काही दिवसांपूर्वी ‘फिल्ड’मध्ये काम करताना गोवरसंबंधी येणार्या अडचणी, दाट लोकवस्तीच्या चाळीमधील लोकांचे अज्ञान, असहकार्य, त्यांची सरकारी रुग्णालयांसंबंधीची मते अशा अनेक विषयांवर चर्चा झाली. लसीकरणाबद्दल पालकांच्या मनात असलेला संभ्रम, त्यांचे असहकार्य असेही मुद्दे चर्चिले गेले. या सर्वांवरुन जाणवले की, आरोग्य लोकशिक्षण आपल्याकडे पुरेशा प्रमाणात होत नाही. सध्या चालू असलेल्या गोवरच्या साथीबद्दलचे संभ्रम दूर करण्याचा येथे प्रयत्न करीत आहे. पालकांकडून विचारल्या जाणार्या शंकांचे निरसन प्रश्न-उत्तरांच्या स्वरुपात देत आहोत.
१) ‘गोवर’ची साथ ही कोरोनाच्या साथीसारखीच व्यापक व भीतीदायक आहे का?
अजिबात नाही. कोरोना हा नवीन आजार होता. तो झपाट्याने जगभर पसरला. त्याची गुंतागुंत झपाट्याने होत असल्यामुळे अनेक जण मृत्युमुखी पडले. साथ आटोक्यात येण्यास सुमारे दोन वर्षे लागली. या आजाराची लसदेखील नवीन असल्यामुळे त्याविषयी पूर्वानुभव नव्हता.गोवरच्या बाबतीत तसे म्हणता येणार नाही. हा जुना आजार आहे. याविषयी आपल्याला बरीच माहिती आहे. विशेष म्हणजे, गेली ३५ वर्षे प्रभावी लसीकरण केल्यामुळे गोवरचे रुग्ण कमी कमी होत चालले होते. गोवरची लस ८०च्या दशकात भारतात उपलब्ध झाली. काही वर्षांतच ती सरकारी दवाखान्यात मोफत उपलब्ध झाली. यामुळे व्यापक प्रमाणात लसीकरण होऊन गोवरच्या रुग्णाची संख्या कमी कमी होऊ लागली. बाळाला नवव्या महिन्यात व १५व्या महिन्यात लस दिल्यास त्यामुळे मिळणारे संरक्षण आयुष्यभर असते, एवढी प्रभावी ही लस आहे.
आपण आपल्या लोकसंख्येचा विचार केला, तर ४० वर्षे ओलांडलेल्या आपल्यापैकी बर्याच जणांना लहानपणी गोवरची लागण झालेली असण्याचा शक्यता आहे. एकदा गोवर झाल्यास त्यामधून निर्माण होणारी प्रतिकार शक्ती आपल्याला गोवरपासून आयुष्यभर संरक्षण देते. ४०च्या खालील वयाच्या अनेक नागरिकांनी ही लस त्यांच्या लहानपणी घेतली असल्याची शक्यता आहे. ज्यांनी लस घेतली आहे, त्यांना गोवर होण्याची शक्यता नाही. लहान मुलांचे सुजाण आणि सुशिक्षित पालक आपल्या मुलांच्या लसीकरणांबद्दल जागरुक असतात. डॉक्टरांच्या सल्ल्याने ते प्राथमिक लसीकरण पूर्ण करतात, अशा मुलांंनादेखील गोवर होण्याची शक्यता नाही. त्यामुळे ज्या मुलांचे लसीकरण राहिले आहे, त्याच मुलांना सध्या गोवर होतोना दिसत आहे.
२) कोरोनानंतर लगेचच ही साथ का आली?
