मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Field Marshal Asim Munir Pak Army) ऑपरेशन सिंदूर राबवत भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त करत पाकिस्तानला योग्य धडा शिकवला. या दरम्यान पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांची पाक सरकारने हकालपट्टी केल्याची चर्चा रंगली. त्यांच्याजागी जनरल शमशाद मिर्झा यांची नवीन लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा रंगली. असीम मुनीर यांच्यावर वैयक्तिक अजेंडा राबवल्याचा आरोप असल्याने असे करण्यात आल्याची माहिती होती. मात्र आता पाक सरकारने त्यांची फिल्डमार्शल पदावर बढती देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याचे समोर आले.
हे वाचलंत का? : सैफुल्लाहनंतर पाकिस्तानात आणखी एका दहशतवाद्यावर अज्ञातांकडून हल्ला!
पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने मंगळवार, दि. २० मे रोजी एक निवेदन जारी करत म्हटले की, मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. वास्तविक भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून दहशतवादाविरोधात योग्य उत्तर दिल्यानंतर आणि पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांचेच नव्हे तर त्यांच्या हवाई तळांचेही मोठे नुकसान केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
तसे, काही काळापूर्वी, पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने एका महत्त्वाच्या निर्णयात लष्करी न्यायालयात नागरिकांवर खटला चालविण्यास मान्यता दिली होती. या निर्णयामुळे असीम मुनीर यांच्या नेतृत्वाखालील सैन्याला अधिक अधिकार मिळाले आहेत. पाकिस्तानमध्ये राजकीय आणि लष्करी अस्थिरता शिगेला पोहोचली असताना असीम मुनीर यांना ही बढती मिळाली आहे.