मल्लाच्या आधारस्तंभाला समर्पित दिन...

    15-Jun-2025
Total Views |

भारताला अनेक खेळांचा इतिहास आहे. अशापैकीच एक म्हणजे मल्लखांब. एका लाकडी खांबावर चढत वेगवेगळ्या कसरती यात करतात. यामुळे उत्तम शरीर सौष्ठव प्राप्त होत असल्याने कुस्तींसारख्या खेळांमध्ये याचा उपयोग केला जातो. नुकताच आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन साजार झाला. त्यानिमित्ताने या खेळाच्या इतिहासाचा, त्यातील प्रगतीचा, त्यातील संधींचा घेतलेला आढावा...

प्रतिवर्षी दि. १५ जून रोजी साजरा होणारा आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन यावर्षीही सर्वांनी साजरा केला. हा दिवस ’मल्लखांब’ या पारंपरिक भारतीय खेळाला आणि त्याच्या ऐतिहासिक परंपरांना गौरवण्यासाठी साजरा केला जातो. मल्लखांब हा कुस्तीपटूंच्या प्रशिक्षणासाठी उपयोगात येतो आणि आता तर तो एक स्वतंत्र क्रीडाप्रकार म्हणूनही ओळखला जातो.

मल्लखांबप्रेमी डॉ. विजय भटकर

मल्लखांबाविषयी सुप्रसिद्ध श्रीनिवास श्रीरंग हवालदार यांनी लेखन-संपादन केलेल्या ‘म म मल्लखांबाचा महाराष्ट्राचा’ या पुस्तकाला, ‘महाराष्ट्रभूषण’, ‘पद्मभूषण’, ‘पद्मश्री’ मिळवलेल्या संगणकशास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी प्रस्तावना लिहिली होती. त्यात व्यक्त केलेल्या विचारांमधून मल्लखांबाची महती अधोरेखित होते,

लाघवं कर्मसामर्थ्यं दीप्तोग्निर्मेदसक्षय:|
विभक्त गनगावत्रत्वं व्यायामादुपजायते॥


व्यायामाने चपळाई, कार्यशक्ती, भूक वाढते आणि अवयव बांधेसूद होऊन, शरीरास सौष्ठव प्राप्त होते. म्हणूनच व्यायामाला जीवनात अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान असायला हवे. आपल्या क्रीडापरंपरेला गौरवशाली परंपरा आहे. मल्लयुद्ध, कुस्ती, धनुर्विद्या अशा अनेक क्रीडाप्रकारांचे दर्शन महाभारतात घडते. पुढे रामदासस्वामींसारख्या संतांनीही खेळाचे महत्त्व विशद केले आहेच. परंतु, दुर्दैवाने पाश्चात्यांचा पगड्यामुळे या क्रीडापरंपरांचा भारतीयांना विसर पडला की काय? अशी परिस्थिती मध्यंतरी निर्माण झाली. पण आता मात्र भारतीय तत्त्वज्ञानाचे, कलेचे, आयुर्वेदाचे, योगाचे, संगीताचे महत्त्व पटल्याचे चित्र निर्माण झाले आहे. २१वे शतक हे भारताचेच शतक आहे. या शतकात आपल्याला क्रीडापरंपरेचे पुनरुत्थान करायचे आहे. शरीरयष्टीसाठी कुस्ती, मल्लखांब इ. क्रीडाप्रकार आहेत. ऑलिम्पिकमध्ये पाश्चात्य खेळांचा समावेश आढळतो. आज मल्लखांबाच्या प्रचाराची गरज आहे. डॉ. विजय भटकर पुढे सांगतात की, त्यांचा मल्लखांबाशी संबंध आला तो स्वातंत्र्यलढ्यापूर्वीच्या काळात. त्यांच्या वडिलांनी त्यांना मल्लखांब, कुस्तीच्या परंपरेचा इतिहास सांगून ओळख करून दिली होती. त्यांच्या वडिलांनीच त्यांच्या गावात या खेळांची परंपरा सुरू केली. हे खेळ लोकप्रिय व्हावेत आणि मल्लखांबाचे तर गुरुकुल चालू व्हावे, ही इच्छा ते व्यक्त करतात. भारतीय क्रीडासंस्कृती, परंपरा आणि समर्थ रामदासस्वामींचा संदेश पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी तरुण मल्लखांबपटूंची गरज आहे.

