जयंत पाटील प्रदेशाध्यपदातून मुक्त होणार? पवारांसमोरच केली विनंती, म्हणाले...
10-Jun-2025
Total Views |
पुणे : शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्या एका विधानामुळे ते प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त होणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. मंगळवार, १० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २६ वा वर्धापन दिन असून दोन्ही गटाकडून हा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे.
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदीर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मेळावा पार पडला. यावेळी जयंत पाटील यांनी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे, असे विधान केले. त्यामुळे आता जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपद सोडणार का, असा चर्चांना उधाण आले आहे.
जयंत पाटील म्हणाले की, "मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली. ७ वर्षांचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. यानिमित्ताने आपल्या सर्वांसमोर साहेबांना एवढीच विनंती करेन की,.." असे म्हणताच जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.
त्यामुळे "शेवटी हा पक्ष शरद पवार साहेबांचा आहे. त्यामुळे तेच याबाबत निर्णय घेतील. आता आपल्याला बरेच पुढे जायचे आहे," असे विधान जयंत पाटलांनी केले आणि त्यांनी आपले भाषण संपवले. त्यानंतर जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त होणार का? आणि तसे झाल्यास शरद पवार गटाचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण होणार? असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.