैरे अत्याधुनिक लढाऊ विमाने भारतीय लढाऊ विमानांनी हवेत नष्ट केल्याच्या धक्क्यातून चीन अजून सावरलेला नाही. शिवाय, आपले एकही क्षेपणास्त्र लक्ष्यावर धडकण्यापूर्वीच भारताने हवेतच नष्ट केल्याचे पाहूनही चीन कोमात गेला आहे. भारताच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या विमानतळावर असलेली ‘एफ-१६’ विमाने जागच्या जागीच फोडून टाकल्याचे पाहून अमेरिका संतप्त आणि अस्वस्थ झाली आहे.
भारताने नुकत्याच राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तानातील दहशतवादी अड्डेच जमीनदोस्त झाले असे नव्हे, तर चीनच्या कथित अत्याधुनिक रडार व क्षेपणास्त्र यंत्रणेची, तुर्कीयेच्या घातक ड्रोनची, अमेरिकेच्या ‘एफ-१६’ विमानांची आणि पाकिस्तानच्या टेहळणी यंत्रणेची प्रतिष्ठाही धुळीत मिळाली. भारताकडील काही स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रांनी आणि रशियाकडील आधीच्या पिढीतील लढाऊ विमानांनी पाकिस्तानची हवाई सुरक्षा वाळूचा किल्ला ढासळावा तशी ढासळून टाकली. केवळ २२ मिनिटांत पाकिस्तानचे २२ हवाईतळ उद्ध्वस्त करण्यात आले. पाकिस्तानी लष्कराला अधिक संहार आणि नाचक्की थांबविण्यासाठी केवळ चार दिवसांत भारताच्या पायावर लोळण घ्यावे लागले.
भारतीय हवाई दलाच्या या अचाट पराक्रमामुळे अमेरिका वगैरे पाश्चिमात्य देशांना आणि चीनला पुरते अस्वस्थ करून सोडले आहे. कारण, हे ‘एफ-३५ बी’ विमान अमेरिकेने काही ‘नाटो’ देशांना विकले असून ते भारतानेही विकत घ्यावे, म्हणून अमेरिका आग्रह धरीत आहे. हे विमान कोणत्याच रडारवर दिसू शकत नाही, असा अमेरिकेचा खंदा दावा आहे. पण, भारताने तो फोल ठरविल्याने या विमानाच्या या क्षमतेबद्दल संशय निर्माण झाला आहे. तसे झाल्याने विमानाची विश्वासार्हता कमी तर होतेच, पण त्याची किंमतही घटते. या एका विमानाची किंमत २० कोटी डॉलर्स इतकी आहे, यावरून हा खेळ अमेरिकेला किती महागात पडेल, याची कल्पना यावी.
भारताच्या वाढलेल्या लष्करी ताकदीचे एक कारण म्हणजे, भारताने अनेक अस्त्र-शस्त्रांच्या उत्पादनाला आता भारतातच प्रारंभ केला आहे. शिवाय, त्याची अनेक क्षेपणास्त्रे ही भारतीय तंत्रज्ञानावरच आधारित आहेत. त्यांच्या अचूकतेचे प्रमाण नुकत्याच उडालेल्या लष्करी संघर्षात स्पष्टपणे दिसून आले. उलट, अमेरिका आणि चीन यांच्याकडील कथित अत्याधुनिक विमानांचे दावे अजून रणभूमीवर सिद्ध झालेले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या ‘मेक इन इंडिया’ या मिशनचा हा सफल परिणाम आहे.
राहुल बोरगांवकर