एका पिढीने पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वत:ची आवड जपत, स्वप्नपूर्तीसाठी झटणार्या नवोद्योजक साईश कोलते यांच्याविषयी...व्यवसायाचे स्वप्न अनेकजण बघतात, त्यापैकी काहींचेच पूर्ण होते. मात्र, उद्योगपती होण्याचे स्वप्न बघणारे आणि ते सत्यात उतरवणारे विरळच! उद्योग निर्माण करण्याइतकेच महत्त्व, तो उद्योग पुढे सांभाळणार्या आणि वाढवणार्यालाही असते.
साईश कोलते हे याचे उत्तम उदाहरण ठरावे. साईश यांचे बालपण मुंबईतलेच. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईतील डॉ. अँटोनियो द सिल्वा शाळेमध्ये झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी डी. जी. रुपारेल महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर सनदी लेखापालसाठीची असलेली परीक्षाही साईश उत्तीर्ण झाले. आज साईश स्वतः सनदी लेखापाल म्हणून दादरमध्ये स्वतःचा व्यवसाय सांभाळत आहेत. साईश यांचा प्रवास इथेच थांबत नाही. एका पिढीने पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी दुसरी पिढी कशी मेहनत घेते, याचे आदर्श उदाहरण म्हणजे साईश होय!
कोलते कुटुंबाच्या पादत्राणे उद्योगाची सुरुवात करण्यात महत्त्वाचा वाटा साईश यांचे वडील लक्ष्मण कोलते यांचा! आकाराने मोठे असलेले कुटुंब आणि खोल्यांच्या लहान आकारामुळे अनेकवेळा साईश यांच्या वडिलांना रात्री घराबाहेरच झोपावे लागे. या सगळ्यातही साईश यांच्या वडिलांनी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्याचा चंग बांधला. दरम्यानच्या काळात त्यांनी एका पादत्राणांची यंत्रसामुग्री तयार करणार्या एका कंपनीमध्ये काहीकाळ नोकरीही केली. कोलते कुटुंबाचा मुख्य व्यवसाय हा पानाच्या गादीच्या. मात्र, साईश यांच्या वडिलांनी हा परंपरांगत व्यवसाय सोडून नोकरी करण्यास सुरुवात केली. नोकरी दरम्यान त्यांच्यात एक सुप्त महत्त्वाकांक्षा जन्म घेत होती, ती म्हणजे कधीतरी उद्योजक व्हायचे. त्यासाठी त्यांनी विचार सुरू केला. त्यातून त्यांना पादत्राणे निर्मितीची संकल्पना सूचली. साईश यांच्या वडिलांनी पादत्राणे निर्मितीची संकल्पना त्यांच्या महाविद्यालयातील चार मित्रांसमोर ठेवली. संकल्पना आवडल्याने त्यावर सगळ्यांचे एकमत झाले.
त्याचवेळी वेगळेच क्षेत्र निवडल्याने साईश यांच्या वडिलांना घरातून विरोध झाला. मात्र, यावेळी त्यांचे भाऊ परशुराम कोलते यांनी नुसताच पाठिंबा न देता, साईश यांच्या वडिलांना अदमासे ४५ वर्षांपूर्वी अडीच हजार रुपयांचे भांडवलही दिले. दुसरीकडे चार मित्रांनीही तेवढेच भांडवल घरातून आणले. थोडी जागा खरेदी करून नव्या उद्योगाची सुरुवात १९८१-८२ सालच्या आसपास सफाळे इथे केली. लगेचच १९८३ साली त्यांना एका बहुराष्ट्रीय कंपनीची ऑर्डर मिळाली. पहिली ऑर्डर यशस्वीरित्यापूर्णही झाली. मात्र, दुधात मिठाचा खडा पडावा, असे काहीसे झाले. ऑर्डर मिळालेल्या कंपनीच्या गोदामांना आग लागल्याने ती कंपनीच डबघाईला आली. पहिल्याच ऑर्डरमध्ये प्रचंड मोठा आर्थिक फटका साईश यांच्या वडिलांना बसला. यातून सावरणे जवळपास अशक्यच होते, अशावेळी राजा फडके या हितचिंतकांनी त्यांना तसे न करण्याचा सल्ला दिला. मात्र, आता प्रगती अधिक लांबणार होती. शक्य नसल्याने या मित्रांमधील तीन भागीदार बाहेर पडले. अखेरीस साईश यांचे वडील आणि त्यांचे भागीदार यांनी मिळून सफाळ्यात हाच उद्योग यशस्वी करून दाखवला होता. सफाळ्यातील त्यांच्या कंपनीमध्ये जवळपास ६५० हातांना रोजगार मिळत होता, तर अनेक राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचा मालही त्यांच्या फॅक्टरीमध्ये तयार होत होता.
