गेली पाच-सात दशके संथगतीने, पण सातत्याने वनचर, वनसंपदा, वनविद्या, वनलोक, वनसंस्कृती यांसारख्या अलक्षित विषयांवर आपल्या ललितलेखनाने अवघ्या महाराष्ट्राचे आणि कालांतराने भारताचे लक्ष वेधून घेणारे, नुकतेच ‘पद्मश्री’ने सन्मानित अरण्यातील आत्ममग्न वनऋषी मारुती चितमपल्ली अरण्यात कायमचे विसावले. त्यांचे जाणे हा समाजमनावरचा आघात आहे. त्यानिमित्ताने चितमपल्ली यांचा निसर्गसमृद्ध जीवनपट उलगडणारा हा लेख...
ज्येष्ठ साहित्यिक, व्रतस्थ वनसंत, अरण्यऋषी मारुती चितमपल्ली. या माणसाने निसर्ग वाचला होता. निसर्गाच्या इतया निकटतम सान्निध्यात वातावरणातील बदलांचे निसर्गातील विविध घटकांवर होणारे परिणाम त्यांनी अत्यंत जवळून अनुभवले. ‘निसर्गवर्णन’ हा प्रकार मराठी वाङ्मयाला नवीन नाही. मराठी साहित्यात ‘निसर्गवर्णन’ प्रामुख्याने आढळते ते कवितेमध्ये. बालकवींपासून ते ना. धो. महानोरांपर्यंत अनेक कवींनी निसर्गाचे नाना विभ्रम कवितेत टिपले आहेत. पद्याप्रमाणेच गद्यात, प्रादेशिक कादंबर्यांमधून त्या त्या ठिकाणचा परिसर, सृष्टी जिवंत झालेली वाचकांनी अनुभवली आहे. या तुलनेत अभ्यासकांनी प्रत्यक्ष फिरून, निरीक्षणे करून, नोंदी ठेवून केलेले निसर्गविषयक लेखन अल्पप्रमाणातच वाचायला मिळत असे. मात्र, गेल्या दशकभरात अशा अभ्यासपूर्ण आणि वाचनीय पुस्तकांची संख्या लक्षणीयपणे वाढत गेली आणि अशा लक्षवेधी पुस्तकांमध्ये मारुती चितमपल्ली यांची पुस्तके अग्रक्रमावर आहेत.
मारुती चितमपल्ली यांच्या आजवर प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या ‘अर्पणपत्रिका’ या त्यांच्या ठायी असलेल्या वृत्तीची कोवळीक आणि मार्दव याचे दर्शन घडवणारी आहे. चैतन्याच्या ज्या ज्या स्रोतांतून त्यांनी ज्ञान गोळा केले, आपल्या स्वयंभू शैलीने लेखनातून फुलवले, त्या त्या स्रोतांचा त्यांनी गौरव करून ठेवला आहे. चितमपल्ली यांच्या साहित्यिक मिळकतीत, त्यांच्या अर्धांगिनी सरस्वती आणि कन्या छाया यांच्या मुलखावेगळ्या त्यागाचे विशेष अप्रूप वाटते. आता त्या दोघीही या जगात नाही. पण, मारुती यांना आजवर दिले गेलेले अनेकानेक सन्मान, पुरस्कार हे खरे तर या दोघींचेही आहेत. या तिघांचा म्हणून आकारलेला भावत्रिकोण हृद्य वाटतो आणि या कुटुंबाचे जगावेगळेपण बघूनच आपणही त्यांच्यातले एक होऊन जातो.
