योगविरोधाचे राजकारण

    21-Jun-2025
Total Views |

‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा व्हायला लागून आता दहा वर्षे झाली. योगाबद्दल विविध काळात, विविध देशांत व अनेक भाषांमध्ये पुस्तकेही लिहिली गेली, ती मुख्यत्वे योगासने वा योगविज्ञानाबद्दल! सरकारी पातळीवरून यशस्वीपणे केलेली मुत्सद्देगिरी व योगाच्या अवतीभवतीने जगात चाललेल्या राजकारणाचा परिचय करून देणारे ‘योगाचे विश्व-विश्वातला योग’ हे नयन सहस्रबुद्धे लिखित आगळेवेगळे पुस्तक रविवार, दि. २२ जून रोजी डॉ. गंधार मंडलिक, डॉ, आनंद नाडकर्णी, डॉ, उल्का नातू यांच्या हस्ते मराठा मंडळ हॉल, मीनाताई ठाकरे रोड, भक्ती मंदिर, पाचपाखाडी, ठाणे (प) येथे सायंकाळी ५ वाजता प्रकाशित होणार आहे. त्यानिमित्ताने या पुस्तकातील एका प्रकरणाचा संपादित भाग देत आहोत.

आपण ‘पोस्ट-मॉडर्न’ म्हणजे आधुनिकोत्तर काळात जगत आहोत. या काळाचे वैशिष्ट्य म्हणजे परंपरा नाकारणे, नवे प्रयोग करणे. शैली, स्वरूप, आकृतिबंध, रचनाबंध यामध्ये नवता आणणे. विविध शैली एकत्रित आणून नवीनच काही घडवणे, नव्या संकल्पनांची अभिव्यक्ती घडवणे म्हणजे ‘फ्युजन.’ मूळच्या हिंदू संस्कृतीत निर्माण झालेली योगपरंपरा तिच्या मूळ आध्यात्मिक स्वरूपापासून दूर जात आहे, याची चिंता वाटणेही अत्यंत स्वाभाविक आहे. सांस्कृतिक संकरातून योगाची नवी प्रारूपे तयार होत आहेत. सामाजिक अभिसरणाच्या या गतिमान प्रक्रियेतून, तंत्रज्ञानाच्या भडिमारातून नवनीत निघेल, असा विश्वास ठेवायला हवा. दहा हजार वर्षांची जिवंत ज्ञानपरंपरा लेचीपेची नक्कीच नाही. अनेक नवोन्मेष तिने पाहिले, झेलले, पचवले असतीलच. सरकारी व अधिकृत पातळीवर मात्र, त्यात तडजोड करू नये, तत्त्वे पातळ करू नये, ही अपेक्षाही अवाजवी नाही.

भारताच्या वाढत्या सांस्कृतिक, आर्थिक व सामरिक प्रभावाला रोखण्यासाठी, हिंदू धर्माला विरोध व ‘हिंदूफोबिया’तून संघटित प्रयत्न होत आहेत. अशा ‘ख्रिश्चन योग’, ‘मुस्लीम योग’ किंवा ‘ज्यू योग’ प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांकडे भारताने जागरूकतेने पाहिले पाहिजे. आवश्यक तिथे कृतीही केली पाहिजे. योग अन्य धर्मीय देशांमध्ये, समाजांमध्ये लोकप्रिय होत आहे, असे चित्र एका बाजूला, तर दुसर्या बाजूला भारतात व अन्य देशांत वाढणारा ‘हिंदूफोबिया’ हे कटू वास्तव आहे. त्याविरोधात जागरूक असलेले भारतीयांचे समूह वेगवेगळे कृती, कार्यक्रम सोशल मीडिया कॅम्पेन्स करत असतात.राजकीय पक्षांच्या वेगवेगळ्या भूमिका, होणारे मतांचे ध्रुवीकरण, सरकारांना कोंडीत पकडण्यासाठी चालवले जाणारे ‘ट्विटर हॅशटॅग’, भारतात चालणारी आंदोलने, मुद्दाम उकरून काढले जाणारे मुद्दे व वाद सतत पटलावर येत असतात. असे सगळे घडत असताना सौदी अरेबियात होणारा योग महोत्सव, पाकिस्तानात योगी शमशाद हैदर यांच्या योगवर्गांना सरकारची परवानगी व वाढता लोक प्रतिसाद यांची संगती कशी लावायची?

