पंतप्रधान मोदींचा घानाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान! भारत-घाना संबंधांना नवीन गती

    03-Jul-2025   
Total Views |

PM Narendra Modi honoured with Ghana

नवी दिल्ली : (PM Narendra Modi honoured with Ghana's National Award) पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी २ जुलैला पाच देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. गेल्या १० वर्षांतील त्यांचा हा सर्वात मोठा विदेश दौरा असून तो तब्बल पाच आठवडे चालणार आहे. घानापासून मोदींनी आपल्या या दौऱ्याला सुरुवात केली असून गुरुवारी त्यांनी घानाचे राष्ट्राध्यक्ष जॉन द्रमानी महामा यांची भेट घेतली. राजधानी अक्रा येथे एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्राध्यक्ष महामा यांनी पंतप्रधान मोदी यांचा घानाच्या 'द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना' या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान केला. यावेळी पंतप्रधान मोदींनी हा सन्मान दोन्ही देशांतील तरुणांच्या भवितव्याला आणि ऐतिहासिक संबंधांना समर्पित केला.

पुरस्कार दोन्ही देशांतील मैत्रीला वृद्धिंगत करणारा - पंतप्रधान

‘द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना’ या पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर यासंदर्भात सविस्तर पोस्ट केली आहे.  ते म्हणाले, "हा पुरस्कार मला बहाल केल्याबद्दल मी घानाच्या जनतेचे व सरकारचे आभार मानतो. हा पुरस्कार मी दोन्ही देशांच्या तरुणाईच्या भवितव्याला, त्यांच्या महत्त्वाकांक्षांना, आपल्या समृद्ध सांस्कृतिक वैविध्याला आणि दोन्ही देशांमधील ऐतिहासिक संबंधांना अर्पण करतो. हा पुरस्कार ही एक जबाबदारीदेखील आहे. दोन्ही देशांमधील घट्ट मैत्री अधिकाधिक वृद्धिंगत करण्याची ही जबाबदारी आहे. भारत नेहमीच घानासोबत उभा राहील आणि एक मित्र आणि विकासातील भागीदार म्हणून नेहमीच घानाला मदत करत राहील", असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घानाच्या सरकारला आश्वासन दिले आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पहिलाच घाना दौरा ऐतिहासिक ठरला आहे. अक्रा येथे घानाचे राष्ट्रपती जॉन ड्रामानी महामा यांच्यासोबत त्यांनी महत्त्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा केली. व्यापार, गुंतवणूक, कृषी, डिजीटल तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा यांसारख्या अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. घानापासून मोदींनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली असून त्यानंतर त्रिनिदाद अँड टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबियाचा दौरा ते करणार आहेत. येत्या ६ आणि ७ जुलै रोजी ब्राझीलच्या रिओ दी जानेरिओ येथे होणाऱ्या 'ब्रिक्स शिखर परिषदे'लाही पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत.


अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\