शताब्दीच्या उंबर्यावर असतानासुद्धा स्वप्रयासाने सुदृढ राखलेली प्रकृती, कणखर जिज्ञासेपोटी तळ शोधू बघणारे मोठाले डोळे, रापलेला भक्कम दगडी चेहरा, विनयशील देहबोली आणि अरण्याच्याच चिंतनात, संकीर्तनात कायम बुडालेले चितमपल्ली ऋषिकुळातले वाटायला लागायचे नव्हे, तर ते तसेच होते आणि त्यांना बघताना, ऐकताना भारावून जायला व्हायचे. जंगलातील मुक्कामात असंख्य वन्यजीव, पक्ष्यांच्या प्रजातींचे त्यांनी बारकाईने निरीक्षण केले. कोकणच्या हर्णे गावातील समुद्रकिनार्यावरील वास्तव्यात समुद्री पक्षी तसेच समुद्री जीवांच्या हालचालींचाही अभ्यास केला. त्यातूनही पावसाळ्यापूर्वीचे सृष्टीतील असंख्य आश्चर्यजनक बदल त्यांनी टिपले. शिवाय जंगलावरच ज्यांचे जीवन अवलंबून आहे, अशा हजारो आदिवासी कुटुंबांना भेटले. त्यांच्याबरोबर जंगलात राहिले, त्यांचा विश्वास संपादन केला. पशुपक्ष्यांप्रमाणेच आदिवासींनाही उपजतच निसर्गचक्रातील बदलांचे ज्ञान असते आणि ते ज्ञान ते सहसा कोणाला देत नाहीत, हेदेखील त्यांनी पाहिले. परंतु, अशी असंख्य निरीक्षणे त्यांनी स्वतःही अनुभवली, टिपली आणि तब्बल ३५ हून अधिक पुस्तकांमध्ये त्यांचा सविस्तर उल्लेख आढळतो.
‘पक्षी जाये दिगंतरा’, ‘जंगलाचं देणं’, ‘नवेगावबांधचे दिवस’, ‘रानवाटा’, ‘जंगलाची दुनिया’, ‘चैत्रपालवी’, ‘केशराचा पाऊस’, ‘रातवा’, ‘पाखरमाया’, ‘निळावंती’ ही त्यांची काही प्रसिद्ध पुस्तके. सर्वसामान्यांना समजेल अशी साधी, सोपी, ओघवती आणि वस्तुस्थितीचे यथार्थ वर्णन करणारी रसाळ भाषा ही त्यांच्या पुस्तकाची वैशिष्ट्ये. ही पुस्तके वाचली की, जंगलात जाण्याची ओढ निर्माण होते. मी ही असाच भारावून गेलो होतो आणि जंगलांवर प्रेम करायला लागलो. जंगलाकडे बघण्याची नवी दृष्टी यातून मिळाली आणि त्यांच्या या स्वतःच्या वेगळ्या लेखनशैलीमुळे मराठी साहित्यविश्वात निसर्गविषयक लेखनाचे एक नवीन दालनच त्यांनी खुले केले. याच आगळ्यावेगळ्या निसर्गसाहित्यामुळेच मराठी सारस्वतांच्या अध्यक्षपदाची माळ २००६ साली त्यांच्या गळ्यात पडली. सोलापूर या आपल्या जन्मगावीच अध्यक्षपदाचा मानही त्यांना मिळाला आणि आता आपल्या जन्मभूमीतच ते कायमचे विसावले.
मारुती चितमपल्ली यांच्याविषयी लिहिताना कुठल्या गोष्टीला स्पर्श करावा हे कळतच नाही. कारण, ‘हात लावील ते सोने’ असे त्याचे कार्य. निसर्ग, पक्षी, प्राणी, मासे, वृक्ष, जंगल या शब्दांच्या पलीकडचे विश्व त्यांनी आपल्याला दाखवले नव्हे, त्यांच्या लेखणीतून ते प्रत्यक्ष घेऊन गेले आहेत. जंगलात जाताना कुठल्या गोष्टी अनुभवायला हव्या, ही दृष्टी त्यांनी दिली. निसर्ग माणसाला कायमच खुणावत असतो. फक्त आपण त्याच्याकडे जाण्यासाठी तयार नसतो आणि हे व्रतस्थ वनऋषी अनेक दशके तिथे जाऊन राहिले आहेत. पक्षी, प्राणी, वृक्ष आणि त्यांच्या प्रजाती ही अत्यंत संवेदनशील आणि बदलत्या हवामानाशी स्वतःला जुळवून घेणारी निसर्गाची आश्चर्यकारक निर्मिती आहे. अशी हजारो निरीक्षणे, टिपणे त्यांच्या संग्रही होती. वर्षानुवर्षे त्यांच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवली, तेव्हा कुठे त्यांच्या दिनक्रमातील बदलांचे हे रहस्य त्यांना उलगडले. खरंतर अशी रहस्ये एका दिवसात समजत नाहीत. नोकरीनिमित्ताने वनअधिकारी असल्याने वर्षानुवर्षे जंगलात राहिल्यामुळे त्यांचे आश्चर्यकारक विश्व समजून घेण्याची संधी त्यांना मिळाली.
