दिल्ली मद्य घोटाळा – आप खासदार संजय सिंहविरोधात दोषारोपपत्र दाखल
02-Dec-2023
Total Views | 38
नवी दिल्ली : दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणाशी संबंधित हवाला प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शनिवारी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांच्याविरुद्ध राऊज एव्हेन्यू न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
खासदार सिंह यांच्याविरोधात पीएमएलए कायद्यांतर्गत हे दोषारोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणातील हे पुरवणी दोषारोपपत्र आहे. ईडीने यापूर्वी अशा सुमारे पाच तक्रारी दाखल केल्या आहेत. हे दोषारोपपत्र एकूण ६० पानांचे आहे. हवाला प्रकरणाचा तपास करणार्या ईडीने सरकारी साक्षीदार झालेल्या दिनेश अरोरा याच्याकडून त्याच्या साथीदारांमार्फत २ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप केला आहे.
तत्पूर्वी, खासदार संजय सिंह यांना २४ नोव्हेंबर रोजी राऊस अॅव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत ४ डिसेंबरपर्यंत वाढ केली होती. ईडीने आपचे खासदार संजय सिंह यांना ४ ऑक्टोबर रोजी अटक केली होती. अबकारी धोरण तयार करण्यात आणि अंमलबजावणी करण्यात संजय सिंह यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे काही मद्य उत्पादक, घाऊक विक्रेते आणि किरकोळ विक्रेते यांना आर्थिक फायदा झाला; असा आरोप ईडीने केला आहे.