कोरोना ‘लॉकडाऊन’च्या काळात सर्व व्यवसाय ठप्प झाले होते. एक वर्षाखालील मुलांचे प्राथमिक लसीकरणदेखील थांबले होते. कोरोनाची साथ नियंत्रणात आल्यावर व दैनंदिन व्यवहार नियमित सुरु झाल्यावर प्राथमिक लसीकरण न झालेल्या मुलांवर विशेष लक्ष देऊन ते लसीकरण लवकरात लवकर करण्याची गरज होती. लसीकरणाचा सर्वे घेऊन लसीकरणाची मोहीम प्राधान्याने राबवायला पाहिजे होती. तसे झाले नाही. गोवर, बीसीजी, पंचगुणी, पोलिओ या आजारांचेदेखील प्राथमिक लसीकरण राहिले असण्याची शक्यता आहे.
लसीकरणाबद्दल पालकांच्या मनातील संभ्रम, अज्ञान व असहकार यामुळेदेखील ही गोवरची साथ आली आहे. आजही ‘फिल्ड वर्कर’ जेव्हा घरोघरी जाऊन सर्व्हे करतात तेव्हा त्यांना सांगण्यात येते ’हमारे मजहब में टीका नही दिया जाता.’ खासगीमध्ये लसी महागड्या असल्यामुळे व सरकारी इस्पितळातील प्रचंड गर्दी आणि तेथे दिली जाणारी वागणूक यामुळेदेखील अनेक मुलांचे लसीकरण राहून गेले आहे.
३) पालकांच्या मनामध्ये लसीकरणाच्या बाबतीत गोंधळ का आहे?
आपल्या देशात दोन लसीकरण कार्यक्रम अस्तित्वात आहेत. एक राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम आणि दुसरा ’इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स’चा (आयएपी) राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात बीसीजी, पोलिओ, पंचगुणी, गोवर व एमएमआर या लसींचा समावेश आहे. या सर्व लसी सरकारी रुग्णालयात आणि दवाखान्यात मोफत दिल्या जातात. ’इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स’च्या लसीकरण कार्यक्रमात वरील लसी व्यतिरिक्त हिपेटायटिस ए, चिकन पॉक्स (कांजण्या), स्वाईन फ्लू न्यूमोकोकल, मेनिगोकोकल सर्वांयकल कॅन्सर (एचपीव्ही) या लसींचा समावेश आहे. या सर्व लसी सरकारी रुग्णालयात उपलब्ध नाहीत. या सर्व लसी बर्यापैकी महाग आहेत.
‘न्यूमोकोकल’ आणि ‘मेनिगोकोकल’ या लसींची किंमत प्रत्येकी चार हजार रुपयांच्या घरात आहे. या सर्व लसींबद्दल पुरेसे लोकप्रबोधन केले गेलेले नाही. सामान्य माणसांना या लसींच्या किमती परवडणार्या नाहीत. जेव्हा या लसी बळजबरीने देण्यात येतात, तेव्हा पालक लसीकरणासाठी खासगी दवाखान्यात जाण्याचे टाळू लागतात. यातूनच गोवरसारखे महत्त्वाचे प्राथमिक लसीकरण राहून जाते.लसीकरणाचा कार्यक्रम एकच असावा. तो राष्ट्रीय लसीकरणाचा कार्यक्रम असावा. उरलेल्या महागड्या लसी या ऐच्छिक लसी म्हणून जाहीर कराव्यात. ज्या पालकांना या महागड्या लसी परवडतील, त्यांनी त्या अवश्य घ्याव्या, पण सामान्य पालकांवर बळजबरी करु नये. ’इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स’ने सल्लागाराची भूमिका घ्यावी. महागड्या लसींचे ‘मार्केर्टिंग’ करुन पालकांच्या मनात संभ्रम यनिर्माण करु नये.
४) या गोंधळावर मध्यम उपाय काय?
ज्या लसी सरकारी रुग्णालयात मोफत उपलब्ध आहेत, त्या आधी घ्याव्या व बाळाचे प्राथमिक लसीकरण पूर्ण करावे. उरलेल्या ऐच्छिक आणि महागड्या लसी आपल्या आर्थिक सवडीने आपल्या ‘फॅमिली डॉक्टर’च्या सल्ल्याने घ्याव्या.
