
गौरीकुंड : उत्तराखंडातील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गौरीकुंड परिसरात केदारनाथहून फाटाकडे परत येणारे खासगी हेलिकॉप्टर कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एकूण ७ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये ६ यात्रेकरू आणि १ पायलट यांचा समावेश आहे.
या अपघातानंतर उत्तराखंड नागरी उड्डयन विभागाने तातडीने मोठा निर्णय घेत चारधाम यात्रेतील सर्व हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेश येईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. दरवर्षी लाखो भाविक केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चारधाम स्थळांच्या दर्शनासाठी येतात. दुर्गम भागातील प्रवासासाठी हेलिकॉप्टर सेवा महत्त्वाची समजली जाते. मात्र आजच्या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत ही सेवा त्वरित थांबवण्यात आली आहे.
प्रशासनाने यात्रेकरूंना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे, शांतता आणि संयम राखण्याचे तसेच अधिकृत सूचनांची प्रतीक्षा करण्याचे आवाहन केले आहे. हेलिकॉप्टर सेवा पुन्हा सुरू करण्यापूर्वी सर्व तांत्रिक तपासण्या करण्यात येणार असून, या अपघाताची सखोल चौकशीही सुरू करण्यात आली आहे. संबंधित सेवा पुरवठादार कंपन्यांची कार्यपद्धती आणि यंत्रणांची पडताळणी करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.