इस्रायल-इराण संघर्ष आणि भारतासाठी धडे

    22-Jun-2025
Total Views | 31

गेली तीन-चार वर्षे संपूर्ण जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे युद्ध क्षेत्रातील बदलत्या तंत्रज्ञानाचे वास्तव जगासमोर आले. गेल्या काही दशकांत युद्ध तंत्रज्ञानात वेगाने बदल झाले. इस्रायल-इराण संघर्ष हे त्याचे उत्तम उदाहरण, यातून भारताला शिकण्यासारखे बरेच काही आहे.

इराण आणि इस्रायलमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर तेहरानमधील भारतीय दूतावासाने, इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी केले आणि ‘ऑपरेशन सिंधू’ राबवून त्यांना सुखरुप मायदेशीही आणले. इस्रायल आणि इराण यांच्यात सुरु असलेल्या ‘ऑपरेशन रायझिंग लायन’मधून भारताला धोरणात्मक, लष्करी, आर्थिक क्षेत्रांमध्ये अनेक महत्त्वाचे धडे मिळत आहेत. इस्रायलच्या हल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे, अत्याधुनिक पद्धतीची कारवाई, हल्ल्यातील अचूकता आणि अभूतपूर्व गुप्तचर यंत्रणा होय. इस्रायलच्या आक्रमकतेने इराणच्या प्रत्युत्तर देण्याच्या क्षमतेलाच मोठ्या प्रमाणात निष्प्रभ केले. इराणचा प्रत्युत्तरादाखलचा हल्ला जरी मोठ्या प्रमाणावर असला, तरी इस्रायलच्या मजबूत हवाई संरक्षणामुळे मोठ्या प्रमाणात निष्फळ ठरला. भारत अनेक आघाड्यांवरील आव्हाने आणि गतिमान प्रादेशिक सुरक्षा या क्षेत्रात प्रतिकुल वातावरणाचा सामना करत आहे. इस्रायलची इराणविरोधातील मोहीम, सखोल गुप्तचर माहिती एकीकरण, सैन्यदलांचे आधुनिकीकरण आणि प्रगत लष्करी तंत्रज्ञानाचा विशेषतः ड्रोन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) स्वदेशी विकास करण्याची गरज अधोरेखित करते.

इस्रायलची धोरणात्मक प्रेरणा आणि पूर्वनियोजित हल्ला

इराणने अणुबॉम्ब विकसित केल्यास इस्रायलच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी इस्रायलची समजूत आहे. यामुळे इराण आणि त्यांना मदत करणार्‍या सर्व मित्रराष्ट्रांवर, इस्रायलची करडी नजर असते आणि वेळोवेळी ते निर्माण होणार्‍या धोयांचे विश्लेषण करून, त्याविरुद्ध कारवाईही करतात. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, पुढील तीन महिन्यांत इराणकडे नऊ ते दहा अणुबॉम्ब बनवण्याची क्षमता निर्माण होणार होती. म्हणूनच इस्रायलने तातडीने हल्ला करून, ही क्षमताच नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

यासाठी सर्वप्रथम इस्रायलच्या राजकीय नेतृत्वाची दाद द्यावी लागेल, ज्यांनी जगाची पर्वा न करता इस्रायलसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले. असा निर्णय चुकल्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो आणि जगभरातील अनेक महासत्ता तुमच्या विरोधात जाऊ शकतात. अशावेळी उद्भवलेल्या परिणामांना तोंड देण्याची क्षमता असणे, अत्यंत महत्त्वाचे आहे. ही क्षमता इस्रायलच्या नेतृत्वाने दाखवली.

इस्रायलची धोरणात्मक आक्रमकता : इराणच्या प्रत्युत्तर हल्ल्याला निष्प्रभ करणे

इराणने प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्याला निष्प्रभ करण्यात इस्रायलचे यश केवळ बचावात्मक विजय नव्हते, तर अचूक हल्ले, सखोल गुप्तचर माहिती आणि गुप्त कारवाया यांचा मिलाफ होता. इस्रायलचा आक्रमक बचाव हा पूर्वनियोजित, बहुस्तरीय आक्रमक रणनीतीचा एक भाग होता.