त्यांच्या एका मुलाखतीत त्यांना उमेदीची वर्षे जंगलात आणि उतरणीला ‘वनप्रस्थाश्रम’ माणसांच्या अगम्य जंगलात, या विरोधाभासाचे दडपण येतं का? आपले लेखन मानवी पातळीवर चितारण्यात यशस्वी ठरले का? नोकरीत जंगलात सर्वस्व झोकून उधळलेले आयुष्य लेखनात झिरपले का? या प्रश्नावर चितमपल्ली यांनी दिलेले उत्तर अधिक व्यापक दृष्टी देणारे आहे. ते म्हणतात, "जंगलातली एकाग्रता, एकांतवास कालांतराने मला ग्रहण करता आला. सुरुवातीला तर भास व्हायचे की, आपल्याला वाघ दिसतोय. पण, प्रत्यक्षात वाघ नसे! अस्वल चालले आहे. पण, ते तिथे नसे! आपण ज्याला भ्रम म्हणतो तसे व्हायचे. मला वाटे की, हे असे होऊ नये. कामावरून परतल्यावर मी एकटाच. बोलायला कोणी नाही. कुणाची सोबत नाही. यातून मी वाचनाकडे ओढला गेलो. ते सगळे पाश्चात्त्य लेखकांनी लिहिलेले असे. निसर्गाविषयीचे असे. बॅसो, थोरो वाचला आणि त्यातून दिशा गवसली. स्वतःची शैली काय असावी, असा प्रश्न पडू लागला. मग जाणवले की, आपल्या अभिव्यक्तीला अनेक मिती येऊन मिळत आहेत. माणूस स्वतःची शैली घेऊनच जन्माला येतो. ती स्वीकारणे एवढेच त्याच्या हातात असते. फुलात सुगंध असतो, तो मुळातच असतो. तसे असे साधे, सरळ, सबोध शैलीतले लेखन मराठीत कुठे आहे, त्याचा शोध मी घेऊ लागलो. ते मला महानुभाव साहित्यात सापडले. दोन-तीन शब्दांची वायरचना, कुठे कुठे तर एकच शब्द! स्वामी, पारधी आणि ससा यांची कथा त्या साहित्यात आढळली. वाघाची कथा आहे. या माहिभट्टाने निसर्गाची, प्रवासाची वर्णने केली आहेत, दृष्टांत आले आहेत. ही या साहित्याच्या सौंदर्याची पराकोटीची कमाल आहे. मी ठरवूनच टाकले. अलंकार वापरायचे नाही! जोडाक्षर येऊ द्यायचे नाही आणि लिहू लागलो. लेखनाला वेगळे वळण मिळत असल्याचे मला जाणवले आणि त्यातून लेखन झाले.”
