रोहित-विराट नंतर पुढे काय?

    17-May-2025
Total Views |
what will happen to indian cricket team after Virat and Rohit


निवृत्ती ही प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यातील न टाळता येणारी घटना असते. प्रत्येक खेळाडू निवृत्त होतच असतो. त्यानंतर पुन्हा एकदा संघाची नव्याने बांधणी होते. जुने खेळाडू निवृत्त झाल्यावर नव्या दमाचे खेळाडू त्यांची जागा घेतात. मात्र, योग्य खेळाडू मिळणे यासाठी फार महत्त्वाचे असते. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय संघासमोरही असेच काही प्रश्न उभे राहिले आहेत. भारतीय क्रिकेट संघ आणि भारतीय चाहते यांच्यासमोरील याच प्रश्नांचा घेतलेला हा आढावा...


रोहित आणि विराट कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाले. पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट संक्रमण करू पाहत आहे. अर्थातच प्रत्येक संघाला या परिस्थितीचा सामना करावाच लागतो. खेळ हा कोणत्याही खेळाडूपेक्षा नक्कीच मोठा आहे. त्यामुळे एखादा खेळाडू निवृत्त झाल्यानंतर आता आपले कसे होणार, हा विचार कोणताही संघ करू शकत नाही, करूही नये. 2011 ते 2013 या काळात आपल्या दिग्गज खेळाडूंनी एक एक करत कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली; पण नंतर रोहित, विराट, अजिंक्य, पुजारा, शिखर यांसारख्या खेळाडूंनी त्यांची जागा भरून काढली होतीच. विचार करता, आता रोहित आणि विराटच्या निवृत्तीनंतरदेखील नवीन येणारे खेळाडू त्यांचीही जागा भरून काढतील हे नक्की. पण, इथे येणारा हा पण नक्कीच महत्त्वाचा आहे. कारण, गेल्या आठ ते दहा वर्षांमध्ये क्रिकेट चांगलेच बदलले आहे.

2023-25 या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या काळात आपण आपले वर्चस्व अगदी सहज घालवले. 2024 साली आपण अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे सर्वांत प्रबळ दावेदार होतो. पण, न्यूझीलंडच्या संघाने आपल्याला आपल्याच घरात 0-3 असा ‘व्हाईटवॉश’ दिला आणि सगळेच चित्र बदलले. पुढे ऑस्ट्रेलियच्या संघानेदेखील आपल्याला हरवले आणि सलग दोन वेळा कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी खेळल्यानंतर, तिसर्‍यावेळी मात्र आपण या स्पर्धेतून बाद झालो. जानेवारीमध्ये संपलेल्या ऑस्ट्रेलियाच्या मालिकेनंतर काही महत्त्वाच्या घडामोडी घडणार या होत्याच. अपेक्षेप्रमाणेच रोहित-विराट जोडीने निवृत्ती जाहीर केली. मागच्यावर्षी ‘टी-20’ विश्वचषक जिंकल्यानंतर दोघेही ‘टी-20’ क्रिकेटमधून एकत्रच निवृत्त झाले होते, तर आता काही दिवसांच्या अंतराने दोघांनीही कसोटी क्रिकेटला अलविदा केले. दोन मोठे खेळाडू एकत्र एका फॉरमॅटमधून बाहेर पडणे, कोणत्याही संघाला मानवणारे नाही. त्यात इंग्लंडचा दौरा आता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्या दौर्‍यासाठी संघनिवड होताना, रोहित आणि विराट दोघांचीही निवड होणार नाही. अशावेळी या संघात कोण असू शकेल, रोहित-विराटची जागा कोण घेईल, भारतीय संघाचा कर्णधार म्हणून कोणाची निवड होईल, असे असंख्य प्रश्न क्रिकेट रसिकांना पडले आहेत.
दोन दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीनंतर त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागेल? हा पहिला प्रश्न आहे. भारतीय क्रिकेटकडे पाहता आपली ‘बेंच-स्ट्रेंग्थ’ नक्कीच चांगली आहे. आजच्या घडीला चांगले क्रिकेट खेळणारे अनेक खेळाडू आपल्याला आढळून येतील. फक्त अडचण इतकीच आहे की, आपण प्रत्येक फॉरमॅटला योग्य खेळाडूची निवड करण्यात अपयशी ठरतो. दुर्दैवाने ‘आयपीएल’ हा आपल्यासाठी यशाचा महामार्ग झाला आहे आणि त्या महामार्गावरून प्रवास करणारे खेळाडू लवकर पुढे जातात. रोहित शर्मा हा आपला सलामीचा फलंदाज. त्याच्या तोडीचा दुसरा सलामीचा फलंदाज शोधणे, हे आपल्या निवड समितीपुढे मोठेच आव्हान असणार आहे. तामिळनाडूचा साई सुदर्शन, बंगालचा अभिमन्यू ईश्वरन आणि महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड हे या स्थानासाठी प्रमुख दावेदार असतील. इंग्लिश हवामानात सलामीचा फलंदाज कायमच महत्त्वाचा ठरतो. अशावेळी यशस्वी जयस्वालबरोबर भारतीय डावाची सुरुवात कोण करेल? हे सांगणे जरा अवघडच आहे. शुभमन गिल किंवा के. एल. राहुलदेखील भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करू शकतील. पण, सलामीला इतर खेळाडूंना संधी देऊन, मधल्या फळीसाठी हे दोन्ही खेळाडू जास्त योग्य वाटतात. सध्या सलामीच्या जागेसाठी नक्कीच अनेक दावेदार आहेत. अर्थातच या प्रत्येक फलंदाजासाठी इंग्लिश दौरा कठीण असेल, हे देखील तितकेच खरे.

