मुलांचे नाटक

    17-May-2025
Total Views |
Children Theatre


नाटकाची ताकद अफाट आहे. नेमकेपणाने सूचक संदेश देण्याचे काम नाटकामार्फत उत्तम जमते. नाटकातील संदेश प्रेक्षकांच्या मन आणि बुद्धीलाही स्पर्श करून जातो. अर्थात ही ताकद फक्त प्रौढ रंगभूमीपुरती मर्यादित नसून बालरंगभूमीलाही या शक्तीचे वरदान मिळाले आहे. त्यामुळेच मुले अतिशय सुंदर अशा नाट्यकलाकृती सादर करतात. मुलांच्या नाटकामधील लहान-लहान अनुभवांचा घेतलेला मागोवा...


नाटकाच्या जगात अशक्य असे काहीच नाही. इथे चॉकलेटचा बंगला आहे, मनी मावशीचे घर आहे आणि इथे पुस्तकाचे दार असलेली झोपडी आहे, इथे काहीही शक्य आहे. अशक्याला शक्य करून दाखवण्याची कल्पनाशक्ती इथे आहे. मनाला अमर्याद सुख देणारे हे ठिकाण आहे आणि रोमारोमात उत्साह, ऊर्जा भरेल अशी जादूसुद्धा याच ठिकाणात आहे. माझ्या या छोट्याशा बालनाट्यसृष्टीबाबत म्हणायचे झाल्यास, ‘किती बोलू कौतुके परि जीवन-कोषाशी ही पैजा जिंके.’

एक नाट्य प्रशिक्षक म्हणून मी दोन जगातून मुक्त विहार करते. एक म्हणजे वास्तविक जग आणि दुसरे म्हणजे बालनाट्याचे जग. सध्यातरी उन्हाळी सुट्ट्या लागल्या असल्याकारणाने, बालनाट्य शिबिरांमध्ये स्वतःला बुडवून घेतलेले आहे. परवाच एका शिबिराचे सत्र संपवून हा लेख लिहायला घेतला. त्यामुळे अजूनही शिबिराच्या शेवटाला मुलांनी सादर केलेले नाटक माझ्या डोक्यातून काही जात नाही. त्याच प्रभावाखाली असल्याने मी आज ‘त्यांचे नाटक,’ म्हणजेच ‘मुलांचे नाटक’ यावर लिहिणार आहे.
माझ्या बालपणी नागरिकशास्त्र या विषयाचा अभ्यास करत असताना एक वाक्य फारसे समजले नसल्याने पाठच करून टाकले होते ‘लोकतंत्र म्हणजे लोकांचे, लोकांसाठी, लोकांकडून सरकार.’ पण याचा अर्थ बालनाट्य प्रशिक्षण देत असताना लावता आला आणि तो म्हणजे, बालनाट्यशास्त्र म्हणजे मुलांचे, मुलांसाठी, मुलांकडून करून घेतलेले नाट्य. अर्थातच त्यात नाट्यशास्त्र आलेच, हे काही वेगळे सांगायची गरज नाही. बालपणी माझ्या वाचण्यात आले होते की, आफ्रिकेतील एका गावात बँकेतल्या कामापासून घरकामापर्यंत सारे काही, लहान मुलेच करतात. ही कल्पनाच भन्नाट वाटली होती. खरेच असे होत असेल? काय मज्जा नाही! भारतात असे गाव असल्याचे माझ्या ऐकण्यात नाही. पण, मी माझ्या बालपणी भन्नाट मजा अनुभवली ती नाटकामुळेच. ती मजा, ते स्वातंत्र्य, ती मोकळीक मी माझ्या विद्यार्थ्यांना देते. उन्हाळी बालनाट्य शिबीर असतेच त्यासाठी. जिथे त्यांना त्यांचा शोध घ्यायचा असतो. एक विश्व उभारायचे असून, त्यात सहभागी व्हायचे असते. इतर शिबिरांप्रमाणेच बालनाट्य शिबिरांचीही उद्दिष्टे असतात. नाटक म्हणजे काय, अभिनय म्हणजे काय, विषयाची तोंड ओळख ही नाट्य खेळांद्वारे केली जाते. मग तयारी सुरू करायची असते ज्यासाठी मुलं आलेली असतात त्याची,अर्थात नाटकाची. उन्हाळी नाट्यशिबिरात मी कायमच मोकळे ढाकळे वातावरण ठेवत असते. तुम्हाला हवे ते करा, हवे तसे सादरीकरण करून दाखवा. कुठलेही बंधन नाही. हं, पण जबाबदारीने वागा एवढेच सांगणे असते. नंतर मुलांना सगळेच करायचे असते; विषय निवडण्यापासून लेखन, दिग्दर्शनापासून ते अभिनयापर्यंत. मग ते एक एक विषय मांडायला लागतात, आपापसात चर्चा करतात. ही प्रक्रिया बघण्यासारखी असते. भांडणे, हसणे, रुसणे, फुगणे, रडणे सगळे होते. इथे कोणी मोठे-छोटे नसते, प्रत्येकजण महत्त्वाचाच. जसे कुटुंबातला प्रत्येक व्यक्ती महत्त्वाचा असतो अगदी तसाच. मग माझा सहभाग असतो तो मार्गदर्शक म्हणून. कुठे दुखले, खुपले, अडले, नडले तर मी आहेच. मग ते समस्या घेऊन येतात, त्यांचे समाधान मी शोधायला लावते. अगदी नाहीच मिळाले, तर ‘मी आहे’ आणि एवढेसुद्धा त्यांना पुरेसे असते.

