शिमला : हिमाचल प्रदेशात पावसाने कहर केला आहे. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळल्याने वाहतुकीचे रस्ते बंद झाले आहेत. जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिमाचल प्रदेशात १९ जून रोजी मान्सूनचे आगमन झाले होते. त्यानंतर सातत्याने पाऊस सुरूच आहे. पावसाचा जोर इतका वाढला आहे की, अनेक भागांमध्ये ढगफुटी झाल्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
मंडी जिल्ह्यात बुधवारी २ जुलै रोजी मोठी दुर्घटना घडली. एका डोंगर उतारावर दरड कोसळली. यात १० जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. काहीजण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. हिमाचल प्रदेशच्या आपत्ती व्यवस्थापन आणि महसूल विभागाचे विशेष सचिव डीसी राणा यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या दुर्घटनेत आतापर्यंत ३० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ३४ लोक बेपत्ता आहेत.
एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक प्रशासन मदतीसाठी सज्ज झाले आहेत. बचावकार्य वेगाने सुरू आहे. दरड कोसळलेल्या ठिकाणी जेसीबीच्या मदतीने दगड, माती हटवली जात आहे. हिमाचल सरकारने जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन करत डोंगराळ भागात न जाण्याचा सल्ला दिला आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाचा इशारा दिला आहे.
कृषी आणि पर्यटन क्षेत्रालाही याचा मोठा फटका बसला आहे. पर्यटकांनी आपल्या सहली रद्द केल्या आहेत. स्थानिक व्यापाऱ्यांचेही नुकसान झाले आहे. डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणावर झाडे आणि वीजेचे खांब कोसळले आहेत. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. वीज आणि पाण्याचा पुरवठाही खंडित झाला आहे.