यशस्वी उद्योजिका, नि:स्वार्थी सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळख असणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे ‘सरोज स्वीट्स प्रा. लि.’च्या संचालकिा मनिषा मराठे. त्यांच्या जीवनाचा घेतलेला हा मागोवा...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या ३००व्या जयंतीनिमित्त मागे मुंबईत एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमामध्ये रा. स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे तसेच, माता अहिल्यादेवींचे वंशज प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. याच कार्यक्रमामध्ये या दोघा महानुभावांसोबत एक महिलासुद्धा प्रमुख अतिथी म्हणून होत्या. त्या होत्या मनिषा शेषनाथ मराठे! त्या मिठाई व्यवसायामध्ये अग्रणी असलेल्या ‘सरोज स्वीट्स प्रा. लि.’च्या संचालिका आहेत. तसेच, त्या यशस्वी उद्योजिका आणि निःस्वार्थी सामाजिक कार्यकर्ता ते प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणूनही समाजात परिचित आहेत. चेंबूरला नामांकित महाविद्यालय उभे करण्यामध्ये त्यांच्या सासर्यांचा मोलाचा वाटा आहे. पण, याही पलीकडे जाऊन शाश्वत मानवी मूल्ये मानणारा आणि जपणारा माणूस कसा असू शकतो, तर तो यांच्यासारखाच असे वाटावे, असे माणूसपण लाभलेल्या मनिषा. त्यांच्या जीवनाचा मागोवा घेऊ.
शशिकांत आणि उषा मंत्री हे सारस्वत समाजाचे दाम्पत्य मूळचे गोव्याचे.कामानिमित्त मुंबईच्या बोरिवली उपनगरात स्थिरावलेले. दोघेही सुशिक्षित. दोघांना दोन कन्या. त्यांपैकी एक मनिषा. मंत्र्यांचे कुटुंब संयुक्त कुटुंब होते. घरात एकूण १५ जण. मंत्री कुटुंब प्रचंड आतिथ्यशील आणि तितकेच समाजशीलही. हे सगळे संस्कार आपसूकच मनिषा यांच्यामध्ये रूजले. त्या हरहुन्नरी विद्यार्थिनी होत्या. शाळा आणि पुढे महाविद्यालयामध्येही ज्युदो, कराटे, खोखो, कबडी, अॅथलेटिक्स आणि नृत्याच्या विविध स्पर्धांमध्ये त्यांचा राज्यस्तरीय स्तरावर नेहमीच प्रथम क्रमांक ठरलेला असे. एकदा राज्यस्तरीय स्पर्धा खेळतानाच मनिषा यांना मार लागला. मात्र, तरीही त्यांनी स्पर्धा जिंकली. स्पर्धा संपल्यानंतर त्यांनी उपचार केले, तर त्यांना डोक्याला १४ टाके पडले होते. दुर्दैवाने त्याच दिवशी राष्ट्रीय स्तरावरचीही स्पर्धा होती. पण, जखम असल्यामुळे त्यांना राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊ दिले गेले नाही. तसेही मुलींनी मैदानी खेळ किंवा नृत्य करू नये, असे त्यांच्या आईबाबांचे ठाम मत होतेच.