योगासनांमधील आकृतिबंध आणि मुस्लीम प्रार्थनेमधले आकृतिबंध यामधील साम्यस्थळे दाखवणारे लेख, पुस्तके, व्हिडिओ उपलब्ध आहेत. ताडासन व तकबीर, रूकु आणि उत्थानासन, बलासन आणि सुजुद, वज्रासन आणि जुलुस असे काही समांतर आकृतिबंध दाखवून नमाज पढण्यातून योगाचे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक फायदे मिळवले जातात व गेली एक हजार, ४०० वर्षे हे फायदे मुस्लीम साधकांना होत आहेत, असे ‘मुस्लीम योग’ या नावाने ठसवायचा प्रयत्न केला जातो.

दि. १५ ऑटोबर १९८९ रोजी व्हॅटिकनने कॅथलिक चर्चेसच्या बिशप्सना एक पत्र पाठवले. त्या पत्रात चर्चा आहे, ख्रिश्चन उपासना, ध्यानाची. पण, योग व अन्य पौर्वात्य, न-ख्रिश्चन ध्यानाच्या पद्धतींचा दुरूपयोग किंवा धोयाकडे निर्देश केलेला आहे. दि. ९ जानेवारी २०१५ रोजी पोप फ्रान्सिस यांनी व्हॅटिकन रेडिओवरून केलेल्या धर्मोपदेशात ते म्हणतात, "हजारो योगाची सत्रे किंवा झेन वर्ग साध्य करू शकणार नाही, ती तुमचे हृदय देवाप्रति समर्पित करण्याची शक्ती केवळ ‘होली स्पिरीट’मध्ये आहे.” हा विरोधाचा अवगुंठित प्रकार!

जगभरच एकच ठराविक शिकवण्याची समान पद्धत नसलेला व त्याबद्दलची सुस्पष्ट भूमिका, नियमावली, नियामक संस्था, रचना नसलेला, अनुभूतीला प्राधान्य व विशेष स्थान असलेला, भारतात विकसित झालेला असला, तरीही दोनएकशे वर्षांपूर्वीपर्यंत डोंगर, गुहांमध्ये दडून असलेला, गूढतेचे वलय असलेला, अभिजनांपर्यंत न पोहोचलेला, प्रयोगांना मुक्त वाव असलेला योग जगाने आपल्याला हवा तसा न वळवला, वाकवला असता तरच नवल! भरीत भर विविध धर्मांच्या समाजांनी त्याचा स्वीकार केला आणि एका दृष्टीने त्याचा सांस्कृतिक अपहार झाला. काहीवेळा गैरवापरही झाला व होतो आहे, हे मान्य करावे लागते.

कधी योग हा सैतानी आहे म्हणायचे, कधी म्हणायचे तो धार्मिक नाही, तर आध्यात्मिक आहे. असे म्हणून ख्रिस्ती किंवा मुस्लीम अध्यात्माचे त्यावर कलम करायचे, असा हा दुटप्पी प्रकार घडतो.‘सोऽहम, सोऽहम’च्या ऐवजी ‘हमऽसा हमऽसा’ म्हणत प्राणायाम करायचा! जगभर मोठ्या प्रमाणात राजकारण चालते, सामान्य अहिंदू व्यक्ती मात्र ‘आम्हाला आकाशातल्या बापाची प्रार्थना करायला शिकवली आहे, योग अंतर्मनात डोकावायला सांगतो, आम्ही देव एकच मानतो तो अल्ला, मग सूर्यनमस्कारात सूर्याची आराधना कशी करून चालेल?’ अशा प्रश्नांनी वेढलेली असते. त्यांना मोठे तात्त्विक प्रश्न पडत नाही, पण मनात संभ्रम असतो.

आधुनिक युगातील योगावर जागतिकीकरण, नववसाहतवाद, उपभोगवाद यांचा प्रभाव आहे. नवउद्यमींनी योगाला वस्तू रूपात सादर करणे आणि त्याची प्रसिद्धी करणे, हे कसे केले जाते, याचे विवेचन अँड्रिआ जैन यांनी केले आहे. ‘काऊंटर कल्चर’ किंवा ‘प्रति-संस्कृती’ म्हणजे समाजातल्या प्रस्थापित व्यवस्था किंवा संकेतांना विरोध करणारी नवी पद्धत रूढ करणे. योगाच्या बाबतीत ‘काऊंटर कल्चर’ म्हणजे काय? योगपरंपरेचे मुख्य प्रवाह, मूल्ये आणि पद्धतीपासून योगाला दूर करणे. १९व्या व २०व्या शतकात अमेरिका व पाश्चात्त्य देशात योगाची मूळ संकल्पना, रूढ पद्धत याहून वेगळी पद्धत रूजवली गेली. भारतीय आस्था व हिंदू जीवनदृष्टी यावर पाश्चात्य संस्कृती, अवधारणा व मूल्ये यांचे कलम केले गेले आणि एक समांतर योगपद्धती विकसित केली गेली व रूढ झाली. मूलतः आध्यात्मिक असलेल्या योगाला आधुनिक वा पूर्व आधुनिक काळात अनेक उद्देश जोडले गेले ते कमनीय बांध्यापासून, लैंगिक क्षमता वाढवण्यापर्यंत!