त्यांच्या वडिलांनी जशी वाचनाची वाट दाखवली, तशीच आईने अरण्यवाटेची! अशिक्षित असली, तरी पशुपक्ष्यांविषयी तिला खूप काही माहिती होते. चंडोल पक्ष्याला ‘माळचिमणी’, कोकिळेला ‘कोयाळ’, सातबहिणीला ‘बोलाड्या’, लावा म्हणजे ‘भुरगुंज्या’ अशी किती तरी पाखरांची नावे तिच्याकडूनच ऐकली. हरणाच्या नराला ‘काळवीट’ आणि लांडग्याच्या मादीला ‘लासी’ असा नर-मादीतला फरक तिनेच शिकवला. आयुष्यभर हरणाची शिकार करणार्या शिकारी भीमाचा मृत्यू हरणासारखा तडफडत झाला, ही तिने सांगितलेली गोष्ट आयुष्यभर न विसरता येणारी आहे. ‘माळढोक’ हे नाव तिच्याच तोंडून पहिल्यांदा ऐकले. आईने रंगाविषयी दिलेल्या ज्ञानाचा उपयोग मला फुलांच्या आणि पाखरांच्या रंगांचे हुबेहूब वर्णन करताना झाला. रंगांच्या छटांना निवडून त्यांना अचूक नाव देण्याचे तिचे कौशल्य जंगलप्रवासात बहुमौलिक ठरले. डाळिंबी, मनुका, कथ्था, जास्वंदी, लाल, शेंदरी, गुलाली, मेंदी, गव्हाळी, जांभा, पोवळा, शरबती या तांबड्या रंगांच्या छटा; जिलेबी, लिंबू, सायी, चांदणी, सोनेरी, केशरी, केतकी या पिवळ्या रंगाच्या छटा; लिंबोळी, पोपटी, शेवाळी या हिरव्या रंगाच्या छटा; अस्मानी आणि आनंदी या निळ्या रंगाच्या छटा; दुधिया, मोतिया आणि चांदी या पांढर्या रंगाच्या छटा; काळा करवंदी, बुक्का रंग, शिसवी, चंद्रकळा या काळ्या रंगाच्या छटा; दुअंजिरी, बैंगणी आणि मावा या जांभळ्या रंगाच्या छटा; गवळा, हरणा, कोसा, कवडी, मठ्ठ, मिसरी, मोरपंखी, राखी, अबोली की रंगांचे मिश्रण. अरण्यवाटेच्या आवडीसाठी आई जशी कारणीभूत ठरली, तसेच लिंबामामा अरण्यविद्येतले पहिला गुरू होते. प्राणी, पक्षी, वनस्पती तो न बोलता नजरेने दाखवायचा. पाखरांच्या गोड किलबिलीत ओढ्यातल्या वाहत्या पाण्यात शिंदीच्या झाडांच्या पडछाया दिसत. त्यातच मावळणार्या सुंदर चांदण्या डोकावत. शिंदीच्या बनात सुगरण पक्ष्याची शेकडो घरटी उंच फांदीवर डोलताना दिसायची आणि त्यातली काही नळकांड्यांसारखी, काही अंडाकृती, पण त्यात सुगरण पक्ष्याला शिरलेले मी कधी पाहिलेले नाही. वीण झाल्यानंतर सोडलेली ती घरटी असल्याचे त्यावेळी मामाकडूनच कळले. रुई, धोतरा, निवडुंगाची माजलेली झुडपे आणि बोरी, बाभळी, निंबाची काटेरी झुडपे रानात चुकवून चाललो. त्या झाडाखालून होल्यांची घरटीही शोधली. फुलपाखरांच्या मागे जात गवतामधील कीटकांचे संगीत ऐकायला ते तिथेच शिकले.
मारुती चितमपल्ली यांची दिनचर्या वाखाणण्यासारखी होती. त्याबद्दल त्यांच्या अनेक प्रगट मुलाखतीत त्यांनी सांगितले आहे. पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास उठणे, थोडे आवरून झाल्यावर प्राणायाम आणि योगासने करणे. या प्राणायामामुळेच मधुमेहासारख्या घातक व्याधीवर त्यांनी नव्वदीत ही नियंत्रण मिळवले होते. मग त्यांचे लेखन सुरू होई. ९ वाजेच्या सुमारास हलकासा नाश्ता आणि दूध. त्यानंतर भोजनापर्यंत परत लेखन आणि वाचन. एक ते दीडच्या सुमारास शुद्ध शाकाहारी जेवण. चितमपल्ली हे वनखात्यात असूनही शाकाहारी होते, याचे अनेकांना आश्चर्य वाटते. कारण, वनाधिकारी म्हणजे ‘खाणारा’ आणि ‘पिणारा’ अशी अनेकांची समजूत असते. मात्र, सगळेच अधिकारी असे नसतात. दुपारी थोडी वामकुक्षी आणि सायंकाळी परत लेखन-वाचन. रात्री मात्र ते लवकरच झोपत. थोडेसे रूक्ष आणि कठोर वाटणारे मारुती चितमपल्ली संगीताचे फार मोठे चाहते होते. समयसूचकता आणि संयम हे मारुती चितमपल्लींचे खास गुण. प्रदीर्घ काळ जंगलात असल्याने कदाचित ते गुण सहज आले असावे.
