पंतप्रधान नरेंद्र मोदींचे तिसरे पर्व

    04-Jun-2024   
Total Views |
pm narendra modi third term


लोकसभेच्या निवडणुकांमध्ये विजय मिळवून सलग तीनवेळा पंतप्रधान बनण्याचा मान मिळवणारे नरेंद्र मोदी देशाच्या इतिहासातील केवळ दुसरी व्यक्ती आहे. हे यश निर्भेळ नाही. सलग दोनवेळा पूर्ण बहुमताचे सरकार चालवल्यानंतर आघाडी सरकार चालवणे सोपे असणार नाही. तरीही, निवडणुकांच्या या वर्षामध्ये जगभरात सर्वत्र सत्ताधारी पक्ष पराभूत होत असताना, राष्ट्रीय लोकतांत्रिक आघाडीला बहुमत मिळवून देण्यात नरेंद्र मोदींचा मोलाचा वाटा आहे. आघाडी सरकार चालवत असताना देशहिताचे निर्णय घेताना मर्यादा येतात. परराष्ट्र धोरणावरही त्याचा परिणाम होऊ शकतो.

2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत देशाच्या इतिहासात बहुधा पहिल्यांदाच परराष्ट्र धोरणाने सरकारच्या पुनर्निवडणुकीत मोलाची भूमिका बजावली. यापूर्वी बांगलादेशनिर्मिती युद्धाचा इंदिरा गांधी तसेच कारगिल युद्धाचा अटलबिहारी वाजपेयींना निवडणुका जिंकण्यात फायदा झाला होता. पण, त्याला ‘परराष्ट्र धोरण’ म्हणता येणार नाही. नरेंद्र मोदींनी परराष्ट्र धोरणाला सुस्पष्ट दिशा दिली. त्यात नवीन ऊर्जा फुंकली. विकासनीती आणि विदेशनीती यांना सुशासनाच्या धाग्याने एकत्र गुंफले. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा, समृद्धी, संस्कृती, संवाद आणि भारतीयांचा जगाच्या पाठीवर सन्मान या पंचामृताला विशेष महत्त्व दिले. परराष्ट्र धोरणामध्ये राज्यांना विशेष महत्त्व दिले. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा मर्यादित आकार आणि संसाधने लक्षात घेऊन प्रवासी भारतीयांना भारताचे सांस्कृतिक राजदूत बनवले. इंटरनेट आणि समाजमाध्यमांच्या प्रभावी वापराने भारताची जागतिक छबी बनवली.

सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांमध्ये, जसे की, ‘मेक इन इंडिया’, ‘डिजिटल इंडिया’, ‘स्किल इंडिया’ आणि ‘स्वच्छ भारत’, तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्यावर भर देण्यात आला. पंतप्रधानांनी भेट दिलेल्या जवळपास प्रत्येक देशात प्रवासी भारतीयांशी संवाद साधला आणि त्यांना मोठा प्रतिसादही मिळाला. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर भारत कोणतीही तडजोड करणार नाही, हे म्यानमार सीमेवरील पाकव्याप्त काश्मीरमधील आणि बालाकोट येथील ‘सर्जिकल स्ट्राईक’द्वारे दाखवून देण्यात आले. डोकलाम आणि गलवान खोर्‍यांतील चकमकीनंतर भारत वेळप्रसंगी चीनच्या डोळ्यांत डोळे घालून पाहू शकतो, हे जगाला दिसून आले. आंतरराष्ट्रीय योग दिन, तसेच जागतिक नेत्यांसह गंगाआरती केल्यामुळे भारतीय संस्कृतीची तोंडओळख जगभरात झाली.