सलामीच्या फलंदाजाबरोबरच आपल्याला मधल्या फळीचीदेखील चिंता आहे. विराटच्या निवृत्तीनंतर चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार आणि गरज पडल्यास संघाची धुरा कोण खांद्यावर घेणार, हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविकच. विराट गेली 10 ते 12 वर्षे ही जबाबदारी, समर्थपणे पार पाडत होता. जरी गेल्या तीन ते चार वर्षांमध्ये त्याची कामगिरी लौकिकास साजेशी झाली नसली, तरीही विराटसारखा खेळाडू संघात असणे महत्त्वाचे होते. आता त्याच्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीनंतर राहुल, श्रेयस अय्यर यांसारखे फलंदाज ही जबाबदारी पार पाडतील, अशी आशा आहे. खरे पाहता के. एल. राहुलसारख्या फलंदाजाला आता त्याचे योग्य स्थान मिळू शकेल. राहुल भारतीय संघात आल्यापासून त्याची जागा कधीच नक्की झाली नाही. कधी तो पाचव्या-सहाव्या क्रमांकावर खेळला, तर कधी सलामीचा फलंदाज म्हणून. आता विराटनंतर राहुलकडे त्याचा पर्याय म्हणून बघता येऊ शकेल. श्रेयस अय्यर आणि सर्फराज खान हे दोन मुंबईकरदेखील या जागेचे दावेदार असतील. श्रेयस तसा जबाबदारीने खेळणारा खेळाडू आहे पण, सर्फराजचा अनुभव अजून तोकडा आहे. कसोटी क्रिकेट हे वेगळे गणित आहे आणि ते त्याच पद्धतीने सोडवले पाहिजे, हा विचार सर्फराजसारख्या नवोदित खेळाडूंनी आता करणे आवश्यक आहे. विदर्भाच्या करुण नायरचादेखील या जागेसाठी विचार होऊ शकतो. गेल्या वर्षभरात देशांतर्गत सामन्यांमध्ये त्याने खोर्‍याने धावा केल्या आहेत. अशावेळी फॉर्ममध्ये असलेल्या नायरला आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची एक संधी मिळाली पाहिजे.

रोहितच्या निवृत्तीमुळे ‘कर्णधार कोण’ असा एक नवीनच पेचप्रसंग निर्माण झाला आहे. भारतीय कर्णधार हा काटेरी मुकुट आहे. आता रोहितनंतर तो मुकुट परिधान करण्यासाठी अनेक नावे समोर येत असून, शुभमन गिल, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह हे त्यातील प्रमुख दावेदार. यापैकी बुमराहने एक-दोन कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे आणि अनेक रसिकांना, समीक्षकांना हे कर्णधारपद बुमराहकडेच जावे असेही वाटते. पण, एका वेगवान गोलंदाजाने आजवर दीर्घकाळ भारतीय संघाचे नेतृत्व केले नाही. (कपिल देव हा खर्‍या अर्थाने अष्टपैलू खेळाडू, त्याला फक्त वेगवान गोलंदाज म्हणणे योग्य नाही.) त्यामुळे बुमराहकडे ही जबाबदारी येण्याची शक्यता तशी कमीच आहे. अर्थात बुमराहने त्याचे नेतृत्वगुण वेळोवेळी दाखवले आहेत, हे नक्की. जसप्रीत बुमराह हा वेगवान गोलंदाज आहे आणि सर्वच वेगवान गोलंदाजांप्रमाणे तोदेखील बरेचदा दुखापतग्रस्त असल्याचे दिसून येते. भरीस भर म्हणून तो जेव्हा संघात असतो, त्यावेळी आपण बरेचदा त्याच्यावर मोठा भार टाकतो. अशावेळी त्याच्याकडे कर्णधारपदाची अतिरिक्त जबाबदारी देता येईल का? या प्रश्नाचे उत्तर निवड समितीने शोधणे आवश्यक आहे. अर्थात बुमराह वेगळा विचार करणारा, खेळामध्ये काही नवीन गोष्टी आजमावू पाहणारा खेळाडू आहे. त्यामुळे कर्णधार म्हणून तो कायमच वेगळा वाटत आला आहे.

