कुंभक प्राणायाम
सुरुवातीला पूरक, कुंभक, रेचक यांतील प्रमाण 1:4:2 असे असावे. म्हणजे समजा, पाच सेकंदांत उजव्या नाकपुडीने हवा ओढून पूरक केल्यास अंतःकुंभक 20 सेकंद करावा. नंतर डावी नाकपुडी मोकळी करुन त्याद्वारे दहा सेकंद कालावधीत रेचक करावा. नंतर त्याच रेचक केलेल्या नाकपुडीने पुनः पाच सेकंद पूरक करुन कुंभक 20 सेकंद करावा आणि पहिल्यांदा पूरक केलेल्या नाकपुडीने रेचक दहा सेकंदांत करावा. असे पाच प्राणायाम रोज करावे. पहिला आणि शेवटचा प्राणायाम 1:4:2 असाच करावा. हा झाला अंतःकुंभक. बहिःकुंभकात पूरक पाच सेकंद, तर रेचक लगेच दहा सेकंद करावा. रेचकानंतर श्वास न घेता, बहिःकुंभक 20 सेकंद करावा. अंतःकुंभकात श्वास कोंडून राहायचे असते, तर बहिःकुंभकात कुंभक श्वास सोडून करायचा असतो.
वर सांगितल्याप्रमाणे, सुरुवातीला पूरक, कुंभक आणि रेचक यांचे प्रमाण 1:4:2 असे असावे. नंतर पूरक, कुंभक, रेचक यांचे परस्पर प्रमाण पुढीलप्रमाणे सततच्या सुसह्य अभ्यासाने वाढवीत जावे. जसे 1:4:2, 1:5:2, 1:6:2, 1:7:2, 1:4:2. पूरक व रेचक यांचे प्रमाण एकाला दोन असे ठेवीत मधील कुंभकाचे प्रमाण 4, 5, 6, 7, 8 अशा प्रमाणात वाढवावे. अधिक अभ्यासाने पूरक, कुंभक, रेचक यांचे प्रमाण पुढीलप्रमाणे आणखी वाढवावे. जसे 1:8:2, 1:12:2, 1:16:2, 1:20:2 इत्यादी. प्रत्येक अभ्यासात पूरक, रेचकाचे प्रमाण 1:2 असेच असावे. त्यात वाढ करु नये. अधिक अभ्यास करुन पूरक, कुंभक, रेचकाचे प्रमाण पुढीलप्रमाणे करावे 1:4:2, 1:8:2, 1:16:2, 1:24:2 आणि 1:36:2. शेवटी पुनः 1:4:2 प्रमाणाने प्राणायाम पूर्ण करावा. हा अभ्यास अनुभवी गुरूंकडूनच शिकावा. खोल ध्यान लागल्यावर श्वास आपोआप बंद पडू पाहातो.
संत जनाबाई म्हणतात,
धरिला पंढरीचा चोर। पायी बांधोनिया दोर।
सोहं शब्दे मारा केला। आत विठ्ठल कोंडिला॥
महाराष्ट्रातील प्रत्येक उच्च संत अति कठीण योगसाधना करीत असत, हे यावरुन दिसून येते. शवासन साधना पूर्ण झाल्यावर साधक आपल्या जड शरीराबाहेर येऊन स्वतःचे शव स्वतःच पाहू शकतो. या अनुपम अनुभवांचे वर्णन तुकाराम महाराज करतात.
आपुले मरण पाहिले म्यां डोळां।
तो हा सोहळा अनुपम॥
ऊर्ध्व मुखे आळविला सोहंभाव
तुकाराम महाराजांनी हे खेचरी साधनेचे वर्णन केले आहे. प्रत्येक श्रेष्ठ संत श्रेष्ठ योगसाधक असतो. तर प्रत्येक श्रेष्ठ योगी श्रेष्ठ संत असतो. महाराष्ट्रातील संत, योग्यांनी हे समीकरण सतत कायम ठेवले आहे. भक्तिमार्गात योगसाधनेची आवश्यकता नाही, ही समजूत नष्ट झाल्यास भक्तिमार्गाचा अभिनिवेश धरुन योगमार्गाची टिंगल करण्यार्यांची संख्या कमी होईल. योग म्हणजे जोडणे व भक्ती हासुद्धा एक योगच आहे.
