नसे राम ते धाम सोडून द्यावे...

    23-Jun-2022
Total Views |
 
 
ramji
 
 
 
 
 
जेथे रामाचा आदर राखला जात नाही, ते घर सोडून द्यावे. त्यांच्याशी संबंध, ठेवू नये. त्यापेक्षा अरण्यात, निसर्गसान्निध्यात रामचिंतनात, नामस्मरणात, भगवंताच्या लिला पाहण्यात आनंद आहे. रामाच्या त्याच्या गुणांच्या संगतीने समाधान हे महत्त्वाचे आहे. रामाच्या व त्याच्या गुणांच्या संगतीने आपले समाधान टिकून राहणारे आहे. असे असले तरी लोकांना आपला अहंकार वाढवणार्‍या संगतीची फार आवड असते.
 
 
मनाच्या श्लोकांतील श्लोक क्र. ३८ ते ४२ या पाच श्लोकांतील शेवटची ओळ ‘मना सज्जना राघवीं वस्ति कीजे।’ अशी आहे. भक्ताने भगवंताच्या त्याच्या गुणांच्या जवळ राहण्याचा अभ्यास केला पाहिजे, असा सरळ आध्यात्मिक अर्थ त्यातून निघतो. त्याशिवाय या श्लोकांतून निघणारा सांकेतिक अथवा रूपकात्मक अर्थ तत्कालीन राजकीय परिस्थितीचा निर्देशक होता, यावर मागे चर्चा झाली आहे. आता या पुढील श्लोकांतून समर्थ राघवाच्या जवळ राहण्याचा जो अभ्यास करायचा आहे, त्याच्या प्रात्यक्षिकाचा भाग समजावून सांगत आहे. मागील श्लोकांत निष्कर्ष सांगितले. आता ते अमलात कसे आणता येतील, हे स्वामी सांगत आहेत, त्यावरील उपाय सांगत आहेत.
 
मना सज्जना एक जिवीं धरावे।
जनीं आपुले हीत तुवां करावे।
रघुनायकावीण बोलो नको हो।
सदा मानसीं तो निजध्यास राहो॥४३॥
 
भगवंत नेहमी आपल्या अंत:करणात आहे, अशी जाणीव राहण्यातच हित आहे, हे मनाने पक्के करावे. हे निश्चित करून त्यानुसार आपल्या जीवनक्रमाची आखणी करावी. व्यवहारात, समाजात वावरताना अनेक प्रापंचिक जबाबदार्‍या व कर्तव्ये पार पाडावी लागतात. त्यासाठी मनाची शांतता, एकाग्रता आवश्यक असते. भगवंताची जेथे वस्ती असते, ते ठिकाण भगवंतगुणांच्या प्रभावाने पवित्र व शुद्ध असते. अशा भगवंताचे निवासस्थान अंत:करणात असेल, तर मन पवित्र असायला हवे. व्यवहारात, प्रपंचात खोटेपणा, असत्य, भ्रष्ट आचार यांना मनातून काढून टाकावे लागते. यातून आपली जीवनपद्धती सुधारल्याने भगवंताचे अस्तित्व जाणवू लागते आणि हे माझ्या हिताचे आहे, याची जाणीव होऊ लागते.
 
 
स्वामी पुढे सांगतात की, जे आपल्याला हितकारी आहे, ते आपल्यालाच करायचे आहे. दुसरा कोणीतरी येऊन माझे हित करेल, ही कल्पना सोडून द्यावी. माझे हित मलाच साधायचे आहे, हे मनाने पक्के करावे. समर्थांचा हा उपदेश ३५० वर्षांपूर्वीच्या परिस्थितीनुसार असला, तरी आज त्यात बदल झालेला नाही. याउलट भोवतालच्या परिस्थितीचा विचार करता, पारमार्थिक व सांस्कृतिक हिताचा विचार आज कुठे दिसत नाही. परिस्थिती आणखीनच बिघडली आहे. आज लोकांत, समाजात, एकंदर सभोवतालच्या वातावरणात आढळणारा दिखाऊपणा, दांभिकता, अहंभावचा अतिरेक, बेपर्वा वृत्ती, अनादर, असभ्य शब्दांचा दैनंदिन जीवनातील वाढता वापर हे सारे पाहिल्यावर माझ्या हिताचे काय, हे माझे मलाच शोधायचे आहे. या स्वामींच्या उपदेशाची खात्री पटते. भगवंताला मनात स्थान द्यायचे ठरवले, तर मन हे भगवंताचे निवासस्थान समजून ते शुद्ध व पवित्र ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर पडते.
 
 
जे मनात आहे तेच सर्वसाधारणपणे बोलण्यातून बाहेर पडते. जर मन दांभिक असेल, तर खोटेपणा बोलण्यात दिसून येईल अथवा घाणेरड्या मनातून असभ्य शब्द बाहेर पडतील. यासाठी प्रत्येकाने आपल्या वाणीला, भाषेला फार जपले पाहिजे. विकृत म्हणजे असभ्य वाणी हे अपवित्र मनाचे लक्षण आहे, अशा अपवित्र ठिकाणी भगवंताचा निवास असू शकत नाही. तेव्हा आपल्या हिताचा विचार करून वाणीवर नियंत्रण मिळवणे, भक्ताला जरुरीचे असते. फुकाचा अहंकार, अवाजवी देहबुद्धी, लब्धप्रतिष्ठेचा भ्रम हे सर्व विकार माणसाला स्वस्थ बसू देत नाहीत. या विकारांच्या आहारी गेलेल्या माणसाचा वाणीवर ताबा राहत नाही. विकाररहित माणूसही कोणत्या तरी विषयावर बोलत असतो. वायफळ बोलण्याने पुन्हा माणूस विकारवश होतो, यासाठी समर्थांनी सांगितले आहे की, बोलावेसे वाटले तर रामाबद्दल बोला, भगवंताबद्दल बोला. म्हणजे आपोआपच स्वत:विषयी अहंकारात्मक किंवा दुसर्‍यांविषयी निंदात्मक बोलण्याला आळा बसेल. रामाविषयी बोलण्याने त्याच्या गुणांचे चिंतन होईल. ते गुण तुमच्या मानसिक विकास घडवून आणतील.
 