१५ जून का?

मल्लखांब या नावातच ’मल्ल’ व ’खांब’ असा उल्लेख आहे. मल्ल म्हणजेच पैलवान आणि खांब म्हणजे पोल. इ. स. ११३७ मध्ये सोमेश्वर चालुय यांनी लिहिलेल्या ’मानसोल्लास’ या ग्रंथात ’मल्लस्तंभ’चा उल्लेख आढळतो. मल्लखांबाचे आद्यजनक गुरू बाळंभट्टदादा देवधर यांना चैत्र नवमीच्या दिवशी वणीच्या सप्तशृंगी देवीने ’प्रत्यक्ष बजरंगबली तुला कुस्तीचे डाव शिकवतील’ असा दृष्टांत दिला, अशी आख्यायिका आहे. त्यानुसार मारुतीरायांनी बाळंभट्टदादांना एका लाकडी लाटेवर कुस्तीचे डाव दाखविले. दादांनी त्यांचा सराव केला व ठरलेल्या मुदतीत पुण्याला परत येऊन, अलीला गळेखोड्याच्या डावाने पराभूत केले. ही ऐतिहासिक कुस्ती झाली बहुदा जून महिन्यातच झाली असावी. ‘महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटने’ची स्थापनाही १९८० साली दि. १५ जून याच दिवशी झाली, म्हणून दि. १५ जून हा दिवस ’मल्लखांब दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय २०१७ साली ‘राज्य मल्लखांब संघटने’च्या कार्यकारिणीने घेतला. यंदाचे त्याचे आठवे वर्ष होते.

अशी आहे ती आख्यायिका...

एका आख्यायिकेनुसार, मराठा साम्राज्याचे शेवटचे पेशवे बाजीराव दुसरे (शासन १७९६-१८१८) यांच्या कारकिर्दीत, हैदराबादच्या निजामाने दोन प्रसिद्ध पैलवानांना पुणे येथे पाठवले. अली आणि गुलाब या दोन पैलवानांनी पेशवे दरबाराला कुस्ती लढवण्याचे आव्हान दिले. बाळंभट्टदादा देवधर यांनी हे आव्हान स्वीकारून, तयारीसाठी काही वेळ मागितला. त्यानंतर ते वणी येथील देवी सप्तशृंगीच्या मंदिरात गेले. काही आठवडे देवीचे ध्यान केल्यानंतर, देवीने त्यांना स्वप्नात दृष्टांत देऊन हनुमंतरायांची मदत घेण्याबाबत सांगितले. त्यांना तिथे लाकडी खांबाची एक कल्पना सूचली, ज्यावर माकडांच्या झाडीतील हालचालींप्रमाणेच चालता येते. दोन महिन्यांच्या सरावानंतर, ते पुण्याला परतले आणि यमपाश डावाचा वापर करून (दोन्ही मांड्यांनी मान पकडून) अलीला हरवले. गुलाबने लढण्यास नकार दिला आणि बाळंभट्टदादा यांना विजयी घोषित करण्यात आले. पुढे त्यांनी, त्यांच्या मुलांनी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी आपले जीवन मल्लखांबावर भारतातील कुस्तीगीरांना प्रशिक्षण देण्यासाठी समर्पित केले.