मारुती चितमपल्ली यांनी वन्यजीवांच्या सखोल अभ्यासाकरिता संस्कृत, जर्मन, रशियन भाषेचे अध्ययन केले. तसेच शिमला, भरतपूर, बंगळुरु, कान्हाकिसली, दिल्ली येथे वन्यजीवशास्त्राचे अध्ययनही केले. नवेगाव आणि नागझिरा अरण्याचा विकास केला. पशुपक्ष्यांच्या रक्षणाच्या विविध योजना राबविल्या, संग्रहालय उभारले. पाखरांसाठी नवेगाव तळ्यासाठी वड-पिंपळाची झाड लावली. पशुपक्ष्यांसाठी जे काही करता येईल, ते सारे काही केले. पण, स्वतःकडे त्याचे मोठेपण कधीही घेतले नाही. निरपेक्षपणे कार्य करत राहिले. पुरस्कारांची अपेक्षा त्यांनी कधीही ठेवली नाही. दूर जंगलात राहून आत्ममग्न असणारे वनऋषी हे खरे ‘पद्म’ पुरस्काराने शोभून दिसणारे व्यक्तिमत्त्व होते. केंद्र सरकारने यांच्या कार्याची दखल घेतली आणि नुकतीच त्यांना ‘पद्मश्री’ने सन्मानित केले. या निसर्गवेड्या लेखकाचा योग्य सन्मान आणि त्यांच्या कार्यातून ते जागतिक कीर्तिमान स्थापित करणारे झाले.
मारुती चितमपल्ली यांनी ६६ वर्षे जंगलात भटकंती केली. जवळपास पाच लाख किमी प्रवास केला. १३ भाषांचे ज्ञान, चार कोशांचे लेखन पूर्ण केले. प्राणीकोश, मत्स्यकोश, वृक्षकोशाचे कामही केले. पक्षिकोशाची तिसरी आवृत्ती सुरू आहे. निसर्गातील हा ठेवा समाजाला कळावा, या भावनेतून सतत कार्यरत राहणारे आणि सकारात्मक विचाराचा ऊर्जाकोश म्हणजे विख्यात लेखक मारुती चितमपल्ली होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजी शब्दांना मराठीत दिलेले पर्यायी शब्द आज रुळलेत. तसेच कार्य जंगलाच्या बाबतीत मारुती चितमपल्ली यांनीही करून ठेवले आहे. अरण्य आणि त्याभोवताली विणल्या गेलेल्या विश्वातील कितीतरी घटकांना चितमपल्ली यांनी आपल्या शब्दांमध्ये गुंफले आहे. पक्षी असोत की वनस्पती, कितीतरी नवी नावे केवळ त्यांच्यामुळे मराठी साहित्यात नोंदवली गेली आहेत. या मूळ तेलुगू भाषिक माणसाने मराठीला सुमारे एक लाख शब्दांचा खजिना उपलब्ध करून दिला आहे.
त्यांना एकदा भेटल्यावर विचारले होते की, "तुम्हाला सर्वाधिक भावलेले तुमचे पुस्तक? आणि का?” म्हणून त्यावर ते लगेच म्हणाले, " ‘रानवाटा!’ उत्तम आहे. जंगलातले जे जे दिसले, माणूस, कथा ते सर्व इथे गोळा झालेे. त्यामुळे ते वाचनीय झाले आहे. म्हणून आवडते आणि जगनियंत्याकडे काय मागणे मागावेसे वाटते? काय राहून गेले ? त्यावर ते म्हणाले, "समुद्राशी जवळीक, मैत्री नाही करू शकलो, हिमालयातली रानबकरी आता नाही पाहू शकणार. पुनर्जन्म असेल, तर बौद्ध भिक्खूचा मिळावा म्हणजे तिबेट, समुद्र, हिमालय असा प्रवास करता येईल.” या अरण्याऋषीने अरण्यासाठी आयुष्य वेचले ते नित्य स्मरणात राहतीलच. पण, आपण त्यांचे सदैव ऋणी असायला हवे.
सर्वेश फडणवीस
८६६८५४११८१