अमेरिकेतील राजकारण प्रदीर्घ काळ डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन्स या दोन पक्षांभोवती केंद्रित राहिले. मात्र, सध्या एलॉन मस्कसारख्या दिग्गज उद्योगपतीने नवीन पक्षस्थापनेची शक्यता निर्माण करून अमेरिकेत खळबळ माजवलेली दिसते. त्यानिमित्ताने अमेरिकेतील द्विपक्षीय राजकीय रचनेची मर्यादा, तिसर्या पक्षांची दुर्दशा आणि नव्या शक्तीच्या उदयाची शक्यता यांचे हे आकलन...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे पूर्वाश्रमीचे जिवलग मित्र आणि श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क यांना धमकावल्याने मस्क आता राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. मस्कसारख्या उद्योजकाकडून अमेरिकेत नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या संकेतांमुळे तेथील द्विपक्षीय राजकारण पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहे. अमेरिका ही ‘डेमोक्रॅट्स विरुद्ध रिपब्लिकन्स’ या दोन पक्षांभोवती फिरणारी राजकीय व्यवस्था. मात्र, एलॉन मस्क यांचा जनमानसावर असलेला प्रभाव, त्यांची लोकांवर असलेली पकड आणि त्यांच्या वक्तव्यांना मिळणारी व्यापक सामाजिक प्रसिद्धी पाहता, ‘तिसर्या पक्षाच्या’ विचाराने अमेरिकेत पुन्हा एकदा डोके वर काढलेले दिसते. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील द्विपक्षीय राजकीय व्यवस्थेच्या स्वरूपाचे विश्लेषण करणे, अत्यावश्यक असेच ठरते.
अमेरिकेचे संविधान, तेथील निवडणूक पद्धती आणि संस्थात्मक रचना ही मूलतः द्विपक्षीयतेला प्रोत्साहन देणारी आहे. डेमोक्रॅटिक पक्ष अमेरिकेतील दोन प्रमुख राजकीय पक्षांपैकी एक असून, 19व्या शतकात अॅण्ड्रयू जॅक्सनपासून उदयास आलेला हा पक्ष ‘उदारमतवादी’ विचारांचा मानला जातो. या पक्षाने फ्रँकलिन डी. रूझवेल्ट, जॉन एफ. केनेडी, बिल क्लिटंन, बराक ओबामा, जो बायडन यांच्यासारखे अध्यक्ष अमेरिकेला दिले. दुसरीकडे, रिपब्लिकन पक्ष हा 1854 साली स्थापन झालेला पक्ष असून, अब्राहम लिंकनपासून तिची सुरुवात झाली. यांची विचारधारा तुलनेत संरक्षणवादी व पुराणमतवादी अशी मानली जाते. अब्राहम लिंकन, रोनाल्ड रीगन, जॉर्ज बुश (वडील व पुत्र), डोनाल्ड ट्रम्प हे याच पक्षाचे!
‘फर्स्ट पास्ट द पोस्ट’ प्रणालीमुळे एका मतदारसंघात सर्वाधिक मते मिळवणारा उमेदवार अमेरिकेत निवडला जातो. त्यामुळे तिसर्या पक्षाला कितीही लोकप्रियता असली, तरी स्थानिक किंवा राष्ट्रीय पातळीवर बहुमत मिळवणे कठीण ठरते. हीच बाब अमेरिकेतील ‘डेमोक्रॅट्स’ आणि ‘रिपब्लिकन्स’ या दोन प्रबळ पक्षांना जवळजवळ संपूर्ण राजकीय नियंत्रण प्रदान करणारी ठरते. या प्रणालीमुळे नव्या पक्षांना निधी, माध्यम कवरेज, उमेदवारी, निवडणूक यंत्रणा व जनमानसात स्थान निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागतो. अमेरिकेत गेल्या दीडशे वर्षांत मोठ्या प्रमाणावर तिसरे पक्ष निर्माण होण्याचे प्रयत्न झालेही. पण, ‘व्हिग पक्षा’पासून ‘ग्रीन पक्ष’, ‘लिबर्टेरियन पक्ष’ ते ‘रॉस पेरो’सारख्या अपक्ष उमेदवारांपर्यंत कुणालाही राजकारणात दीर्घकाळ स्थान मिळालेले दिसत नाही. तसेच मोठ्या कंपन्यादेखील फक्त मुख्य पक्षांनाच आर्थिक पाठबळ देतात. त्यामुळे तिसरा पक्ष निधीपासून वंचित राहतो. राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या चर्चेत तिसर्या पक्षांना प्रवेश दिला जात नाही. ‘तिसर्या पक्षाला मत दिले, तर माझे मत वाया जाईल,’ अशी तेथील मतदारांची मानसिकता आणि या सर्व कारणांमुळेच आजवर तिसरा पक्ष अमेरिकेत आपले बस्तान बसवू शकलेला नाही.
