आमटे हे नाव महाराष्ट्रात माहीत नसणारा विरळच! बाबा आमटे यांचे कार्य, त्यानंतर डॉ. प्रकाश आमटे यांनी त्याचा केलेला विस्तार आणि आता पुढच्या पिढीने त्यात घातलेली भर म्हणजेच ’नवी पिढी, नव्या वाटा’ हे पुस्तक होय. त्या पुस्तकाचा हा परिचय...
काही पुस्तकं आपल्याला क्षणात आपलीशी वाटतात. खरं तर अनुभवांचा शब्दबद्ध समृद्ध खजिना म्हणजे पुस्तक. मग ती कुठलीही असली, तरी त्यातील अनुभव दिशादर्शक आणि प्रेरणादायीच असतात. असंच डॉ.प्रकाश आमटे लिखित ‘नव्या पिढी नव्या वाटा’ वाचनात आले. नव्या पिढीतील अनिकेत दादाने भेटून हे पुस्तक दिले. आमटे कुटुंबातील समाजसेवेचा वसा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील प्रत्येकालाच परिचित आहे. 2009 साली प्रकाशित झालेले डॉ. प्रकाश आमटे लिखित ‘प्रकाशवाटा’ आणि त्यानंतर आलेला ‘प्रकाश बाबा आमटे’ या सिनेमाने, गडचिरोली भामरागडचं दुर्गम आदिवासी जग आणि या आदिवासींसाठी ‘लोकबिरादरी’ने उभं केलेलं काम पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर आलं.
आपल्यापैकी बहुतेकांना हेमलकसाचे स्थान, तिथे सुरु असलेले काम चालू आहे, याची कल्पनाही नव्हती. खरं तर दुर्गम जंगलात रुजणं, आदिवासींचा विश्वास मिळवणं आणि त्यांचं जगणं सुसह्य करण्यासाठी सोयीसुविधा पुरवत राहणं यातच डॉ. प्रकाश आमटे आणि त्यानंतरची पुढची पिढी कार्य करत आहे. आज ‘लोकबिरादरी’चं काम आणखी कितीतरी पटींनी वाढलं आहे, वाढतं आहे. डॉ. दिगंत-अनिकेत आणि डॉ. अनघा-समीक्षा यांनी, कार्यकर्त्यांची नवी पिढी घडवत कामाला पुढची दिशा दाखवली आहे आणि याचीच गोष्ट म्हणजे ’नव्या पिढी नव्या वाटा’ हे पुस्तक. अर्थात, त्याआधी ‘लोकबिरादरी’ प्रकल्पाच्या सुरुवातीच्या टप्प्याची थोडी माहिती घेणे आवश्यक आहे. 2008 साली डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदा आमटे यांना ’रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार जाहीर झाला. त्याआधी हे दाम्पत्य प्रसिद्धीपासून दूर महाराष्ट्राच्या जणू एखाद्या अज्ञात बेटावरच आपले आयुष्य जगत होते. त्यावेळी बाबा आमटे यांच्यामुळे काही मंडळींना गडचिरोलीत आदिवासींसाठी काम सुरू असल्याचं ऐकून माहीत होतं; पण भामरागडमधल्या आदिवासींसाठी काम सुरू करण्याची कल्पना बाबा आमटे यांची आणि ती याच दाम्पत्याने प्रत्यक्षात उतरवली. त्याचे वटवृक्षात रूपांतर होण्याचा प्रवास म्हणजे ’नव्या पिढी नव्या वाटा’ हे पुस्तक आहे.
शिक्षण आणि आरोग्य या ‘लोकबिरादरी’ प्रकल्पातल्या पायाभूत गोष्टी आहेत. भामरागडमध्ये रुजणं व आरोग्य-शिक्षणाच्या सोयीसुविधा उभ्या करण्यासाठीच डॉ. प्रकाश आमटे यांची तब्बल 40 वर्षे गेली. आदिवासींमध्ये जाऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, आर्थिक उन्नतीसाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. या भागात पूर्वी नक्षलवाद्यांचा वावर असलल्याने, गावांमध्ये जाऊन काम करण्यावरही मर्यादा होत्याच. ही मर्यादाही ‘लोकबिरादरी’च्या पुढच्या पिढीने गेल्या काही वर्षांत ओलांडली. आज अनिकेत आमटे आणि सहकार्यांनी, हेमलकसाच्या पंचक्रोशीतल्या गावांमध्ये विकासाची अनेक कामे सुरू केली असून, ‘लोकबिरादरी’च्या दृष्टीने हा खरा पुढचा टप्पा आहे.