एका बाजूला हिंदू राष्ट्राभिमानी गट ‘गिव्ह बॅक योग’सारखे टोकाचे आंदोलन चालवतात. दुसर्या बाजूला स्वमताग्रही ख्रिश्चन व मुस्लीम ‘हिंदू फोबिया’प्रमाणेच ‘योगा फोबिया’ने ग्रासलेले दिसतात, तर नवलिबरल भांडवलदार योगाला बाजारात उभे करून विकू पाहतात. स्वतःच्या तुंबड्या भरून घेतात. तेव्हा महत्त्वाचे आव्हान उभे राहते ते योग त्याच्या मूळ गाभ्यासह जिवंत ठेवण्याचे. परंपरा आणि नवतेचा संगम करतानाही आपल्या मूळ परंपरा जपण्याचे!

‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करायला सुरुवात झाल्यावर जशी योगाबद्दलची उत्सुकता वाढली, प्रसार वाढला, योग ही भारताची सौम्य संपदा आहे, यादृष्टीने पाहिले जाऊ लागले. गेल्या अनेक वर्षांत जशी योगाला प्रसिद्धी मिळताना दिसते व जगभरातल्या समाजांकडून, लोकसमुदायांकडून पाठिंबा मिळताना दिसतो. तसेच, वेगवेगवेळ्या कारणांसाठी विरोधही होताना दिसतो.

योगाचे भारतीयत्व, योगामधली आध्यात्मिकता नाकारून ‘ख्रिश्चन योग’, ‘मुस्लीम योग’, ‘ज्यू योग’ अशी नवनवी प्रारूपे येऊ लागली आहेत. ‘ख्रिश्चन योग’ म्हणजे पारंपरिक हिंदू योगपद्धती-आसने, ध्यान, श्वसनाचे व्यायाम प्रकार यांचा ख्रिश्चॅनिटी अंगांनी सराव! मुख्यतः हठयोगाचे शारीरिक फायदे, मानसिक फायदे पाहून विदेशांनी त्याला जवळ केले. आता ख्रिश्चन योगाद्वारे ख्रिस्ती तत्त्वे व श्रद्धा दृढ करण्यासाठी त्याचा उपयोग केला जात आहे. ब्रुक ब्रून हिने ‘ख्रिश्चन योग’ या नावाने योगवर्ग, योग शिक्षक प्रशिक्षण सुरू केले व त्याचा प्रसार वाढतो आहे. याशिवाय ‘हॅपी पोझेस’, ‘प्रेझ मूव्हज’ अशा नावाने योगासने शिकविली जातात.

आधुनिक जगातला योग म्हणजे आसन, प्राणायामापुरता! आध्यात्मिक उद्देशाशिवाय, श्रद्धेशिवायच तो पाश्चात्यांच्या हातात गेल्याने त्याचे व्यावसायिकरण व वस्तूकरण झाले आहे. कोट्यवधी लोक योग करतात, तेव्हा तो मूळ रूपात, शुद्ध स्वरूपात केला जाण्याची शयता कमी होते. योग लोकप्रिय होत आहे. पण, ‘योगासम’ राहिला नाही याचे दुःखही होते. पाश्चिमात्य जिमनॅस्टिस, कवायत, शरीरसौष्ठव, नृत्य यांनी आजच्या योगासनांचे आकृतिबंध, हालचाली, क्रम, ताल, गती प्रभावित झालेली आहे. आता आजच्या संकरित, संमिश्र योगाच्या स्वीकाराशिवाय काही पर्याय आहे, असे दिसत नाही. या वास्तवाशी भारत सरकारच्या धोरणांनीही जुळवून घेतले असावे. योग दिनानिमित्त तयार केलेल्या आसनसंचामध्ये सूर्यनमस्कारांचा समावेश नसण्याचे हे एक कारण असावे. तरीही योगावरची आक्रमणे थांबवणे, योग्य तेथे निषेध नोंदवणे, विरोध करणे ही जबाबदारी सरकारने घ्यायला हवी. सर्वधर्म समभावाने योग विस्तारेल, हे खरे असले, तरी ‘स्व’ ओळख पुसलेला योग मात्र पोरका होईल, हा धोका आहे.

नयना सहस्रबुद्धे
पुस्तकासाठी संपर्क - परम मित्र प्रकाशन
९९६९४९६६३४, केवळ व्हॅाट्सअॅप मेसेजसाठी- ९००४८९७६६२
पुस्तक अॅमेझॉनवर उपलब्ध