पहिल्या पाच वर्षांमध्ये भारताला जगाशी जोडल्यानंतर आपल्या दुसर्‍या टर्ममध्ये मोदींनी अत्यंत गुंतागुंतीच्या आणि क्लिष्ट विषयांमध्ये जगाचे नेतृत्व करण्याची आपली क्षमता सिद्ध केली. ‘कोविड-19’च्या संकटकाळात भारतात हाहाकार माजेल, ही जागतिक आरोग्य तसेच अर्थतज्ज्ञांची भविष्यवाणी त्यांनी खोटी ठरवली. ‘कोविड-19’ प्रतिबंधक तीन लसींची भारतात निर्मिती होऊन ती जगभरातील 100 पेक्षा अधिक देशांना पोहोचवण्यात आली. संकटप्रसंगी स्वार्थी वृत्तीने वागणार्‍या विकसित देशांच्या नेतृत्वाला भारताने चपराक दिली. याचवेळी चीनने लडाखमध्ये घुसखोरीचे प्रयत्न केले असता, त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. एवढ्यावरच न थांबता, जोपर्यंत चीन आपला विस्तारवाद सोडत नाही, तोवर त्याच्याशी व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रात मोकळेपणाने व्यवहार केले जाणार नाहीत, हे भारताने दाखवून दिले. उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातील चीनवर अवलंबित्व कमी करण्यासाठी आत्मनिर्भरतेचा नारा देण्यात आला. आज अमेरिका आणि पाश्चिमात्य देश चीनच्या बाबतीत असेच धोरण राबवताना दिसत आहेत. ‘कोविड-19’च्या काळात जागतिक अर्थतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार उपाययोजना करताना अनेक देश कर्जबाजारी झाले. आज कर्ज काढून लोकांना मदत केल्यास ‘कोविड’ची तीव्रता कमी झाल्यानंतर झालेले आर्थिक नुकसान भरून काढता येईल, असा विचार त्यांनी केला होता. पण, प्रत्यक्षात ‘कोविड’च्या एकापाठोपाठ एक लाटा येत गेल्या.


यावेळी भारताने अत्यंत गरीब लोकांना मोठ्या प्रमाणावर मदत करताना देशाची आर्थिक शिस्त बिघडू दिली नाही. त्यासाठी त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर टीकाही सहन करावी लागली. ‘कोविड-19’ काळात चीनने प्रदीर्घ काळासाठी आपले दरवाजे बंद ठेवले. त्यानंतर रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे पुरवठासाखळ्या विस्कळीत झाल्या. त्यामुळे जगभरातील अनेक देशांना महागाईचा सामना करावा लागला. त्यातून सहारा वाळवंटाच्या क्षेत्रातील अनेक देशांमधील राजवटी उलथवल्या गेल्या. अनेक देशांमध्ये सत्तांतर झाले. यावर्षी अनेक देशांमध्ये निवडणुका आहेत. ब्रिटन आणि अमेरिकेत सत्तांतर होईल, तर युरोपीय महासंघाच्या निवडणुकांमध्ये उजव्या विचारसरणीच्या पक्षांना मोठे यश मिळेल, असा अंदाज आहे. अनेक जागतिक नेत्यांच्या लोकप्रियतेने तळ गाठला असताना पंतप्रधानपदाची दहा वर्षे पूर्ण करत असलेल्या नरेंद्र मोदींची लोकप्रियता आश्चर्यचकित करणारी आहे. मोदींच्या पाच वर्षांतील धोरणाचा या निवडणुकीत फायदा झाला आहे. 2014 साली पंतप्रधान होण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय संबंधांचा विशेष असा कोणताही अनुभव नसताना त्यांनी ही कामगिरी केली आहे. त्यामुळे जगातील पहिल्या तीन मोठ्या नेत्यांमध्ये नरेंद्र मोदींचे नाव घेतले जाते. तिसर्‍यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यापासूनच मोदींकडून मोठ्या अपेक्षा केल्या जाणार आहेत.

