‘श्री गोविंदानंद सरस्वती न्यासा’ची स्थापना निवृत्त मुख्याध्यापक व संस्कृतचे गाढे अभ्यासक वामन नवरे यांनी 2007 साली केली. उपासना, शिक्षण, कृषी, सांस्कृतिक, आरोग्य, ऐतिहासिक प्रकाशन व संस्कृत भाषेच्या शिक्षणास उत्तेजन ही न्यासाची उद्दिष्टे आहेत. न्यासाच्या कार्याचा संक्षिप्त मागोवा घेणारा हा लेख...
भगवद्गीता ही केवळ वाचनासाठी पठणासाठी नाही, तर त्यातला शब्द अन् शब्द माणसाच्या जीवनाला समृद्ध करणारा आहे. त्यातील सूत्र मानवी जीवनासाठी अत्यंत मोलाचे आहे. त्यामुळेच ‘श्री गोविंदानंद सरस्वती न्यासा’तर्फे दि. 4 जून 2008 रोजी भगवद्गीतेची संथा देण्याचे वर्ग सुरू केले. आज ऑनलाईन व ऑफलाईन मिळून 52 वर्ग आहेत. 27 शिक्षक अविरत भगवद्गीतेची संथा देण्याचे काम करत आहेत. लहान मुले, युवा वर्ग व वयस्कर व्यक्तींचा या वर्गांमध्ये सहभाग आहे. शाळाशाळांत जाऊन भगवद्गीतेचा प्रसार करण्याचे कार्य गीताशिक्षिका करीत आहेत. संथा रूपाने भगवद्गीता शिकवण्याचे कार्य सुरू आहे. ज्या गीताध्यायींची भगवद्गीता मुखोद्गत होते, त्यांना न्यासातर्फे श्रृंगेरी येथे शारदा पीठम्तर्फे घेतल्या जाणार्या गीता मुखोद्गत पठण परीक्षेसाठी पाठविले जाते. मे 2025 मध्ये 23 गीताध्यायी न्यासातर्फे भगवद्गीता मुखोद्गत पठण परीक्षेसाठी श्रृंगेरी येथे जाणार आहेत.
न्यासाचा ‘घरोघरी गीता’ हा एक उपक्रम आहे. या उपक्रमामार्फत ज्या व्यक्तींना आपल्या वास्तुमध्ये गीतापठण करून घ्यावे, असे वाटत असेल, त्यांच्या घरी जाऊन गीतापठण केले जाते. 2024 मध्ये चातुर्मासात 40 घरी गीतापठण केले गेले. न्यासातर्फे दरवर्षी बाराव्या अध्यायापर्यंत भगवद्गीता मुखोद्गत पठण परीक्षा घेतल्या जातात व त्यांना प्रमाणपत्र आणि बक्षीस रकमेने पुरस्कृत केले जाते. दि. 4 जून वर्धापन दिन व पांडव पंचमी हे दोन दिवस न्यासातर्फे उत्सवाच्या स्वरूपामध्ये साजरे केले जातात व या दोन्ही दिवशी मान्यवरांना बोलावून गीताध्यायींना मार्गदर्शन केले जाते. ‘श्री गोविंदानंद सरस्वती न्यासा’तर्फे हे सर्व कार्य निःशुल्क केले जाते. समाजातील गीताप्रेमींच्या देणगी निधीतून हा कार्यभार सांभाळला जातो.
‘श्री गोविंदानंद सरस्वती न्यास’ हा नोंदणीकृत ट्रस्ट आहे व त्याचे सर्व व्यवहार राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून केले जातात. समाजामध्ये हे कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे व भगवद्गीतेचा प्रसार व्हावा, हीच मनोमन इच्छा न्यासाची आहे. आद्य शंकराचार्य जयंतीच्या निमित्ताने यावर्षी डोंबिवली येथे ‘संस्कृत भारती’ व ‘उपनिषद सेवा मंडळ डोंबिवली’तर्फे ‘जगद्गुरू आद्य शंकराचार्य सेवा समिती’ आयोजित जगद्गुरू शंकराचार्य जयंती उत्सवात झालेल्या सामूहिक स्तोत्रपठणामध्ये न्यासाचा सहभाग होता. आठ स्तोत्रांच्या पठणाचा सराव जानेवारी महिन्यापासून ते एप्रिल अखेर केला जात होता. त्यात मी सहभाग घेतला होता. ही सर्व सेवा भगवान श्रीकृष्णांच्या आणि आद्य शंकराचार्यांच्या चरणी अर्पण करीत आहोत.
- रेखा उटगीकर