सटाण्याचे कृषी तपस्वी

    30-Jan-2023   
Total Views |
Ramdas Patil 
 
विनम्र सेवाभावी स्वभाव आणि स्वकष्टाच्या बळावर आज सटाण्याचे रामदास पाटील यांनी स्वकर्तृत्वाने यशाचे विश्व उभे केले आहे. त्यांच्या यशोशिखराचा घेतलेला आढावा...

परिसरात विज्ञानविषयक महाविद्यालय नव्हते. वडिलांचे मित्र लोके काका यांच्या मदतीने रामदास ७० च्या दशकामध्ये सातारा येथील महाविद्यालयात शिक्षणासाठी गेले. महाविद्यालयात शिक्षणासाठी आले म्हणून रामदास यांना त्यांच्या बाबांनी चप्पल घेऊन दिली. त्यापूर्वी गरिबीमुळे चप्पल घालणे म्हणजे सुद्धा चैनच होती. एकेदिवशी ती चप्पल तुटली. ते अनवाणी महाविद्यालयात आले. ते प्राध्यापकांनी पाहिले, म्हणाले,”बूट नसू दे पण चप्पल तरी घालत जा.”

शाळेत असताना तर रामदास सहा-सहा किलोमीटर अंतर सकाळ संध्याकाळ अनवाणी पायाने जात. चप्पल आवश्यक असते हे कधी ऐकलेच नव्हते. त्यामुळे सातारा शहरातील प्रोपेसरांनी कळकळीने सांगितलेला सल्ला रामदास यांनी मनावर घेतला. वडिलांनी अत्यंत काटकसर करून घेतलेली चप्पल तुटली, तर अनवानीपायाने महाविद्यालयात यावे लागेल. आपण वेगळे दिसू असे होऊ नये म्हणून रामदास त्या चप्पलांना जीवापाड जपत.

असो, चौगाव सटाण्याचे तेच रामदास जिभाऊ पाटील आज ‘आर बी हर्बल अ‍ॅग्रो,’ ’इंन्स्टिट्युट ऑफ प्लान्ट बायो टेक्नोलॉजी’ या दोन कंपन्यांचे मालक आहेत. त्यांची सटाणा येथे ’शेतजमीन मीमांसा प्रयोग शाळा’ आहे. या प्रयोग शाळेने महाराष्ट्रातील लाखो शेतकर्‍यांना शेतजमीन, पाणी आणि खताबाबतचा अमूल्य सल्ला मार्गदर्शन केले आहे. रामदास पाटील हे पहिले व्यक्ती आहेतकी, त्यांनी राज्यात पहिल्यांदा नोंदणी करून जैव किटकनाशक क्षेत्रात कंपनी सुरू केली. त्यानंतर या विषयात उत्पादन निर्माण करणार्‍या अनेक कपंन्या उभ्या राहिल्या.

मात्र त्यांना अनेक अडचणी येऊ लागल्या. हे सगळे लक्षात घेऊन रामदास यांनी ‘महाराष्ट्र बायोकंट्रोल मॅन्युफॅक्चरर असोसिएशन’ स्थापनकेली. त्यामध्ये ११८ कपंन्या सदस्य आहेत. या असोसिएशनच्या माध्यमातून रामदास यांनी १३ उत्पादन तयार केली आणि त्यांना सरकारमान्यता मिळवून दिली. या उत्पादनाचे परीक्षण अवलोकन करण्यासाठी भारत सरकारने समिती बनवली. त्यात रामदास यांचाही समावेश होता.

ते ‘महाराष्ट्र डाळींब बागायतदार संघा’चे टेक्निकल डायरेक्टरही होते. तसेच, महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये वनस्पती रोगशास्त्र अभ्यास मंडळ सदस्यही आहेत. इतकेच नाही, तर ‘रोटरी क्लब’च्या माध्यमातून ते सामाजिक कार्यही करतात. सध्या ते ‘भारतीय किसान संघा’चे नाशिक जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत. शेती, जैविक खत किटकनाशक आणि सामाजिक क्षेत्रात दिलेल्या उत्तुंग योगदानामुळे त्यांना राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारही प्राप्त आहेत.