रिषभ पंतकडे भारताचा पुढचा कर्णधार म्हणून बघता येईल का? हादेखील प्रश्नच आहे. कदाचित खेळाच्या शॉर्ट फॉरमॅटमध्ये (एकदिवसीय आणि टी-20) तो कर्णधार म्हणून प्रभावी ठरेलही पण, कसोटी क्रिकेटमध्ये तो कितपत यशस्वी होईल, हे सांगणे अवघड आहे. कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी वेगळ्या मानसिकतेची गरज असते आणि बरेचदा पंतच्या फलंदाजीमध्ये ती मानसिकता दिसत नाही. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेतदेखील तो अनेकदा बेजबाबदार फटके मारून बाद झाला. त्याचा खेळ ‘शॉर्ट फॉरमॅट’साठीच जास्त योग्य आहे. याच कारणांमुळे तो कर्णधारपदाचा मुख्य दावेदार वाटत नाही. या शर्यतीत सर्वांत आघाडीवर असलेले नाव म्हणजे शुभमन गिल. गिलकडे सुरुवातीपासूनच भविष्यातील कर्णधार म्हणून बघितले गेले आहे. पण, तोदेखील कसोटी क्रिकेटमध्ये काही प्रमाणात चाचपडतानच दिसतो. गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये त्याने काही प्रसंगी चांगला खेळ केला असला, तरीही त्याच्या खेळात सातत्य नाही. अशावेळी कर्णधार म्हणून तो कितपत प्रभाव टाकू शकेल, हे सांगणेदेखील अवघड आहे. या तिन्ही खेळाडूंचा अनुभव लक्षात घेता, जसप्रीत बुमराहकडे भरती संघाची धुरा जावी असे वाटते, पण प्रत्यक्षात शुभमन गिलचे पारडे जड आहे हेदेखील खरे.

विराट किंवा रोहित, दोघांनीही एकदिवसीय सामन्यांत जास्त चांगली कामगिरी केली आहे. ते अजूनही काही दिवस एकदिवसीय क्रिकेट खेळतील देखील पण, खास करून कसोटी क्रिकेटमध्ये त्यांची उणीव नक्कीच भासत राहील. रोहितने कर्णधार म्हणून आणि विराटने मधल्या फळीचा कणा म्हणून वेळोवेळी चांगला खेळ केला आहे. अर्थात गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये त्यांची कामगिरी म्हणावी तशी झाली नाही. पण, हे दोघे संघात असताना एक प्रकारे विजयाची शाश्वती असे. दुर्दैवाने नवीन खेळाडूंमध्ये ती कमतरता जाणवते. सध्याचे खेळाडू ‘टी-20’ क्रिकेटच्या आणि त्यातही ‘आयपीएल’च्या मुशीत तयार झालेले खेळाडू आहेत. त्यांची कामगिरी त्या खेळासाठी योग्य असेलही कदाचित पण, कसोटी क्रिकेट हे वेगळे तंत्र आहे. त्यासाठी वेगळ्या पद्धतीची मानसिकता लागते, वेगळ्या पद्धतीने स्वतःला तयार करावे लागते. आक्रमक खेळ हा सध्याचा स्थायीभाव आहे. परंतु, कसोटी क्रिकेटमध्ये अनेकदा हा आक्रमकपणा बाजूला ठेवून आपला डाव रचावा लागतो. सचिन, द्रविड, लक्ष्मण यांसारखे खेळाडू ज्यावेळी आपला डाव रचत, त्यानंतर त्या कसोटी सामन्यांची मजा काही वेगळीच असे. विराटसारखा दर्जेदार फलंदाजदेखील, कसोटी क्रिकेटमध्ये त्याची आक्रमकता वेगळ्या पद्धतीने दर्शवित असे. नवीन येणार्‍या खेळाडूंमध्ये कोणावर भिस्त ठेवावी, हे सांगणे थोडे अवघड जाणार आहे.

अर्थात क्रिकेट संघांमध्ये बदल होणार हे स्वाभाविक आहे. कालानुरूप नवीन खेळाडू येणार आणि आपली योग्यता सिद्ध करत संघ उभारणीला मदत करणार, हेदेखील आपण वेळोवेळी बघितले आहे. नवीन खेळाडूंनी रोहित-विराटच्या निवृत्तीकडे ‘संधी’ म्हणून बघितले, तर ते नक्कीच चांगली कामगिरी करतील. येणार्‍या कालावधीत इंग्लंड विरुद्धचे पाच कसोटी सामने भारतीय क्रिकेटची दिशा दर्शविणारे असतील. सध्याच्या घडीला भारतीय संघात असलेल्या काही खेळाडूंनी, ऑस्ट्रेलिया दौर्‍यामध्ये चांगला खेळ केला आहे. या खेळाडूंच्या प्रतिभेबद्दल काहीच शंका नाही, गरज आहे ते त्यांनी इंग्लिश परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळण्याची. येत्या मोसमात त्यांनी यथायोग्य कामगिरी केल्यास, त्यांचे आणि भारतीय क्रिकेटचे भविष्य उज्ज्वल आहे. रोहित-विराटसारखे खेळाडू आपल्या कसोटी संघाचा कणा होते, आता नवीन खेळाडूंनी त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून खेळ करणे महत्त्वाचे ठरेल.

कौस्तुभ चाटे