‘लोकबिरादरी’ प्रकल्प फक्त आरोग्यसेवेपुरता मर्यादित नाही, आदिवासींचा सर्वंकष विकास हे त्यांचे स्वप्न आहे. त्यावेळी आदिवासींच्या मागासलेपणातील अनेक कारणांपैकी, दारिद्—य आणि निरक्षरता ही त्यातली मुख्य कारणं. या लोकांकडे जंगलाचे ज्ञान अफाट. आपल्या शहरी लोकांपेक्षा आदिवासी जास्त सुसंस्कृत आणि ज्ञानी होते, पण त्याचा उपयोग त्यांचं पोट भरण्यासाठी होत नव्हता. म्हणूनच त्यांच्या मुलांसाठी मोफत शाळा सुरू करायची, असं ठरलं. त्यानुसार दवाखाना थोडाफार स्थिरावल्यावर, 1976 मध्ये ‘लोकबिरादरी’ येथे शाळेला सुरुवात झाली. हे कामही मोठं आव्हानात्मक होतं.
भामरागडसारख्या ठिकाणी आरोग्यक्षेत्रात नवी आव्हानं सातत्याने येत असताना कितीही कामं केली, तरी ते पुरेसं ठरत नाही. त्यामुळे आरोग्यसेवेची ही मशाल नव्या पिढीला सतत पुढे नेत राहावी लागणार आहे. डॉ. दिगंत आमटे आणि डॉ. अनघा आमटे यांनी अलीकडच्या काळात रुग्णालयाबाहेर वाढवलेला आणखी एक उपक्रम म्हणजे,’ स्कूल हेल्थ अवेअरनेस प्रोग्रॅम’ (शेप). इतर ठिकाणांप्रमाणे, तिकडेही किशोरवयीन मुलांचे अनेक प्रश्न लक्षात येत होते. या मुलांना लैंगिक शिक्षणाची गरज जाणवू लागली होती. भामरागड तालुक्यातल्या सगळ्याच शाळांमध्ये हा प्रयत्न करणं गरजेचं होतं आणि त्याची सुरुवात या नव्या पिढीने कशी केली यासाठी ‘नवी पिढी नव्या वाटा’ वाचायला हवे.
बाबा आमटे यांनी हेमलकसात प्रकल्प सुरू करण्याचं ठरवलं, तेव्हा त्यामागे इथल्या आदिवासींना अन्न-वस्त्र मिळावं, आरोग्याच्या सुविधा आणि व्यवसाय शिक्षण मिळावं, असा विचार होता. मुळात चंद्रपूर, गडचिरोली हे जिल्हे अतिमागास होते आणि भामरागडातल्या आदिवासींचा तर बाह्य जगाशी संपर्कही नव्हता. शिकायचं म्हणजे काय करायचं, त्याचा आपल्याला काय उपयोग होईल, हे त्यांना माहीतच नव्हतं. ते पिढ्यान्पिढ्या सर्वांपासून तुटलेलं आयुष्य जगत आले होते आणि त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं गरजेचं होतं. त्याचा प्रवासही ‘नवी पिढी नव्या वाटा’ यात वाचायला मिळतो. अनिकेत आमटे आणि समीक्षा आमटे यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या शैक्षणिक विकासकामांमुळे, ‘लोकबिरादरी’ प्रकल्पाला आणखी एक विधायक आयाम मिळाला आहे. बाबा आमटे यांनी हेमलकसात येताना जे व्यापक स्वप्न पाहिलं होतं, ते पूर्ण करण्यासाठी पुढच्या पिढीचे झटणे ही समाधानाची बाब आहे.
अर्धशतकापूर्वी पहिल्या पिढीने एका सुरु केलेल्या प्रवास पुढच्या पिढीनेही अखंड ठेवाला आहे आणि हे पाहण्याचं भाग्य आधीची पिढीदेखील आता अनुभवत आहे. आज महाराष्ट्रातली हजारो माणसं ‘लोकबिरादरी’ प्रकल्पाशी जोडली गेली आहेत. त्यामुळे या प्रकल्पात नवं काय घडत आहे, हे त्यांना सांगणे कर्तव्य होते; म्हणूनच पुस्तकाची निर्मिती झाली. साधारणपणे दहा-बारा वर्षांपूर्वी प्रकल्पाची जबाबदारी नव्या पिढीने घेतल्यानंतर कामाचा आवाका केवढातरी वाढला आहे. म्हणूनच ‘प्रकाशवाटा’ हे पुस्तक असतानाही त्यानंतरच्या घडामोडींची गोष्ट या पुस्तकरूपाने, डॉ. प्रकाश आमटे यांनी मांडली आहे. आज ‘नव्या पिढी नव्या वाटा’ हे पुस्तक ‘लोकबिरादरी’ प्रकल्पाची 50 वर्षे पूर्ण झाल्यावर आलेले आहे. ‘लोकबिरादरी’ प्रकल्पाशी जोडल्या गेलेल्यांना यातील नवनवे पैलू आणि आयाम आनंद-समाधान देणारे आणि नव्या मंडळींना परिवारात सामील करून घेणारे आहेत. आमटे कुटुंबातील लोककल्याणाचा प्रवास सर्वांनी आवर्जून वाचावा, हीच कामना.
पुस्तकाचे नाव : नव्या पिढी नव्या वाटा
लेखक : डॉ. प्रकाश आमटे
प्रकाशक : समकालीन प्रकाशन - पुणे, संपर्क क्र. 020-24470896
मूल्य : 200