अलीकडे मस्क यांनी असे सूचक वक्तव्य केले की, ‘आता अमेरिकेला तिसर्या पक्षाची गरज आहे’ आणि सध्याच्या राजकीय व्यवस्थेने नागरिकांचा विश्वास गमावला आहे. विशेषतः डेमोक्रॅट्सच्या ‘वोक अजेंड्या’विरुद्ध त्यांनी आपली नाराजी व्यक्त करताना, रिपब्लिकन पक्षाचा उल्लेखही केला नाही, हे विशेष! म्हणूनच, मस्कसारखा प्रभावशाली आणि अब्जाधीश उद्योजक तिसर्या पक्षाच्या स्थापनेत उतरला, तर त्याला निधीची अडचण भासणार नाही. माध्यमांमध्ये त्याला प्रचंड कव्हरेज मिळेल. ‘एक्स’सारख्या प्लॅटफॉर्मवरून जनमत बनवण्याची ताकद त्यांच्याकडे असेल, युवा, उद्योजक, टेक उद्योगांतील दिग्गज आणि मध्यममार्गी नागरिकांचा पाठिंबा त्यांना मिळू शकतो.
गेल्या काही वर्षांत अमेरिकेत असंतोष वाढीस लागला असून, डेमोक्रॅट्सची अतिशय ‘प्रगतिशील’ भूमिका आणि रिपब्लिकन्सची अति-राष्ट्रवादी भूमिका, यामध्ये अनेकांचा राजकीय आश्रय नाहीसा झाला. अशा नागरिकांसाठी मस्क यांचा ‘तिसरा पर्याय’ आकर्षक ठरू शकतो. खरं तर ‘इंडिपेन्ड्न्ट्स’ किंवा ‘स्वतंत्र मतदार’ हा अमेरिकेतील सर्वांत मोठा मतदार. 2024 सालच्या निवडणुकीच्या आधी 40 टक्क्यांहून अधिक अमेरिकन नागरिक स्वतःला कोणत्याही पक्षाशी संलग्न मानत नव्हते. हेच नागरिक एका नव्या, ‘पारंपरिक राजकारणापेक्षा वेगळ्या’ पक्षाच्या पाठीशी उभे राहू शकतात, अशी दाट शक्यता आहे.
नवीन पक्ष अमेरिकी राजकारणात सक्रिय झाल्यास मतांचे विभाजन होईल. तिसरा पक्ष सर्वप्रथम दोन्ही मुख्य पक्षांच्या मतांमध्ये भेद निर्माण करेल. यामुळे ‘स्पॉयलर’ प्रभाव निर्माण होईल. उदाहरणार्थ, मस्कचा पक्ष रिपब्लिकन मतदारांमध्ये घुसखोरी करेल, तर डेमोक्रॅट्सना त्याचा थेट फायदा होईल. राजकीय वादविवादात नवीन विषय येतील. राजकीय निधीकरणात परिवर्तन होईल. मस्कसारख्या उद्योगपतीकडून पक्षाला स्वनिधी उपलब्ध झाल्यास, राजकीय स्वायत्ततेचे प्रमाण अर्थातच वाढेल. त्याचवेळी हे पारंपरिक माध्यमांना धक्का देणारे ठरेल. नव्या पक्षाचा प्रचार-प्रसार ‘एक्स’ किंवा अन्य डिजिटल प्लॅटफॉर्मवरून झाला, तर पारंपरिक मीडिया हाऊसेसवरील त्याचे अवलंबित्व कमी होईल.
भारत आणि अमेरिका या जगातील सर्वांत मोठ्या अशा प्रमुख लोकशाही आहेत. एकीला प्रदीर्घ इतिहास आहे, तर दुसरी सर्वांत मोठी. मात्र, त्यांच्या राजकारणातील भिन्नता लक्षात घेण्यासारखी अशीच. त्यात मस्क यांच्यासारखा नेता नव्या राजकीय पक्षाच्या स्थापनेत उतरला, तर अमेरिकेच्या राजकारणात मोठा भूकंप घडू शकतो.
अमेरिकेच्या राजकारणात तिसर्या पक्षाचा उदय ही शक्यता ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची अशीच. 2028 सालची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक ही केवळ दोन पक्षांमध्ये नव्हे, तर ‘सिस्टम विरुद्ध संधी’ अशा संघर्षाचे रूप घेऊ शकते. म्हणूनच, अमेरिकी राजकारणाला, व्यवस्थेला कलाटणी देणारी ती ऐतिहासिक अशीच घटना असेल!