साईश आणि त्यांच्या भगिनी दोघेही लहानपणापासूनच हे पाहात मोठे झाल्याने साहजिकच यातील बारकावे त्यांच्या लक्षात येत होते. दोघांनीही वडिलांच्या व्यवसायाकडे न वळता थोडा वेगळा मार्ग स्वीकारला. साईश यांच्या वडिलांनीही तो सहज स्वीकारू दिला हे त्यांचे मोठेपण. पण, काळ मोठाच गतिमान आहे. इतके दिवस गुण्यागोविंदाने सुरू असलेला हा व्यवसायदेखील दुभंगण्याच्या स्थितीमध्ये आला. साईश यांच्या वडिलांच्या भागीदारांच्या पुढच्या पिढीला जुळवून घेण्यास थोडा त्रास होऊ लागला. परिणामी मार्ग काढण्याचा आटोकाट प्रयत्न केल्यावरही अपयश आल्याने साईश यांच्या कुटुंबानेच त्यातून बाहेर पडून नवीन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये साईश आणि त्यांच्या भगिनींचा वाटा लाखमोलाचा.
पुढे त्यांच्या कुटुंबानेच ‘कोलते फुटवेअर वर्ल्ड’ नावाने स्वतःची पादत्राणे निर्मितीची कंपनी भिंवडीनजीक सुरू केली. साधारण ४० वर्षांपूर्वी जिथून सुरुवात झाली होती, तिथेच एकदा कोलते कुटुंब पुन्हा उभे होते. मात्र, यावेळी गाठीशी होता तो प्रचंड अनुभव आणि इच्छाशक्ती. आज साईश यांच्या कंपनीमध्ये जवळपास १५० हातांना रोजगार मिळाला आहे. आज एका मोठ्या कंपनीतील नोकरी सोडून साईश यांच्या मोठ्या भगिनी श्रद्धा रेडीज यादेखील साईश यांच्याबरोबरीनेच या कंपनीला यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहेत. वडिलांबरोबर १५ वर्षांचा अनुभव गाठीशी असल्याने आज श्रद्धा कंपनीतील निम्मा कारभार एकट्यानेच लीलया सांभाळतात. साईश यांच्या पत्नी निकिताही या कंपनीतील मानव संसाधन विभागाची जबाबदारी पाहत आहेत.
भारताच्या पादत्राणे तयार करण्याच्या क्षेत्रात खूप संधी आहेत. त्यासाठीच स्वदेशी आणि परदेशी ग्राहकांना आकर्षित करेल अशी डिझाईन्स आणि रंगसंगती देण्याचा आम्ही प्रयत्न करत असल्याचे साईश सांगतात. साईश यांनी त्यांच्या कंपनीमध्ये निर्माण होणार्या पादत्राण्यांना इटलीमधील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनातदेखील सादर केले आहे. वडिलांचे प्रत्येक स्वप्न त्यांच्या मार्गदर्शनात पूर्ण करताना पादत्राणे क्षेत्रातही भारताचे नाव मोठे करण्याचे स्वप्न साईश यांनी पाहिले आहे. त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!