साजरा झाला मल्लखांब दिन

जगात जिथे मल्लखांब चालतो, तिथे सर्वांनीच यथाशक्ती हा दिवस साजरा केला. या दिनानिमित्त विविध स्पर्धा, प्रात्यक्षिके, मनोरे स्पर्धा, आढ्या स्पर्धा, एक मिनिट, अर्धा मिनिट दसरंग स्पर्धा, माऊंट-डिसमाऊंट स्पर्धा भरवण्यात आल्या. याप्रसंगी मल्लखांब देवता बजरंगबली व आद्यजनक गुरू बाळंभट्टदादा देवधर यांच्या प्रतिमांचे पूजनही करण्यात आले. यावर्षी दि. १५ जूनला मल्लखांब दिनानिमित्त चेंबूरमध्ये वरिष्ठ आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सुनील गंगावणे यांच्या संकल्पनेतून, ‘मल्लखांब लीग’चे आयोजन करण्यात आले होते. अगदी पाच वर्षांच्या मुलापासून ते ८० वर्षे वयाच्या मल्लखांबपटूंचाही यामध्ये उत्साही सहभाग होता. मल्लखांबावरील मानवी मनोरे सादर करताना जी प्रेक्षकांची दाद मिळते, त्यामुळे मल्लखांबपटूंचा उत्साह द्विगुणित तर होतोच, पण नवा जोशही निर्माण होतो. सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड मिळून जवळपास ४० हून अधिक शाळा आणि संस्थामध्ये मल्लखांब खेळाचे प्रशिक्षण सुरू असून, हजारो खेळाडू मल्लखांब शिकत आहेत.

मागील तीन ते चार वर्षांपासून मल्लखांबाचा समावेश ‘खेलो इंडिया युथ गेम्स’, ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’, ‘खेलो इंडिया बीच गेम्स’ अशा वेगवेगळ्या स्तरांवर होत आहे. लवकरच ‘खेलो इंडिया स्कूल गेम्स’मध्येही मल्लखांबाचा समावेश करण्याची घोषणा, केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी केली आहे. जगात अमेरिका, जर्मनी, जपान, कॅनडा, नेपाळ, मलेशिया, थायलंड सिंगापूर, व्हिएतनाम, पोलंड, तसेच मध्य युरोप, लॅटिन अमेरिका व आशिया खंडातील उर्वरित देशांमध्येही मल्लखांबच्या प्रसार सुरू आहे. विदेशात मल्लखांबाचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य ‘पद्मश्री’ उदय देशपांडे व चिन्मय पाटणकर तसेच, ‘आशिया मल्लखांब कॉन्फडरेशन’चे अध्यक्ष राजीव जालनापूरकर यांच्या माध्यमातून सुरु आहे. तसेच भारतातील अनुभवी आणि उदयोन्मुख खेळाडू-प्रशिक्षक यांच्या माध्यमातूनही मल्लखांबचा प्रसार सर्वत्र होत आहे. मागील वर्षी अभिजित भोसले यांचा चेला, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू ऋषिकेश अरंकल्ले हा नेपाळमध्ये जाऊन १२ दिवस ‘कोचिंग फॉर कोचेस’ असा कॅम्प घेऊन आला.

भारतात विदेशी संघांचा सहभाग

मल्लखांबच्या २०१९, २०२३ अशा दोन विश्वचषक स्पर्धा झाल्या असून, त्यात जर्मनी, अमेरिका, नेपाळ, जपान, सिंगापूर, व्हिएतनाम अविदेशी संघ सहभागी झाले होते.

पुणेकर आणि मल्लखांब...

पेशवाईतील बाळंभट्टदादा देवधरांच्या नंतरची आजची पिढीदेखील मल्लखांबला समर्पित आहे. ‘महाराष्ट्रीय मंडळ’ आणि अभिजित भोसले या आजच्या काळातील खेळाडूचे मल्लखांबप्रेम आवर्जून बघू.

‘महाराष्ट्रीय मंडळ’ आणि अभिजित भोसले

पारंपरिक क्रीडाप्रकार आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणार्या ‘महाराष्ट्रीय मंडळ, पुणे’ची स्थापना सन १९२४ मध्ये, कॅप्टन शिवरामपंत दामले यांनी केली. २०२३ हे या मंडळाचे १००वे वर्ष. दि. २४ ऑटोबर २०२४ला त्यांची शताब्दी झाली. मल्लखांबाला समर्पित असलेल्या पुण्याच्या ‘महाराष्ट्रीय मंडळ’चे अभिजित भोसले यांची थोडयात ओळख करून घेऊ, म्हणजे इतरांना त्यातून प्रोत्साहन मिळेल. ते मल्लखांबाकडे कधी व कसे वळले आणि मल्लखांबाला नोकरीत चांगले स्थान मिळते का? यांची उत्तरे आपल्याला अभिजित भोसलेंकडून मिळतील.

