‘जंक फूड’च्या आहारी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरील दुष्परिणाम आजच्या पिढीसाठी नक्कीच धोकादायक. या तीव्र जाणिवेतून मुलांच्या तंदुरुस्तीसाठी झटणार्या प्रा. सुनील अडसुळे यांच्याविषयी...
अलीकडील काळात प्रत्येक घरात औषधांसाठी एक कप्पा ठेवलेला आहे, यात लहान मुलांच्या औषधांचादेखील समावेश होतो. ही बाब नक्कीच खंत वाटावी अशीच. बालपणापासूनच आजारांचे शुक्लकाष्ट मागे लागलेल्या पिढीकडे जर आपण उज्ज्वल भारत घडविणारी पिढी म्हणून बघत असू, तर ही मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल. प्रा. सुनील अडसुळे यांनी हे गांभीर्य वेळीच ओळखले आणि त्यादृष्टीने ते कामाला लागले. समाजात कामे करताना अशी काही पारखी नजर असलेली माणसं खरोखरच दखल घ्यावी इतकी कर्तृत्ववान असतात. आजकालच्या पिढीचा जंक फूडकडे वाढलेला ओघ, हा आरोग्यावर दुष्परिणाम करणारा. म्हणूनच डॉ. अडसुळे यांनी जंकफूडविरोधी जागरूकता मोहीम हाती घेतली आहे.
डॉ. अडसुळे विद्यार्थ्यांना योग्य आहाराचे महत्त्व सांगण्यासाठी झटत असून, संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरदेखील ‘जंक फूडचे दुष्परिणाम’ या विषयावर व्याख्यान देतात. यासाठी त्यांना अनेक शाळांमधून तसेच खासगी संस्थांमधून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मुलांनी जंक फूड न खाता स्वतःचे आरोग्य सुदृढ ठेवावे. तसेच, मुलांना जंक फूड खाण्याचे तोटे समजावे, यासाठी प्रा. अडसुळे यांनी आतापर्यंत शहरातील 50हून अधिक शाळांमध्ये व्याख्याने दिली आहेत. त्यांच्या एकूण व्याख्यानांचा आकडा 200 हून अधिक झाला आहे.
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात त्रिमली येथील ते मूळ रहिवासी आहेत. त्यांचे बालपण, प्राथमिक शिक्षण तेथेच झाले. अभियांत्रिकी शिक्षणासाठी त्यांनी पुणे गाठले आणि ते पुण्यातच स्थायिक झाले. त्यांनी शासकीय तंत्रनिकेतन, पुणे येथून ‘इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग’मध्ये डिप्लोमा केल्यानंतर ‘बीटेक’ केले. तसेच, ‘अर्थशास्त्र’ विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षण क्षेत्रात काम करत असताना विद्यार्थ्यांचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत असल्याचे लक्षात आले. त्यावर काहीतरी मार्ग काढण्यासाठी विद्यार्थ्यांच्या वर्तवणुकीचा बारकाईने अभ्यास सुरू केला. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि एकाग्रतेचा संबंध असल्याचे लक्षात आल्यावर त्यांच्या वयाच्या महत्त्वाच्या टप्प्यात विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्त्व सांगण्याचे त्यांनी ठरवले. जंक फूडमुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता कमी होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षण क्षमतेवर कसा परिणाम होतो, याचे महत्त्व शास्त्रशुद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांना समजावून सांगतात. त्यांनी या कार्याला इतके वाहून घेतले आहे की, ते कुठे कुटुंबासमवेत फिरायला गेले की, त्या ठिकाणच्या शाळांना आवर्जून भेट देतात. मग ते ठिकाण कोणतेही असो. विद्यार्थ्यांना व्यायामाचे महत्त्व पटवून देतात. विद्यार्थ्यांना चांगल्या आरोग्याची शपथ देण्याचे काम ते करतात. त्यांच्या या कार्याला, व्याख्यानांना विद्यार्थीदेखील दाद देत आहेत. प्रा. सुनील यांनी सुरुवातीला वर्षभर नियमित सायकलिंग केले. ‘कोरोना’नंतर ‘इंडियन सायकलिंग क्लब’मध्येही ते रुजू झाले आणि त्यामुळे त्यांचे नियमित सायकलिंग सुरू झाले. चार वर्षांत त्यांनी 30 हजार किमी सायकलिंग केले. आजपर्यंत त्यांनी पुणे ते कन्याकुमारी, पुणे ते गोवा, अष्टविनायक, पुणे ते शिर्डी पाच वेळा, पुणे ते पंढरपूर तीन वेळा, अक्कलकोट, त्र्यंबकेश्वर यांसारख्या सायकल राईड्स पूर्ण केल्या आहेत.
पिंपळे निलख येथील ‘पिंपळ वन’ या संस्थेचे ते सभासद असून, याच भागात या संस्थेने पिंपळांच्या झाडांसह विविध वृक्षांचे वृक्षारोपण केले आहे. अडसुळे आणि सहकार्यांनी मिळून निलख परिसरात पिंपळ वन तयार केले असून, त्याची योग्य देखभाल घेतली जाते. जन्मदिवस, लग्न वाढदिवस किंवा एखाद्या नातेवाईकांच्या स्मरणार्थ झाड लावणे, अशी कार्य या वनात केली जातात. वेळ मिळेल तसे किंवा आठवड्याच्या शेवटी ते सायकल भ्रमंती करतात. या भ्रमंती दरम्यानदेखील सुदृढ आरोग्याचा प्रसार आणि तंदुरुस्त राहण्याचा संदेश ते देत असतात. तसेच, तंदुरुस्त शरीरासोबत आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठीदेखील सहकार्यांसोबत ते प्रयत्नशील आहेत. त्यांच्या कार्याला अनेक स्तरांतून वाहवा मिळत असून, नुकतेच त्यांनी केदारनाथ आणि परिसराचा दौरा करताना या ठिकाणी जंक फूड आणि निसर्गप्रेमाविषयी व्याख्याने दिली आहेत. तसेच त्यांनी वृक्षलागवडीचे कार्यदेखील सुरू केले आहे.
आजच्या पिढीचा कल ‘जंक फूड’ खाण्याकडे अधिक दिसून येतो. बाहेरील खाद्यपदार्थ हे शरीरासाठी घातकच असतात, हे विद्यार्थ्यांना पटवून देण्याची आज नितांत गरज आहे. शिक्षणाच्या वयात मुलांना चांगले शिक्षण मिळायला पाहिजे. त्यासाठी त्यांचे आरोग्य उत्तम असणे गरजेचे आहे. मुलांचे शिक्षण चांगले असेल, तर विचार चांगले होतील. आरोग्य उत्तम राहिले, तरच आजची लहानमुले ‘सशक्त भारत’ घडवू शकतील. घरातील अन्न हे जास्त पौष्टिक असते, हे विद्यार्थ्यांना सांगणे आणि पटवून देणे गरजेचे आहे. उद्याची पिढी तंदुरुस्त असणे, हे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी डॉ. सुनील अडसुळे प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या कार्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!
- शंशाक तांबे