2014 साली नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेत असताना शपथविधीला ‘सार्क’ गटातील देशांच्या नेत्यांना बोलावले होते. 2019 साली पूर्वेकडील विस्तारित शेजारातील म्हणजेच ‘बिमस्टेक’ गटाच्या नेत्यांना बोलावण्यात आले होते. यावेळच्या शपथविधीला आखाती देशांच्या नेत्यांना बोलावण्यात येईल, अशी अपेक्षा आहे. नुकतीच चीनने आखाती अरब देशांच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. त्यात अमेरिकेवर अवलंबून असणार्‍या अरब देशांना साद घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यास भारत कशाप्रकारे उत्तर देतो, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. अवघ्या आठवडाभरातच पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी ‘जी-7’ परिषदेला उपस्थित राहतील. जगातील सात सर्वांत श्रीमंत देशांच्या गटात आजवर अनेक दशके रशियाचा आठवा देश म्हणून समावेश होता. युक्रेन युद्धाचे निमित्त करून रशियाची हकालपट्टी करण्यात आली.

‘जी-7’ नेत्यांनी चीन आणि रशियाला वगळून भारताला विशेष अतिथी म्हणून निमंत्रित केले आहे. या बैठकीला युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्कींनाही बोलावण्यात आले आहे. युक्रेनच्या मुद्द्यावर भारताची भूमिका ‘जी-7’ देशांना मान्य नसली, तरी आज या युद्धाची कोंडी सुटावी, यासाठी ‘जी-7’ देश भारताच्या सक्रिय मदतीची अपेक्षा करत आहेत. यापूर्वी झेलेन्स्कींनीही मोदींकडे मदत मागितली होती. अमेरिकेत सत्तापालट होऊन ट्रम्प अध्यक्ष झाले, तर युक्रेनला वार्‍यावर सोडतील, अशी भीती आहे. गेल्या काही दिवसांत रशियाच्या आक्रमणाला धार आली असून युक्रेनमधील दुसरे सगळ्यांत मोठे खार्किव्ह शहर रशियाच्या हातात पडण्याची भीती आहे. या परिस्थितीत भारत दोन्ही बाजूंना मान्य होईल, असा काही मध्यममार्ग काढू शकतो. त्यादृष्टीने ही भेट महत्त्वाची आहे. भारताच्या शेजारी देशांपैकी अनेक देश चीनच्या कह्यात गेले असून, त्यांना चीनच्या प्रभावाखालून बाहेर आणणे अवघड आहे.

आघाडी सरकार चालवताना नरेंद्र मोदींना प्रादेशिक पक्षांच्या कलाने अनेक निर्णय घ्यावे लागतील. सुदैवाने या सरकारमध्ये सीमेवरील पंजाब, बंगाल किंवा तामिळनाडूमधील प्रादेशिक पक्ष नसल्यामुळे, ते महत्त्वाच्या विषयांवर अडवणूक करू शकणार नाहीत. मागील दोन विजयांच्या तुलनेत मोदींचा आत्ताचा विजय लहान वाटत असला, तरी अन्य लोकशाही देशांमध्ये होत असलेल्या निवडणुकांमध्ये लागत असलेले निकाल बघितले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्थान अजूनही भक्कम असल्याचे दिसून येते.


अनय जोगळेकर

आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणाचे अभ्यासक असून राजकीय घडामोडींचे विश्लेषक आणि विशेष प्रकल्पाधिकारी म्हणून ते गेली १२ वर्षं कार्यरत आहेत. वाणिज्य शाखेतील पद्व्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली आहे. एकात्मिक जलव्यवस्थापन या विषयात ते मुंबई विद्यापीठातून पीएचडी करत आहेत.  इंटरनेट, तंत्रज्ञान, समाज माध्यमं आणि जागतिकीकरण हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. संगणकीय मराठी आणि भारतीय भाषांमध्ये माहिती तंत्रज्ञान सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी काम केले असून सध्या राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळात ते अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. मुक्त स्तंभलेखक म्हणून ते गेली ८ वर्षं विविध वर्तमानपत्र तसेच ब्लॉगच्या माध्यमातून लिहित आहेत.