साधूहत्या हे डाव्यांचे सुनियोजित षड्यंत्र : आप्पा जोशी

    दिनांक  15-May-2020 23:10:37   
|


appa joshi_1  Hआप्पा जोशींची ही विशेष मुलाखत, त्या सगळ्यांसाठी ज्यांना वाटतं, पालघरमध्ये दोन संतांची हत्या झाली, ती निव्वळ गैरसमजातून. आप्पांनी अनेक वर्षे पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात सेवाकार्य केले आणि तेव्हा त्यांच्यावरही असाच जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. म्हणूनच पालघरच्या या साधू हत्यांकाड प्रकरणातील ‘कम्युनिस्ट कनेक्शन’चा आप्पांनी केलेला हा पर्दाफाश...पालघरमध्ये दोन साधूंची हत्या झाली. ही घटना गैरसमजातून घडली, चोर असल्याच्या संशयावरून घडली, असं आपल्याला वाटतं का?


१६ एप्रिल रोजी पालघरच्या गडचिंचलेमध्ये जी दुर्देवी घटना घडली, त्यानंतर लगेचच माझ्या लक्षात आलं की, याबाबत ‘गैरसमजातून’, ‘चोरीच्या संशयातून’ अशी अत्यंत चुकीची माहिती पसरवली जाते आहे. ५०-५२ वर्षांमध्ये मी या साम्यवाद्यांना, कष्टकरी मिशनर्‍यांना जवळून अनुभवलं आहे. हे सगळं इतकं भयानक असून अशाप्रकारचे जीवघेणे हल्ले त्या परिसरात अनेकदा झालेले आहेत. तशाच एका हल्ल्याच्या अनुभवातून काही वर्षांपूर्वी मलाही जावं लागलं होतं.

आप्पा, तुमच्या डोक्यावरील जखमेच्या खुणा तुमच्यावर झालेल्या हल्ल्याची आजही साक्ष देतात. काय घडलं होतं नेमकं त्या दिवशी?


आयुष्यात तो दिवस मी कधीच विसरणार नाही. १४ ऑगस्ट १९९१ रोजी माझ्यावर साम्यवाद्यांनी अगदी ठरवून हल्ला केला. त्यांचे त्यावेळेचे पुढारी हे सगळे हल्लेखोरांचे पाठीराखे होते. सेवाकेंद्राची जागा ही साधारणतः पावणे दहा एकर... वेगवेगळ्या अंतरावरून त्या ठिकाणी साधारणपणे सातशे ते आठशे लोकांचा जमाव चाल करुन आला. जवळून जाणार्‍या महामार्गावरूनही साठ-सत्तर लोकं झुंडीने शिरले. रस्त्यात पहिलं घर माझंच असल्यामुळे एकही दार व खिडकी त्यांनी शिल्लक ठेवली नाही. मला त्यांनी खेचून बाहेर काढलं. माझी पत्नी पाठीमागच्या बाजूने बाहेर पडली. तिलाही दोन दगड लागले. एक दगड नेमका डोक्याला लागला व रक्तप्रवाह सुरू झाला. माझी पत्नी बेशुद्ध पडली. मला बाहेर नेऊन साठ-सत्तर लोक मरेस्तोवर मारत होते. अगदी नियोजनबद्ध पद्धतीने सायरन वाजला व गाडी आली. मी बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर तसाच पडून होतो.

तुमच्यावरील या हल्ल्यामागचे नेमके कारण समजू शकेल का?


आपल्या पायावर उभा राहिलेला आदिवासी या साम्यवादी मंडळींना नको होता. कितीतरी आदिवासी विद्यार्थी आमच्या सेवाप्रकल्पाच्या माध्यमातून शिकले होते, पदवीधर झाले होते. चिंतामण वनगा तर खासदार झाले होते. आदिवासी शिकला, आपल्या पायावर उभा राहिला, नोकरी करू लागला, व्यवसाय करू लागला, तर तो स्वाभिमानी होईल व त्यांची दहशत संपेल, हेच या मंडळींना नको होतं. म्हणून त्यांनी हा हल्ला केला.

आजवर असे किती हल्ले त्या भागात झाले? आणि त्यामागील हल्लेखोर कोण होते?


पहिला हल्ला देऊ बेंदेर यांच्यावर झाला. १९७० साली हा हल्ला झाला. तो हल्ला इतका भीषण होता की, ते सात दिवस कोमामध्ये होते. त्यातच ते गतप्राण झाले. हिंदू सेवा संघाने थेरोंदा या गावात जे काम सुरू केलं होतं, तिथे दामुअण्णा टोकेकर यांचं त्या सेवाकार्याला मार्गदर्शन असे. दामुअण्णा त्या केंद्रावरच राहत असत. म्हणून त्या केंद्रावर हल्ला करण्यात आला. सुदैवाने दामुअण्णा तिथे नव्हते. त्यामुळे ते वाचले. वामनराव सहस्रबुद्धे व त्यांच्या पत्नी पुढे आल्या. पत्नीच्या पोटात त्यांनी भोसकलं. दुर्दैवाने वहिनी वारल्या. त्याआधीही असाच एक हल्ला झाला होता. एकाच वेळेला ६५ घरं या लोकांनी तोडली होती. अनेक बकर्‍यांच्या पाठी तोडल्या होत्या. जेणेकरून त्यांना असं दाखवायचं होतं की, जशी बकर्‍यांची पाठ तोडली आहे तसे तुमचे हालहाल आम्ही करू.