नेतृत्व असलेल्या ठिकाणांवर लक्ष्यभेदी हल्ले

इस्रायलच्या रणनीतीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे, इराणच्या विविध विभागांचे नेतृत्व राहात असलेल्या ठिकाणांवर लक्ष्यभेदी हल्ले करणे, आणि त्यायोगे लष्करी आणि राजकीय नेतृत्वात अभूतपूर्व धक्का आणि व्यत्यय निर्माण करणे हा होता. ‘आयआरजीसी’ हवाईदलाच्या बंकरला नष्ट करून आणि प्रमुख कमांडर यांना संपवून इस्रायलने, इराणच्या प्रत्युत्तर नियोजनात गोंधळ निर्माण केला. यामुळे इराणचा त्वरित प्रतिसाद निष्प्रभ झाला.

इस्रायलने इराणची क्षमता नष्ट करण्यासाठी एक दीर्घकालीन योजना तयार केली आहे, ज्यानुसार ते वेळोवेळी कारवाई करत असतात. यामध्ये सर्वांत महत्त्वाचे म्हणजे इराणमधील लष्करी आणि तंत्रज्ञानाच्या नेतृत्वाला लक्ष्य करणे, ज्यामुळे त्यांची लष्करी निर्णय घेण्याची आणि तंत्रज्ञान वाढवण्याची क्षमताच कमी होईल. यात इस्रायलला यश मिळत आहे.

‘मोसाद’ची भूमिका आणि मानवी गुप्तचर

‘ऑपरेशन रायझिंग लायन’चे यश ‘इस्रायल संरक्षणदल’ आणि ‘मोसाद’ या गुप्तचर संस्थांमधील अचूक नियोजन आणि अंमलबजावणीवर अवलंबून होते. हे यश म्हणजे अनेक वर्षांच्या तयारीचा परिणाम आहे. इस्रायलचे ऑपरेशनल सिद्धांत गुप्त कारवायांवरच मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.‘मोसाद’च्या गुप्त कारवायांनी अभूतपूर्व धाडस दाखवले. त्यांच्या एजंट्सनी इराणच्या हद्दीत तेहरानजवळ एक गुप्त ड्रोनतळ स्थापन केला. हे ड्रोन रात्री सक्रिय करण्यात आले आणि त्यांनी इस्रायलला लक्ष्य केलेल्या क्षेपणास्त्र लॉन्चर्सवर हल्ला केला.

इस्रायलने आपले गुप्तहेर जाळे इराणमध्ये मोठ्या प्रमाणात पसरवले आहे. हे एजंट किंवा इस्रायलचे गुप्तहेर, गुप्त पद्धतीने मोहिमा राबवत असतात. अनेकवेळा जर गुप्तहेर पकडला गेला, तर त्याची प्रचंड किंमत पण द्यावी लागते. नुकसान झाले तरी त्याची पर्वा न करता, इस्रायलने आपले गुप्तहेर जाळे वाढवण्याचे प्रयत्न कायम सुरू ठेवले आहेत. यामुळे इस्रायलने इराणच्या आत अत्यंत प्रभावी गुप्तहेर जाळे तयार केले आहे. त्यांना या मोहिमेमध्ये, मानवी गुप्तचरांची असलेली साथही अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.

याव्यतिरिक्त, इस्रायलने अत्याधुनिक शस्त्रप्रणाली असलेली वाहने गुप्तपणे इराणमध्ये तस्करी करून आणली होती. या प्रणालींनी इराणच्या हवाई संरक्षणाला निष्प्रभ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे इस्रायलच्या विमानांना इराणच्या हवाईक्षेत्रात पूर्ण स्वातंत्र्य मिळाले.

हवाई वर्चस्व आणि अचूक लक्ष्यीकरण

‘ऑपरेशन रायझिंग लायन’ची सुरुवात मोठ्या हवाई हल्ल्याने करण्यात आली. इतिहासात प्रथमच, २०० लढाऊ विमानांनी एकाच वेळी उड्डाण केले आणि पूर्वनिर्धारित लक्ष्यांवर अचूक हल्लेही केले. त्यांपैकी अनेक ठिकाणी यापूर्वी कधीही हल्ला झाला नव्हता. इराणमधील सुमारे १०० लक्ष्यांवर ३३० हून अधिक बॉम्ब टाकण्यात आले.
अणुसुविधांना लक्ष्य करण्याव्यतिरिक्त पश्चिम इराणमधील इराणच्या हवाई संरक्षण प्रणालींचा पद्धतशीरपणे नाश करणे, हे सुद्ध या हल्ल्याचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट होते. यात डझनभर रडार आणि पृष्ठभागावरून हवेमध्ये मारा करणार्‍या क्षेपणास्त्र लॉन्चर्सचा समावेश होता. ‘मोसाद’च्या गुप्त कारवायांद्वारे इराणच्या हवाई संरक्षणाची पूर्वनियोजित घट झाल्यामुळे या गंभीर उद्दिष्टाला मोठ्या प्रमाणात मदत झाली, ज्यामुळे इस्रायलच्या विमानांसाठी मार्ग मोकळा झाला.