प्रपंचाच्या व्यावहारिक व्यापात आपण व्यस्त असताना प्रत्येक वेळी परमेश्वराची आठवण राहीलच, असे नाही. माणसे सर्वसाधारणपणे अहंभाव सुखावणार्‍या गोष्टीत जास्त रममाण होतात. त्याप्रसंगी माणसाला भगवंत व त्याच्या गुणांचा विसर पडतो. ही प्रत्येकाची सर्वसाधारण मानसिकता असल्याने स्वामी सांगतात की, भगवंताचा ध्यास लागला तरच बोलताना-चालताना सर्वकाळी माणसाला भगवंताची आठवण राहील. भगवंताच्या ध्यासाचा अभ्यास करताना पुढे तो आपल्या अंगवळणी पडतो. त्याला ‘निजध्यास’ असे म्हणतात. ‘निजध्यास’ ही क्रिया आपोआप घडू लागते. आपल्या शरीराअंतर्गत प्रतिक्षिप्त क्रिया जशा सहजपणे घडत असतात, तसा ‘निजध्यास’ हो सहजपणे अनुभवता येतो. यासाठी स्वामी या श्लोकात ‘सदा मानसीं तो निजध्यास राहो।’ असे सांगत आहोत. ‘निजध्यासा’ने महत्त्व स्वामींना जाणवल्यामुळे पुढे श्लोक क्र. ८१ मध्येही स्वामी म्हणतात, ‘अती आदरें हा निजध्यास राहो’ अशा या ‘निजध्यासा’चा अभ्यास करताना नामस्मरणाचा उपयोग होतो. असा सर्व संतांचा अभिप्राय आहे. त्यामुळे आपल्याला मिळणारा वेळ अनावश्यक गोष्टीत व्यतित न करता जर त्याचा उपयोग नामस्मरणासाठी केला, तर त्यातून सहजपणे ‘निजध्यास’ साधता येतो, हे स्वामींनी ‘सदा मानसीं तो निजध्यास राहो।’ या शब्दांत सांगितले आहे. राघवाची कथा मोठ्या आदराने कथन केली तर मी नामस्मरणासाठी पोषक ठरते.
 
 
मना रे जनीं मौन्य मुद्रा धरावी।
कथा आदरे राघवाची करावी।
नसे राम ते धाम सोडून द्यावे।
सुखालागि आरण्य सेवीत जावें॥४४॥
 
 
नामस्मरण, निजध्यास हे हितकारक असले, तरी माणसाला इतर बाबतीत बोलल्याशिवाय चैन पडत नाही. लोकांत, समाजात वावरताना आपण काहीतरी मतप्रदर्शन करावे, असे प्रत्येकाला वाटत असते. स्वामी या श्लोकात सांगतात की, तसं पाहिलं तर माणसाने लोकांत वावरताना मौन धारण केले पाहिजे. पण, व्यवहारात आपल्या कामासाठी बोलावे लागतेच. सर्वकाळ लोकांत मौन धारण केले, तर गैरसमज होण्याची शक्यता असते. तेव्हा आवश्यक तेवढेच बोलावे, ही मौनमुद्रा समजावी तथापि बोलण्याची हौस भागवण्याची तर मोठ्या आदराने रामाविषयी, रामकथेविषयी बोलावे. कारण, रामाच्या गुणवर्णनात सारे पवित्र, संपन्न व मनाला आनंद देणारे आहे.
 
 
तथापि काही लोक रामाचा द्वेष करणारे, त्याच्या विरुद्ध बोलणारे आढळतात. वस्तुतः रामचरित्र निष्कलंक असून रामाच्या ठिकाणी अनेक गुणविशेष, अनेक आदर्श एकत्र आले आहेत. तरीही कुणाला त्यात दोष आढळत असतील, तर अशा लोकांशी वाद घालण्यात अर्थ नसतो. त्याने आपलेच समाधान बिघडते. यासाठी जेथे रामाचा आदर राखला जात नाही, ते घर सोडून द्यावे. त्यांच्याशी संबंध, ठेवू नये. त्यापेक्षा अरण्यात, निसर्गसान्निध्यात रामचिंतनात, नामस्मरणात, भगवंताच्या लिला पाहण्यात आनंद आहे. रामाच्या त्याच्या गुणांच्या संगतीने समाधान हे महत्त्वाचे आहे. रामाच्या व त्याच्या गुणांच्या संगतीने आपले समाधान टिकून राहणारे आहे. असे असले तरी लोकांना आपला अहंकार वाढवणार्‍या संगतीची फार आवड असते. अहंकार पोषणाने बुद्धी रामापासून दूर जाते, पण तरीही अशीच अहंकार वाढवणारी संगत लोकांना प्रिय असते. पुढील श्लोकांचा तोच विषय आहे.
 
 
 
 
  लेखक: सुरेश जाखडी
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.