अक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरण नेमके काय ? छत्रपती संभाजीराजे अक्षयच्या पाठीशी !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-May-2020
Total Views |

akshay borhade_1 &nb




मुंबई :
दोन दिवसांपूर्वी अक्षय बोऱ्हाडे या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामध्ये हा तरुण दावा करत आहे की, शिवऋण प्रतिष्ठानच्या माध्यमातून बेघर, निराधार लोकांची सेवा करत असल्याने जुन्नरमधील बड्या राजकीय नेत्याकडून आपणास मारहाण करण्यात आली आहे. खुद्द भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी याप्रकरणी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. याचबरोबर छत्रपती संभाजीराजे यांनीही अक्षयला फोन करुन धीर दिलाय. याप्रकरणी आरोप ठेवण्यात आलेले साखर कारखान्याचे चेअरमन व मारहाणीचा आरोप असणाऱ्या सत्यशील शेरकर यांनीही आपली बाजू मांडली. याप्रकरणी सत्यशील शेरकर यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.



अक्षय बोऱ्हाडे मागील काही वर्षांपासून शिवऋण प्रतिष्ठानच्या माध्यमातून मनोरुग्ण, गरीब तसेच निराधार लोकांसाठी काम करतो. व्हायरल व्हिडिओत हा तरुण म्हणतोय "गेल्या ३ वर्षापासून मी छत्रपती शिवरायांच्या विचाराने समाजाची सेवा करत आहे. निराधार, गरीब लोकांना जेवण देण्याचे त्यांना न्याय देण्याचे काम केले, कधीही स्वत:चा विचार केला नाही. माझे कुटुंबदेखील माझ्यासोबत काम करत आहे. काही राजकीय मंडळींनी मला त्यांच्या बंगल्यावर नेऊन मारहाण केली. मला बंदूक दाखवून त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली, मोबाईल काढून घेतला. तसेच माझा व्हिडीओ काढून पैसे घेतल्याचं बतावणी करण्यात आली. पैशाच्या जोरावर मला मारहाण केली. मी केलेले आरोप खोटे असेल असे वाटत असेल तर चेअरमनच्या बंगल्यावरील सीसीटीव्ही चेक करा, त्याच्यापुढे जाणाऱ्या माणसांना मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला आहे." परंतु याप्रकरणावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी दुसरी बाजू पडताळण्याची गरज असल्याचे म्हटले आणि सत्यशील शेरकर यांनी आपली बाजू मांडताना, मारहाणीचे सर्व आरोप फेटाळले.




दरम्यान याप्रकरणी भाजप खासदार उदयनराजे भोसेले आणि छत्रपती संभाजीराजे यांनी अक्षयला आधार दिला आहे. छत्रपती संभाजीराजे यांनीही फेसबुक पोस्ट लिहून, अक्षय तू भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे, असे म्हटले आहे. घरातील गरिबीची तमा न बाळगता समाजाची सेवा झोकून देऊन करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडे या मुलावर अत्याचार झाल्याची बातमी मनाला वेदना देऊन गेली. छत्रपती शिवाजी महाराज,संभाजी महाराजांना आदर्श मानून त्याने कार्य सुरू ठेवले आहे. या मुलाच्या कार्याची दखल घेत, पुरंदर किल्ल्यावर शंभु जयंती ला माझ्या हस्ते सत्कारही करण्यात आला होता. अशा प्रामाणिक शिवभक्ताला एका सत्तांध व्यक्तीकडून मारहाण होते, त्यांनतर त्याला बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी मिळते. हे अत्यंत चुकीचे आहे. पोलीस प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. संपूर्ण घटनेचा छडा लावून आरोपी ला तात्काळ शिक्षा झाली पाहिजे, कुणा पक्षाचा, कुणा जातीचा, कारखानदाराचा किंवा मोठ्या घरचा म्हणून का मुलाहिजा ठेवावा? तसेच, अक्षयला पोलीस संरक्षण देण्याच्या सूचनाही केल्याचे संभाजीराजेंनी सांगितले. त्यानंतर सत्यशील शेरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
@@AUTHORINFO_V1@@