रामदास यांचे वडील जिभाऊ वारकरी तर आई मंजुळा समाजशील गृहिणी. तिला वाटे रामदास यांनी प्राध्यापक व्हावे. ती रामदास यांच्याबाबत नेहमी म्हणे, ’मना भाऊले प्रोपेसरकरसू. आईच्या इच्छेखातर की काय पण रामदास यांना शिक्षणाची गोडी लागली.

पुढे रामदास यांनी विज्ञान शाखेतून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांना प्राध्यापकाची नोकरी लागली. मात्र त्यांना नोकरी करून ‘पीएच.डी’ करायची होती. त्याचकाळात वर्तमानपत्रात मुंबईतील एका कपंनीची जाहिरात आली की नोकरी करून ‘पीएच.डी’करा. रामदास मग मुंबईत आले. या कंपनीचे मालक बाळकृष्ण आपटे हे रामदास यांना भेटले. त्या दिवसांपासून पुढे आयुष्यभर रामदास यांनी आपटे यांचे शिष्यत्व पत्करले, असेच म्हणावे लागेल. तीन वर्षांचा कालावधी लोटला. मात्र, नोकरी करता करता जी संस्था ‘पीएच.डी’ करून घेणार होती. त्या संस्थेची मान्यता मुंबई युनिर्व्हसीटीने रद्द केली.


 रामदास यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. कारण त्यांनी प्राध्यापकाची नोकरी केवळ ‘पीएच.डी’ करता येणार म्हणून सोडली होती. मात्र, परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी त्यांनी मुंबईतील एका नामाकिंत कपंनीमध्ये १२ वर्षे वरिष्ठ पदावर काम केले. याच काळात त्यांचा ‘कैम्फर्ट कपंनी’च्या मनीष पटेल यांच्याशी संपर्क आला. त्यांना त्यांच्या कामात रामदास यांनी निस्वार्थी मैत्रीभावाने मदत केली. याच काळात त्यांचा छोटाभाऊ राजेंद्र यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. पण, चांगली नोकरी मिळत नव्हती. मनीष पटेल आणि बी.एन आपटे यांच्या सहकार्याने मग रामदास यांनी गावातच जैविक खत आणि किटकनाशकांची उत्पादन करणारी छोटीशी कंपनी सुरू केली. ती कंपनी म्हणजे ‘आर बी हर्बल अ‍ॅग्रो’. आर म्हणजे रामदास आणि बी म्हणजे बाळकृष्ण आपटे यांच्या नावातील आद्यआक्षर. गुरूला दिलेली ती गुरूदक्षिणाच होती. या उद्योगात रामदास आणि राजेंद्र या पाटील बंधुचा जम बसला.


जैवकीटक आणि किटकनाशक यांचे ग्राहक शेतकरी असल्याने मग रामदास यांनी मुंबईतील नोकरी सोडली आणि ते पुन्हा गावी आले. रामदास यांचे बंधू सजंय हे स्वयंसेवक. त्यांच्यामुळे आणि वर्ग मित्र दिलीप क्षिरसागर (नाशिक) यांच्यामुळेही रामदास यांची रा.स्व.संघाशी विन जुळलेली. रामदास गावी परतल्यावर दिलीप यांनी त्यांना सांगितले की, ‘शेतीविषयक इतके काम करतोस थोडा वेळ देऊन भारतीय किसान संघाचे काम कर.’ मित्राचे म्हणणे पटून आणि संघाविषयीच्या आत्मियतेने त्यांनी भारतीय किसान संघाचे काम सुरू केले. संघाच्या माध्यमातून ते समाजासाठी तनमनधन अपूर्ण कार्य करत आहेत. याचे कारण सांगताना रामदास म्हणतात, ”आई म्हणायची आपण कुणाचा चहा प्यायलो तर त्याला वेळेला पाणी तरी द्यायलाच हवे. आज समाजाने मला भरभरून दिले. मग मी समाजाचे ऋण थोडे तरी फेडायलाच हवे ना?”तर असे हे रामदास पाटील , सटाण्यातले लोकप्रिय व्यक्तिमत्त्व. त्यांच्या विचारांचा आदर्श समाजाने घ्यायलाच हवा.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.