भावबंधनाचा ‘वानोळा’

    11-May-2025   
Total Views | 10
भावबंधनाचा ‘वानोळा’

आपल्या जीवनात भूतकाळातील आठवणींचे अवशेष मनाला सुखावणारे असतात. परंतु, या सुखाच्या पलीकडे जाऊन खर्‍या अर्थाने आपण जेव्हा त्या त्या काळाचे अन्वयार्थ लावतो, तेव्हा समृद्ध असे विचारसंचित जन्माला येते. याच गोष्टीची प्रचिती म्हणजे नरेंद्र पाठक यांचा ललित लेखसंग्रह ‘वानोळा.’


वानोळा म्हणजे प्रेम आणि दातृत्वाच्या भावनेने दिलेली भेटवस्तू. ही भेटवस्तू देताना, त्यामध्ये ममत्वाचा भाव असतो. एक प्रकारचा आपलेपणा, जो माणसाला माणसाशी जोडत जातो. माणुसकीच्या याच उत्कट भावनेची अभिव्यक्ती म्हणजे, नरेंद्र पाठक यांनी लिहिलेला ललित लेखसंग्रह ‘वानोळा.’ अध्यापनकार्यात जीवनाची महत्त्वाची वर्षे सक्रिय राहिलेले नरेंद्र पाठक यांची, जगाकडे बघण्याची स्वतःची एक दृष्टी आहे. त्यांच्या विचार संचितामध्ये भोवतालाची प्रेरणा जरी असली, तरीसुद्धा त्यांच्या लिखाणामध्ये मात्र केवळ अनुभूतीचे स्वरच उमटतात. हा ‘स्व’ गाठण्यासाठी अंतरमनात डोकावावे लागते, याची प्रचिती आपल्याला हे ललित लेख वाचताना येते. बरेचदा भूतकाळात डोकावताना आपण त्या स्मृतींच्या जगात स्वतःला हरवून बसतो, परंतु खर्‍या अर्थाने त्या स्मृतींकडे कसे बघावे, हे ‘वानोळा’ या ललित लेखसंग्रहातून आपल्याला लक्षात येते.

आठवणींचे, स्मृतींचे, आपल्या आयुष्यात विशेष महत्त्व असते. वर्तमान असाहाय्य झाले की, बरेचदा माणूस भावविवश होऊन भूतकाळात रमतो. परंतु, लेखकाने कटाक्षाने ही भावविवशता टाळली असल्याचे दिसून आले आहे. लेखकाने आपल्या लिखाणाला संवेदनशीलतेची जोड देत, आपल्या जीवनातील निवडक प्रसंग वाचकांसमोर मांडले आहेत. काळाच्या ओघात, आपल्या गावकुसांनी प्रगतीची वाट धरली. या प्रगतीकडे लेखक अत्यंत सम्यक् दृष्टीने बघत आहे, याची आपल्याला प्रचिती येते. ‘छोट्या मंदिरांच्या जागी मोठी देवस्थाने येतील, पण देवळातून देवच निघून गेला तर उपयोग काय?’ असा प्रश्न विचारताना, लेखकाच्या भावनेची व्याप्ती आपल्या लक्षात येते. प्रगतीच्या वाटेवर चालत असताना, माणसाचे माणूसपण जपणे केवळ महत्त्वाचेच नसून अपरिहार्य आहे, हे आपल्याला त्यांच्या लेखनातून उलगडत जाते.