साधारण १९८९-९० मध्ये अभिजित भोसलेंना शाळेतील शारीरिक शिक्षणाचे शिक्षक पिसाळ सर यांनी, मल्लखांब खेळाची माहिती दिली. इयत्ता आठवीच्या मे महिन्यातील शिबिरात त्यांनी मल्लखांबला ‘महाराष्ट्रीय मंडळा’त प्रवेश घेतला. तेव्हापासून ते आजतागायत ते ‘महाराष्ट्रीय मंडळा’त आधी खेळाडू व नंतर प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. इयत्ता अकरावीत असल्यापासून ते प्रशिक्षक व खेळाडू या दोन्हीही जबाबदार्या पार पाडू लागले. त्यांना शिकवणारे शिक्षक त्यांच्या पुढील करिअरसाठी निघून गेल्यामुळे, अपघातानेच माझ्यावर ही जबाबदारी आल्याचे अभिजित भोसले सांगतात. ते म्हणतात की, ”खरं तर मी नवखा होतो आणि वयही नव्हते. परंतु, तत्कालीन ‘महाराष्ट्रीय मंडळा’चे सरकार्यवाह रमेश दामले सरांनी माझ्यावर विश्वास ठेवला, मला प्रोत्साहन दिले. दामले सरांनंतर त्यांचे चिरंजीव धनंजय दामले यांनीही जो विश्वास दाखवला, त्यामुळेच प्रशिक्षक म्हणून आतापर्यंत पाच शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू घडविता आले. तसेच अनेक राष्ट्रीय, आंतर विद्यापीठ, राज्य खेळाडू ‘महाराष्ट्रीय मंडळा’त तयार झाले आहेत. तसेच या सगळ्या प्रवासात मला माझे मलाखांबाचे गुरू रविंद्र पेठे व जितेंद्र खरे यांचे मार्गदर्शन लहानपनापासून ते आतापर्यंत लाभत आहे.”

आतापर्यंत ‘महाराष्ट्रीय मंडळा’ने मल्लखांबातील १७ शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडू घडविलेले आहेत. सध्या ‘महाराष्ट्रीय मंडळा’चा वारसा रमेश दामले यांचे नातू व धनंजय दामले यांचे सुपुत्र रोहन दामले यशस्वीरित्या पुढे नेत आहेत.

‘पॅशन’ला बनवले ‘प्रोफेशन’...

अभिजित भोसले मागील सहा-सात वर्षांपासून पूर्ण वेळ मल्लखांब प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याआधी जवळपास चार वर्षें शैक्षणिक क्षेत्रात, त्याआधीची १४ वर्षे प्रिंट मीडियामध्ये काम केले. मल्लखांब क्षेत्रात पूर्णपणे करिअर करणे हा धाडसीपणाचा निर्णय होता. पण ‘पॅशन’ला ‘प्रोफेशन’ बनवायचं, हे मनात पक्क ठरवलं होतं आणि यात माझी पत्नी गौरी भोसले हिचाही तेवढाच भक्कम पाठिंबा लाभला. पूर्ण वेळ नोकरी करताना मी फक्त ‘महाराष्ट्रीय मंडळा’तच रोज संध्याकाळी शिकवायला जायचो आणि नोकरीत रजा मिळत नसल्यामुळे राज्य, राष्ट्रीय स्पर्धांना जायला मर्यादा यायच्या. एकूणच या सगळ्याची परिणीती म्हणून, पूर्ण वेळ मल्लखांबात काम करायचा निर्णय घेतला.

द्या एक पंच...