५) लसीकरणासाठी पालक, सरकारी रुग्णालयात जाण्याचे का टाळतात?
तेथे लसी मोफत उपलब्ध असल्या, तरी तेथे असणारी प्रचंड गर्दी, अरेरावी, अस्वच्छता यामुळे सामान्य पालक सरकारी रुग्णालयात जाण्याचे टाळतात. यात सुधारणा झाली, तर सामान्य पालक नक्कीच या मोफत लसीकरणाचा फायदा घेतील. लसीकरणासाठी स्वतंत्र विभाग, वार, काम करणार्या स्त्रियांसाठी संध्याकाळची ओपीडी आणि वागणूक सौजन्याची असेल तर बरेच पालक या सवलतीचा लाभ घेतील.डॉक्टरांची बाजू ऐकली तर तुटपुंजा स्टाफ, राजकीय हस्तक्षेप, डॉक्टरांना होणारी मारहाण या गोष्टी समोर येतात. आरोग्य सेवेत सुधारणा करायची असेल, तर सर्व वैद्यकीय स्तरातील रिक्त पदे प्राधान्याने भरण्यात यावी.
६ ) गोवरची साथ कधी आटोक्यात येईल?
गोवरची लस फार प्रभावी आहे. यामुळे मिळणारे संरक्षण आयुष्यभर पुरते. नवीन केसेचे लवकर निदान, त्यांचे विलगीकरण, दाट वस्तीमध्ये लसीकरणाचा ‘डोअर टू डोअर सर्व्हे’, लसीकरणाची शिबिरे, प्रायव्हेट डॉक्टर्स, सरकारी डॉक्टर्स व एनजीओ, फिल्ड वर्कस यांचा चांगला समन्वय झाल्यास व लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविल्यास ही साथ काही महिने ते काही आठवड्यात आटोक्यात येऊ शकेल.
७ ) प्रसार माध्यमांची भूमिका काय असावी?
प्रसार माध्यमांनी आजाराबद्दल योग्य माहिती जनतेला द्यावी व त्यांच्यामध्ये भीती कमी होईल, याची काळजी घ्यावी. ’ब्रेकिंग न्यूज’च्या नावाखाली लोकांमध्ये दहशत निर्माण करु नये. अॅनिमेशन फिल्म, कार्टून फिल्म, नामवंत सेलिब्रिटींचे आवाहन याद्वारे देखील समाज प्रबोधन करता येईल. मुख्य: म्हणजे कोरोना महामारीची लाट आणि सध्याची गोवरची साथ यातील फरक सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावा.
८ ) आरोग्य लोकशिक्षण कुणी द्यावे?
आरोग्य लोकशिक्षण हे प्रत्येक डॉक्टरने द्यावे. रुग्णांवर उपचार करताना त्यांच्या शंकाचे निरसन करणे, त्यांचे गैरसमज दूर करणे हेदेखील डॉक्टरांचे कर्तव्य आहे. सध्याच्या गोवरच्या साथीत लोकशिक्षणाची नितांत गरज आहे. ’इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन’ तसेच इतक स्वयंसेवी संस्था यांनी याबाबतीत पुढाकार घ्यावा. गोवरची माहिती ही वेगवेगळ्या भाषेत उपलब्ध करावी.
९ ) सेवाभावी संस्थांची काय भूमिका असावी?
त्यांनी फिल्डमध्ये जाऊन लोकांशी संवाद साधावा, ज्या मुलांचे लसीकरण राहिले आहेत त्यांचे नियोजन करावे. सरकारी रुग्णालयेे व सामान्य नागरिक याच्यामधील दुवा ते बनू शकतात. सध्याच्या गोवरच्या साथीत ही भूमिका फार महत्त्वाची ठरेल.
-डॉ. मिलिंद शेजवळ