खेळ म्हणजे मनिषा यांचा श्वासच. पण, त्यापासून त्या दूर झाल्या होत्या. मात्र, मनिषा यांनी धैर्याने मन आवरले. शिक्षण पूर्ण केले आणि त्या ‘बीएसएन’मध्ये नोकरीला लागल्या. खरे तर मनिषा यांना ‘आयपीएस’ अधिकारी व्हायचे होते. त्यासाठी त्यांनी अभ्यासही सुरू केला होता. मात्र, घरातल्यांचे म्हणणे होते की, मुलीने पोलिसी क्षेत्रात जायचे? ‘आयपीएस’ व्हायचे, या स्वप्नालाही विरामच बसला. नेमके याच दरम्यान त्यांचा विवाह शेषनाथ मराठे यांच्याशी झाला. मराठे यांचा ‘सरोज स्वीट्स’ नावाचा मिठाईचा व्यवसाय आहे. तिथे शेकडो प्रकारच्या मिठाई तसेच, समोसा आणि फरसाणांची विक्री केली जाते. मनिषा यांनी ठरवले की, खेळ, नृत्य, आयपीएस यांमध्ये मनासारखे काही करता आले नाही. पण, सासरच्या व्यवसायात लक्ष द्यायचे. सासरच्या कलाने घेत त्यांनी या व्यवसायात लक्ष घातले. "हा व्यवसाय म्हणजे पैसे कमावण्याचे साधन नाही, तर समाजाच्या आनंदात सहभागी व्हायचा तो एक मार्ग आहे. तसेच, ‘सरोज स्वीट्स’ म्हणजे दुकान नाही, तर मंदिर आहे, जिथे लोक श्रद्धेने रांगेत उभे राहतात, मनाने पैसे देतात आणि प्रसादरूपी मिठाई आणि खाद्यपदार्थ घेऊन जातात. त्यामुळे या मंदिराचे पावित्र्य जपायलाच हवे,” हे सासर्यांचे म्हणणे मनिषा यांनी कायम लक्षात ठेवले. त्यामुळे सुरुवातीला १३० स्क्वेअर फूट क्षेत्रात असलेले हे दुकान आणि फॅक्टरी आता प्रशस्त अशा चार हजार, ५०० फूट क्षेत्रात विस्तारले आहे. खाद्यपदार्थ निर्मितीसाठी अद्ययावत यंत्रणा दुकानात उपलब्ध आहेत. स्वच्छता, चव यामुळे जगभरात ‘सरोज स्वीट्स’चे ग्राहक आहेत.
२०१८चे साल होते. याच काळात असे काही घडले की, त्यांना चालता येईनासे झाले. अंथरूणात पडणे म्हणजे कष्टाने वारसा चालवलेल्या व्यवसायासाठी, समाजकार्यासाठी वेळ देता येणार नव्हता. नृत्य आणि ड्रायव्हिंगची आवड होती. पण, अंथरूणातच खिळून राहावे लागले, तर सगळे बंद होणार होते. त्यांना नैराश्याने ग्रासले. पण, कुटुंबाने समर्थ साथ दिली. दोन वर्षे त्यांनी प्रयत्न केले. निश्चय केला की, मी पुन्हा पूर्वीसारखी होणार! शेवटी त्यांच्या जिद्दीपुढे नियतीला हार मानावी लागली. त्यांना पूर्वीसारखेच चालता येऊ लागले. पूर्वीसारखेच त्या आता फॅक्टरीमध्ये येऊ लागल्या. तर अशा या मनिषा. त्यांनी नेहमीच सामाजिक भान जपले. दसरा-दिवाळीला सैनिकांना फराळ पाठवणे असू दे की, वृद्धाश्रम-अनाथाश्रमात सेवाकार्य करणे असो मनिषा सदैव तत्पर असतात. कोरोना काळात गावाकडे परतणार्या लोकांना तसेच, परिसरात कर्तव्यावर तैनात शेकडो पोलीस बांधवांना दररोजचे खाद्यपदार्थ वितरण असू दे, मनिषा यांनी स्वतः पुढाकार घेतला. त्यांच्या कर्मचार्यांनाही या काळात त्यांनी संपूर्ण वेतन दिले. त्यांची सर्वार्थाने काळजी घेतली. मनिषा म्हणतात, "हे श्रेय माझ्या एकटीचे नाही, तर माझे आईबाबा आणि सासरे यांचे संस्कार, पतीचा विश्वास, सहकार्य आणि कंपनीमधल्या सगळ्या कर्मचार्यांचे कष्ट यामुळेच आजचे हे विश्व उभे आहे. पण, यापुढे मला समाजकल्याणासाठी सत्कृत्याचा गोडवा आणि सुगंध पेरायचा आहे.” मनिषा यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’ तर्फे अनेक शुभेच्छा!