या हल्लेखोरांचा खरा चेहरा कोणाचा होता आणि आहे, असे आपल्याला वाटते?


डावे, साम्यवादी हेच या सगळ्याच्या पाठीमागे आहेत. स्वतःच्या देशाचा विचार करणारा, हिंदुत्वाचा विचार करणारा असा कोणीही त्यांना नको. तलासरीला जे वसतिगृह सुरू झालं, त्याच्यामध्ये देशाच्या संस्कृतीचा, हिंदुत्वाचा विचार केला गेला, हे त्यांना सहन झालं नाही. चिंतामण वनगा खासदार झाले, हे त्यांना सहन झालं नाही. तेव्हा डाव्यांनी असं ठरवलं की, हे सेवाकार्याचं केंद्रच नष्ट करूया. माधवराव काणे त्या कामात प्रमुख होते, तर माधवरावांना संपवूया, असं त्या मंडळींनी ठरवलं.

हिंदुत्वाविषयी शत्रुत्वाचा दृष्टिकोन हा आजवरच्या हल्ल्यांत दिसून येतो. आताची परिस्थिती जर आपण पाहिली तर त्यातील दोन्ही बळी हिंदू संत आहेत व तेथील आमदार एका डाव्या विचारसरणीच्या पक्षाचे आहेत. तेव्हा, गेल्या कित्येक वर्षांपासून हे असेच प्रकार का सुरू आहेत?


खरं म्हटलं तर आगामी जनगणनेच्या अनुषंगाने ‘आदिवासी हिंदू नाहीत, आम्ही केवळ आदिवासी आहोत,’ अशी मानसिकता रुजवण्यासाठी गावोगाव प्रचार सुरू आहे. एक कार्यकर्ते त्या भागात एक गाव दत्तक घेऊन पाच वर्षांपासून काम करीत आहेत. त्यांनाही १६ मार्चला गावात येऊ दिलं नाही. त्यांना सांगितलं, “तुम्ही इथून जेवढ्या लवकर जाल तितकं बरं राहील. आम्ही तुम्हाला वाचवू शकणार नाही.असे सांगून १६ मार्चलाच त्यांना गाव सोडावं लागलं. त्यामुळे १६ एप्रिलला जी घटना घडली, त्यामागे काही दिवस, काही महिन्यांचे प्रयत्न आहेत. जेणेकरून आदिवासी ‘मी हिंदू आहे,’ असे सांगू नये. म्हणून त्यांच्या घरातून देवीदेवतांचे फोटो काढणे, नदीत नेऊन टाकायला लावणे हे तेव्हापासून सुरु आहे. यांच्यामध्ये अलीकडे ‘रावण हा आमचा देव आहे,’ असं मानणारी जी मंडळी आहेत, तसेच ’कष्टकरी’ जी ख्रिश्चन मिशनर्‍यांची एक विंग आहे आणि त्याला जोडून हे जे डावे एकत्र येऊन एकप्रकारचे षड्यंत्र रचत आहेत.

गडचिंचले गावच्या सरपंच चित्रा चौधरी या भाजपच्या आहेत. त्यांच्याविषयी वेगवेगळ्या स्वरूपाच्या बातम्या आल्या, त्याबद्दल काय सांगाल?


सरपंच चित्रा चौधरी यांनी त्या साधूंना काही काळ जमावापासून सुरक्षित ठेवलं आणि त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पोलिसांना फोनही केला होता. तेथील वन विभागाच्या चौकीत साधूंना नेऊन बसवलं. त्यांनी कोणताही त्रास न देता पोलिसांच्या ताब्यात देण्याचं काम केलेलं आहे.

त्या भगवे वस्त्रधारी साधूंना म्हणूनच ही शिक्षा भोगावी लागली का?


खरं म्हटलं तर जरी संशय असला तरीही थोडी फार मारहाण झाल्यावर, आता या साधूंना पोलिसांच्या ताब्यात देऊया, असं तिथे जे विविध पक्षांचे पुढारी आले, यांनी म्हणायला हरकत नव्हती. पण, तसं झालं नाही.

 
आजही या भागातील कित्येक व्यक्तींच्या संपर्कात तुम्ही आहात. तुमच्या हाताखालून शिकलेले अनेक विद्यार्थी तिथे वास्तव्यास आहेत. त्यामुळे तुमच्याकडे असलेली माहिती विश्वासार्ह माहिती आहे. तर घटनास्थळी आलेले ते पुढारी नेमके कोण होते? आणि जमावाने साधूंना पोलिसांकडे सुपूर्द करण्यापेक्षा थेट त्यांना निर्घृणपणे ठार करण्यामागचा हेतू काय?


त्या भागात कष्टकरी संघटनेचे काम आहे. राष्ट्रवादी पक्षाचे स्थानिक पुढारीही तिथे आले होते. खरं म्हटलं तर त्यांचं काम जबाबदारीचं होतं. ‘पुढारी’ या नात्याने त्यांनी जमावाला शांत करून पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवं होतं. पण, त्यांनी त्या ठिकाणी केवळ बघ्याची भूमिका घेतली. त्यांनी जमावाला साधूंची हत्या करण्यासाठी पाठिंबा दिला का, याविषयी निश्चितपणाने काही सांगता येणार नाही. पण, त्यांनी बघ्याची भूमिका जरुर घेतली. म्हणून या साधूंचा हकनाक बळी गेला.
 

(मुलाखत : सोमेश कोलगे)

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.