धोरणात्मक फसवणूक

या मोहिमेमध्ये इस्रायलने अमेरिकेलाही मोठ्या प्रमाणात चकवले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प अणुबॉम्बच्या संबंधात वाटाघाटी करण्यासाठी आग्रही होते. या वाटाघाटी ६० दिवस चालतील, अशी त्यांची समजूत होती. वाटाघाटी होत असल्याचे इस्रायलकडून दाखवण्यातही आले. परंतु, त्याचवेळेला इस्रायलची विमाने आणि त्यांचे गुप्तहेर इराणमध्ये कारवाई करत होते. यामुळे इराणला चकवण्यामध्ये इस्रायलला मोठेच यश मिळाले. याला ‘धोरणात्मक फसवणूक’ असेही म्हटले जाऊ शकते.

इराणचा प्रत्युत्तर हल्ला

इस्रायलच्या कारवाया व्यापक आणि पूर्वनियोजित असूनही, इराणने इस्रायलवर एक महत्त्वपूर्ण प्रत्युत्तरात्मक हल्ला केला. या हल्ल्यामुळे त्यांची क्षमता आणि हेतू स्पष्ट झाला.

प्रत्युत्तराची व्याप्ती आणि स्वरूप

इराणने प्रत्युत्तरामध्ये इस्रायलवर अनेक ड्रोन आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचाअ मारा केला. विशेषतः डझनभर ‘युएव्ही’ आणि जवळजवळ १०० बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, इस्रायलच्या नागरी केंद्रांना लक्ष्य करूनच डागण्यात आली. यात इस्रायलची राजधानी तेल अवीव आणि रिशोन लेझियनसारख्या इतर मध्यवर्ती शहरांचाही समावेश आहे.

या हल्ल्यांमुळे इस्रायलमध्य बरेच नुकसान आणि जीवितहानीही झाली. इराणच्या क्षेपणास्त्रांमुळे रिशोन लेझियनमध्ये घरे उद्ध्वस्त झाली आणि दोन लोकांचा मृत्यू झाला, तर १९ जण जखमी झाले.

इराणच्या दारूगोळ्याचा प्रभाव आणि इस्रायलचा बचाव

इस्रायलच्या बहुस्तरीय हवाई संरक्षण प्रणालींनी, इराणच्या क्षेपणास्त्रांना रोखण्यात उच्च दर दाखवला. बहुतेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे रोखण्यात इस्रायलच्या हवाई संरक्षण प्रणालीला यश आले. यामुळे ‘आयर्न डोम’ आणि इतर प्रगत प्रणालींसह इस्रायलचे सक्षम बचावात्मक क्षमताही सिद्ध झाली. तथापि, ‘आयडीएफ’ने कबूल केले की, हा बचाव दुर्दैवाने पूर्णपणे अभेद्य नाही. काही क्षेपणास्त्रे आत घुसून नुकसान करण्यास यशस्वी झाली. अमेरिकेनेही यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या प्रादेशिक भूआधारित हवाई संरक्षण प्रणालींनी इराणच्या क्षेपणास्त्रांना पाडण्यास मदत केली.

इराणच्या मर्यादाही स्पष्ट झाल्या. इराणकडे भूमिगत सायलोमध्ये बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मोठा साठा असला, तरी इस्रायलने बोगद्याचे मार्ग आणि लॉन्चर्सना यशस्वीरित्या लक्ष्य केले. यामुळे इराणची ही शस्त्रे कमी वेळेत वापरण्याची क्षमता मर्यादित झाली असावी.

भारतासाठी धडा

इराण-इस्रायल संघर्ष आणि ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ हे आधुनिक युद्धाच्या विकसित होत असलेल्या स्वरूपाचे एक स्पष्ट उदाहरण आहे; ज्यात पूर्वनियोजित हल्ले, सखोल गुप्तचर यंत्रणा, बहुआयामी मोहिमा आणि प्रगत तंत्रज्ञानाची भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरली आहे.

हेमंत महाजन
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांच्या कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखावा आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात लोकसंख्यानिहाय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा. नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांची कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखून या कामांना गती द्यावी.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देवून आपले सरकार संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121