मल्लखांबमध्ये करिअरच्या पुरेशा संधी उपलब्ध आहेत. अभिजित सध्या आंतरराष्ट्रीय पंच असून जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावर पंच म्हणूनही ते काम करतात. मागील ३५ वर्षांपासून खेळाडू, प्रशिक्षक आणि पंच अशा वेगवेगळ्या भूमिका निभावताना, मल्लखांबचा जणू ते एक ‘पोल’च झाले आहेत. नुकत्याच बिहार येथे झालेल्या ‘युथ गेम्स’ स्पर्धेत अभिजित यांनी, स्पर्धा संचालक म्हणूनही काम पाहिले. अधिकृत पंच होण्यासाठी काय करायला लागते हे विचारताच अभिजित सांगतात की, यासाठी मल्लखांबाचे तांत्रिक ज्ञान आवश्यक आहे. आवड आणि स्वतः मल्लखांबचा अनुभव महत्त्वाचा. अधिकृत ’पंच’ होण्यासाठी ‘जिल्हा पंच परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक; नंतर राज्यस्तरीय परीक्षा, राष्ट्रीय परीक्षा, आंतरराष्ट्रीय असे टप्पे आहेत. अशाप्रकारे मल्लखांब खेळाडू ते पंच असे अनेक ‘प्रोफेशनल अभिजित’ आपण घडवू शकतो.

मल्लखांब कुठे कुठे?

महाराष्ट्रात जवळपास सगळ्याच जिल्ह्यात मल्लखांब वेगाने पसरलेला आहे. तसेच सध्या मागील तीन-चार वर्षांत, महाराष्ट्राला मध्यप्रदेशही चांगलीच टक्कर देत आहे. त्यांच्या राज्यात मिळणार्या सोयी, साधने, नोकर्या यांमुळे तिथे मल्लखांब फारच वेगाने प्रगती करत आहे, एवढे नक्की. त्यासोबतच तामिळनाडू, छत्तीसगढ, पुदुच्चेरी, तेलंगण, आंध्रप्रदेश, कर्नाटक, राजस्थान, बिहार, ओडिशा, आसाम, हरियाणा, गोवा, गुजरात या सर्व राज्यांतही मल्लखांबचा प्रसार जोरात होतो आहे.

मल्लखांब संघटना

आंतरराष्ट्रीय स्तरावरही मल्लखांब संघटना असून, त्यातील ’विश्व मल्लखांब फेडरेशन’चे सचिवपद ‘पद्मश्री’ उदय देशपांडे हे समर्थपणे सांभाळत आहेत. राजीव जालनापूरकर हे ‘आशियाई मल्लखांब कॉन्फडरेशन’चे अध्यक्षपद, तर सचिवपद अभिजित भोसले सांभाळत आहेत.

‘प्रो’

कबड्डीचे, टेबल टेनिसच्या ’प्रो’ लीग चालू आहेत, तसे मल्लखांबचे ‘प्रो लीग!’ यावरही विचार चालू आहे. दोन वर्षांपूर्वी मुंबईमध्ये युवा प्रशिक्षक ऋतराज शिरोडकर याच्या संकल्पनेतून, जिल्हास्तरीय मल्लखांब लीग घेण्यात आली होती. त्यावर अधिक काम सुरू असून, त्याने तो फॉरमॅट नोंद केला आहे. हिमानी परब-मुंबई शहर आणि सागर ओव्हाळकर-मुंबई उपनगर या दोन अर्जुन पुरस्कार विजेत्या मल्लखांबपटूंना क्रीडाखात्यात लास-२ची थेट नियुक्ती मिळाली आहे. तसेच मल्लखांबासाठी पाच टक्के ’स्पोर्ट्स कोटा’ही राखीव आहे. त्याचबरोबर ठिकठिकाणी मल्लखांब शिकण्यासाठी आजची पिढी आकृष्ट होते आहे.

खरीखुरी आदरांजली...

चला तर मग मल्लखांबाला आधिकाधिक जागृतावस्थेत नेण्याची जबाबदारी आपण स्वीकारत, मल्लाच्या आधारस्तंभाचं अजून सक्षमीकरण करूया. असे आपण केले, तर भारतातील विविध क्रीडाप्रकारांत मल्लखांबाच्या साहाय्याने सौष्ठवप्राप्त क्रीडापटू दिसतील आणि आपला देश, मल्लखांबात आणि मल्लखांबाच्या साहाय्याने क्रीडाविश्वात अग्रेसर झालेला दिसेल. हीच बाळंभट्टदादा देवधरांना ती आपली खरीखुरी आदरांजली असेल.


श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
९४२२०३१७०४