हंसजय
प्राणायामाचे प्रमाण 1:36:2 असे साधल्यास साधकाला केवल कुंभक अवस्था साधून हंसजय आपोआप होतो. या केवल कुंभकाचे सुंदर वर्णन आद्य शंकराचार्यांनी आपल्या एका स्तोत्रात केले आहे. असा श्रेष्ठ साधक श्वासाशिवाय वाटेल तितका काळ राहू शकतो. यालाच रामायण, महाभारतात ‘अश्व’अवस्था म्हटले आहे. ‘अ’ म्हणजे नाही, ‘श्व’ म्हणजे श्वास. श्वासविरहित अवस्था. समाधी अवस्थेत श्वास, चयापचय क्रिया, रक्तप्रवाह, हृदय क्रिया पूर्णपणे बंद असते. जीवात्मा आता विश्वाशी एकरूप झालेला असतो. अशी श्वासाशिवाय राहण्याची अवस्था सदा श्वासयुक्त अवस्थेत राहणार्या मर्यादित शक्तीच्या योग्याला सहन होत नसते. म्हणून ते असल्या ‘अ-श्व’ अवस्थेला नष्ट करुन पुनः आपला श्वास सुरु करण्यास धडपडत असतात. या त्यांच्या श्वासरहित अवस्थेला नष्ट करण्याच्या स्वाभाविक प्रयत्नाला रामायण, महाभारतात ‘अ-श्वमेध यज्ञ’ असे म्हटले आहे. अश्वमेध यज्ञ म्हणजे जीवंत घोड्याला समारंभासह कापणे नव्हे. साधनानुभव नसताना आपण आपल्या आदर्शांवर हिंसात्मक यज्ञ करण्याचा प्रच्छन्न आरोप करतो. हे करण्यात भगवान श्रीराम, श्रीकृष्ण आणि धर्मासारख्या महान साधक श्रेष्ठांवर आपण अन्याय करीत आहोत, याचेही भान राहात नाही.
अश्वमेध यज्ञाचा असा दिव्य संदेश आहे! म्हणूनच रामायणकारांनी रामाला मर्यादेत असणारा पुरुषश्रेष्ठ म्हणजे मर्यादापुरुषोत्तम असे म्हटले आहे. श्वासरहित अवस्थेत राहणार्या परमश्रेष्ठ योग्याला वाल्मिकींनी ‘लव’, तर भगवान वेद व्यासांनी ’अश्वत्थामा’ असे म्हटले आहे. त्यातील अधिक रहस्ये समजण्याकरिता लेखकाने लिहिलेली ‘विश्वआदर्श गोपालकृष्ण’ ‘साधना साधक दिव्यानुभती’आणि ’रामायणरहस्य’ ही पुस्तके जिज्ञासूंनी अवश्य वाचावी.
अशा तर्हेने प्राणायाम करून केवळ कुंभक आणि हंसजय म्हणजेच ‘अश्व’ अवस्था साधल्याने साधक सहजपणे शवासन करु शकतो आणि एका अवयवावर ध्यान करुन ते तेथून प्राणासह काढून स्वतःच्या जड शरीरातून क्षणार्धात मरणोत्तर येणारे दिव्य अनुभव जिवंतपणी जाणतेपणी घेऊ शकतो. प्रत्येक मरणार्या व्यक्तीला पुढे लिहिल्याप्रमाणे अनुभव येत असतील. परंतु, असल्या व्यक्ती अज्ञानात मरत असल्यामुळे त्यांचे मरणोत्तर दिव्य अनुभव पुनः जन्म घेतल्यावर त्यांना स्मरत नाहीत. एरव्ही ज्ञानासह जन्म-मृत्यू होत असल्यास प्रत्येकाला त्याचे जन्मापूर्वीचे आणि मृत्यूनंतरचे दिव्य अनुभव आठवायला हवे.
शवासनाचे अनुभव : म्हणजे मृत्यूनंतरचे अनुभव:
शवासन साधना करताना सुरुवातीला साधकाला त्याचे शरीर अतिशय जड पडल्यासारखे वाटेल. नंतर ज्या ज्या अवयवावर ध्यान करावे, त्या त्या अवयवात अतिशय रक्तप्रवाह व चैतन्य वाहून तो तो अवयव ध्यानासह ठणकायला लागेल. नंतर अवयवागणिक प्राणशक्ती हटवताना त्या त्या अवयवांमधून जणू काही एखादा तीक्ष्ण आकोडा (तीक्ष्ण अणकुचीदार वस्तू) सर्रकन ओढल्यासारखा वाटेल. शरीरात गुंतून पडलेला जीवात्मा आपले त्या शरीरातील वास्तव्य सोडण्यास तयार नसतो. मायाच ना ती! माया तरुन जाणे अतिशय कठीण असते. ‘मम माया दुरत्यया’ भगवंत गीतेत म्हणतात. बाह्य सर्व मायेपेक्षा स्वतःचे शरीर ही फार मोठी माया आहे. अशा जन्मजन्मांतरीच्या धारण केलेल्या स्वशरीरातून बाहेर निघताना साधक जीवात्म्याला प्रथम अतिशय वेदना होत असतात. नंतर निरंतर अभ्यासाने त्या वेदना कमी वाटून उलट तसे करताना विलक्षण आनंद वाटतो. नवीन पोहणे शिकणार्या माणसाला प्रथमदर्शनी पाण्यात उडी मारताना जसे मरणप्राय भय वाटते, पण पोहण्याचा सतत अभ्यास झालेल्या उत्तम पोहणार्याला पाण्यात उडी मारताना जसा आनंद होतो, तद्वत् नवीनच शवासन साधना सिद्ध करणार्या साधकाला प्रथम शरीराच्या प्रत्येक अवयवावर ध्यान करुन ते तेथून हटविताना बराच त्रास होतो, परंतु नंतर सततच्या अभ्यासाने आपल्या शरीरातून प्राणशक्ती काढताना एक अद्वितीय आनंद वाटत असतो.
(क्रमशः)
योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
9702937357