यंदा मी मुलांकडून दोन नाटके सादर करून घेतली, एक ‘सोशल मीडिया पथनाट्य’ बसवले. प्रा. प्रसन्न शेंबेकर यांनी आम्हाला ते लिहून दिले. तसेच मुलांनीही एक नाटक तयार केले, त्याचे नाव होते ‘बोरन्हाण.’ यात त्यांनी मला सांगितले की, मुलांना बोलावण्यात येत नाही कारण, मोठ्यांना मुले आवडत नाहीत. त्याचा शेवट त्यांनी अशा काही वाक्यांनी केला की, ती वाक्यच मुलांच्या आईवडिलांना चटका लावून जाणारी ठरली. नाटक हे प्रभावी माध्यम आहे, जे सहज दैनंदिन जीवनात सांगून समजत नाही. ते रंगभूमीवर उभे राहून शक्य होते आणि त्याचा प्रभाव प्रेक्षकांच्या मनावर, परिणामी बुद्धिवरही होतो. या वेळेला मी समाजमाध्यामांचा होणारा दुष्परिणाम हा विषय निवडून, तो मुलांकडून बसवून घेतला. कारण, त्याचे परिणाम मुलांनाही भोगावे लागत आहेत. हे नाटक मुलांचे, मुलांकडून पण मोठ्यांसाठीचे होते. दोन नाटके बसवल्यामुळे त्यांना त्यांचे नाटक बसवताना उपयोगी ठरले. रॅडी, तू जसे नाटक बसवते आहेस, तसे आमचे होत नाही, काहीतरी कमतरता जाणवते आहे. नाटकाला सुरुवात, मध्य आणि शेवट आवश्यक. तो जर मिळाला नाही, तर मन अस्वस्थ होते. मुलं अस्वस्थ झाली की गोजिरवाणी होतात आणि त्यांना त्यांचा मार्ग सापडला की, फुलासारखी टवटवीत.

घटनांचा मनावर होणारा प्रभाव, त्यातून उत्पन्न होणारे विचार, त्यावर चर्चा, संवाद यातून नाटक बसवले. पण, त्याआधी अनेक वेळा तालमीत ते फसले, कोलमडले. पण, मी ते कसे होऊ देईन! मुलांना मोकळीक होती पण, शिस्तीचा लगाम होताच. नाही तर ती घोडे आणि मेंढरांसारखे मोकाट आणि सैरभैर झाली असती. पण, शेवटाला मी येऊन नाटक चांगले कसून घेतले आणि मगच ते प्रेक्षकांसमोर उभे राहिले. मुलांचे हावभाव, हालचाली, वाक्यरचना आणि रूपक विचार प्रेक्षकांवर प्रभाव पाडत होते आणि हे सर्व मी बघत होते. आता ते सगळे इथे दाखवणे शक्य नाही पण, शब्दातून व्यक्त झालेले त्यांचे भाव मी तुमच्यापर्यंत पोहोचवते आहे. नाटकाचा शेवट त्यांनी काही वाक्यातून केला, ती वाक्य अशी...

1. तुम्हाला असं वाटतं की आम्हीच भांडतो, पण तुम्हीसुद्धा लहान मुलांसारखे भांडता. मग आम्हालाच मोठं होऊन तुमची भांडणं सोडवावी लागतात.
2. आईबाबा तुम्ही असा विचार का करत नाही आम्ही वेड्यासारखे वागतो, त्याच्यामागे काही तरी कारण असेल, जे तुमच्या लक्षात येत नाही.
3. तुम्ही जे इतरांशी बोलता, काय बोलता, कसं बोलता, ते आम्ही बघत असतो आणि ऐकतसुद्धा असतो. अगदी ‘अ‍ॅलेक्सा’सारखे.
4. तुम्ही आम्हाला जोरदार रागावता किंवा आमची चूक नसताना मारताही, तेव्हा आम्हाला खूपच वाईट वाटतं.
5. कधी कधी तर खोटं काय आणि खरं काय हेच कळत नाही, मग आम्ही प्रश्न विचारतो. प्रश्न विचारल्यावर म्हणता किती प्रश्न विचारतोस? मग आम्ही संभ्रमात राहतो.
6. आम्ही शहाण्यासारखे घरात खेळात असलो, तर म्हणता जा जरा बाहेर जाऊन खेळा. बाहेर खेळायला गेलो तर शेजारच्या काकू म्हणतात, इथे कशाला खेळता. मग आम्ही खेळायचे तरी कुठे?
7. इंग्रजीमध्ये नको बोलूस मराठीत बोल. मराठीत बोलायला गेलो, तर इंग्रजी कशी आलीच पाहिजे हे सांगत बसता. मग आम्ही कुठल्या भाषेत बोलायचे हे तरी नक्की सांगा!
8. आगाऊ, शिष्ठ, मॅड, मूर्ख, वेडा, बावळट असं म्हणता. आम्ही खरंच असे आहोत का?
9. तुम्ही आम्हाला खूप आवडता, आम्हाला तुम्ही हवे आहात. आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो. पण वागायचं कसं तेच कळत नाही. आजच्या ’बोर न्हाण’ या नाटकात लहान मुलांना बोलावलेच नाही, असे आमच्याबरोबर तर नाही होणार ना?
ही वाक्य बाणासारखी आईबाबांच्या काळजाला जाऊन भिडली. नाटकाचे जग मुलांनी अनुभवले आणि मोठ्यांनी? बालनाट्यसृष्टी किती व्यापक आहे, याचा अनुभव घेतला.

रानी राधिका देशपांडे