‘निजरुप दाखवाहो’ हा लेख म्हणजे भक्तीचा प्रसन्न दृष्टांत आहे. हभप विश्वनाथ बुवा यांची जीवनयात्रा सांगताना, लेखकाने तल्लीन होऊन तो काळ आपल्यासमोर उभा केला आहे. विश्वनाथ बुवा यांची महायात्रा आणि त्यांच्या मुलाची गोष्ट वाचताना, अक्षरशः भक्तियोगाची प्रचिती येते. पत्रलेखन म्हणजे केवळ संवादाचे माध्यम नव्हते, त्या पत्रांच्या माध्यमातून व्यक्ती आपल्या जीवनाची अनुभूती दुसर्‍यांपर्यंत पोहोचवते. म्हणूनच शब्दांना जिवंतपणा प्राप्त होत असे. या जिवंतपणाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी लेखकाने ‘पत्रसंस्कार’ हे शीर्षक निवडले, असे वाटते. छोट्याशा गावातून, खेड्यातून शहरात आलेल्या माणसांचं भावविश्व अत्यंत निराळं असतं. हे निराळेपण पत्रांच्या माध्यमातून आपल्यासमोर अत्यंत सुरेख पद्धतीने उलगडण्यात आले आहे. ‘पत्रलेखन हा निव्वळ व्यवहार नसून, ही एक मानसिक प्रक्रिया आहे,’ असे म्हणत लेखकाने पत्रसंस्काराकडे बघण्याची नवीन दृष्टीच आपल्याला दिलेली आहे, असं वाटतं.

साने गुरुजी यांची पुतणी सुधा यांनी लिहिलेलं पत्र, त्यामागची भावना याचे विवेचन लेखकाने अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत पोहोचवले आहे. अनुभवांची ही साखळी वाचताना मोठ्या माणसांचं मोठेपण नेमकं कशात आहे, याची वाचकाला प्रचिती येते. भागवत गुरुजी अर्थात लेखकांचे वडील यांचे व्यक्तिचित्र लिहिताना, त्यांच्याप्रति असलेला कृतज्ञभाव आपल्याला दिसून येतो. महात्मा गांधी यांनी आपल्या विचारांमधून श्रमाचं आणि घामाचं महत्त्व लोकांना सांगितलं होतं. ‘घाममहात्म्य’ हा लेख आजच्या तरुण पिढीने समजून घ्यावा, त्याचं मोल आपल्या समाजाला कळावं, म्हणून लिहिला गेला आहे. सामाजिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रात वावरणार्‍या नरेंद्र पाठक यांनी आपल्या भोवतालाचा आणि समाजमनाचा गाभा समजून घेऊन, ही अभिव्यक्ती सादर केली आहे. यामध्ये भूतकाळात रमणं नाही, उपदेशपर शिकवणे नाही, आहे तो फक्त एक पाण्यासारखा नितळ प्रवाह. मात्र, या प्रवाहात प्रत्येकाला आपला सूर गवसेल, हे नक्की. ज्येष्ठ लेखक, कवी महेश केळुस्कर यांनीसुद्धा या ललित लेखसंग्रहाला दिलेली दाद वाखणण्याजोगी आहे. प्रस्तावना म्हटले, की काही अंशी पुस्तकाची कोरडी ओळख वाचायला मिळते, परंतु महेश केळुस्कर यांनी रसिकत्वाच्या नात्याने या पुस्तकाला दाद दिली आहे.

जीवनाची अनुभूती सांगणारे साहित्य हे मुळातूनच कमी प्रमाणात लिहिलं जातं. आपल्या अनुभवांमध्ये बरेचदा दुसर्‍यांच्या जीवनाचं प्रतिबिंब उमटलेलं असतं. यामुळे एका प्रकारचा कृत्रिमपणा, आपसुकच अभिव्यक्तीमध्ये येतो. हा कोरडेपणा झटकून, आपला ‘स्व’ शोधणे, त्या अनुषंगाने लेखनकार्य करणे, ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. नरेंद्र पाठक यांनी ही अवघड जबाबदारी अत्यंत लीलया पार पाडली आहे. त्यांचे भावस्पर्शी लेखन मनाला सुखावणारे तर आहेच, पण त्याचबरोबर येणार्‍या काळासाठी दिशादर्शकसुद्धा आहे याची प्रचिती ‘वानोळा’ वाचताना येते.


पुस्तकाचे नाव : वानोळा
लेखकाचे नाव : डॉ. नरेंद्र पाठक
प्रकाशक : सृजनसंवाद प्रकाशन
किंमत : 250/-

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121