इस्लामाबाद : (Lashkar-e-Taiba co-founder Amir Hamza) दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा सह-संस्थापक दहशतवादी आमिर हमजावर लाहोरमध्ये अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे. या हल्ल्यात हमजा गंभीर जखमी झाला आहे. यानंतर त्याला उपचारांसाठी पाकिस्तानच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन सिंदूर' राबवून १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. अशातच आता अज्ञातांच्या हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी आमिर हमजा जखमी झाल्याची बातमी समोर आली आहे.
आमिर हमजा मंगळवारी २० मे रोजी त्याच्या राहत्या घरीच होता. त्यानंतर अचानक आयएसआयने त्याला लाहोरमधील पाकिस्तानी लष्कराच्या रुग्णालयात दाखल केले. तीन दिवसांपूर्वी लष्कर-ए-तैयबाचा कुख्यात दहशतवादी अबू सैफुल्लाहवर पाकिस्तानमध्ये काही अज्ञातांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात तो जागीच ठार झाला. त्यानंतर आता पुन्हा लष्कर-ए-तैयबाचा सह-संस्थापक हमजावर हल्ला झाल्याने त्याला गंभीररित्या जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कोण आहे आमिर हमजा ?
आमिर हमजा हा लष्कर-ए-तैयबाचे मुखपत्र देखील चालवतो. ऑगस्ट २०१२ मध्ये अमेरिकेने हमजा याला जागतिक दहशतवादी घोषित केले होते. तो मूळचा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गुजरांवालाचा रहिवासी आहे. तो कुख्यात दहशतवादी हाफिज सईद व अब्दुल्ल रहमान मक्की यांचा निकटवर्तीय आहे. २००० च्या दशकात हमजा भारतविरोधातील दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय होता. २००५ साली बंगळुरूमधील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्सवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कटात हमजा सहभागी होता.
भारतातील तीन मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचा मुख्य सूत्रधार अबू सैफुल्लाहही ठार
दरम्यान, लष्कर-ए-तैयबाचा कमांडर अबू सैफुल्लाह याचाही तीन दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या सिंध प्रांतात काही अज्ञातांकडून खात्मा करण्यात आला आहे. सैफुल्लाह हा भारतातील तीन मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचा मुख्य सूत्रधार होता. सैफुल्लाह हा १८ मे रोजी दुपारी त्याच्या घरातून बाहेर पडला. त्यानंतर काही अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. २००१ मध्ये रामपूर येथील सीआरपीएफच्या छावणीवर झालेला दहशतवादी हल्ला, २००५ मध्ये बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्सवर झालेला हल्ला आणि २००६ मध्ये नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावरील हल्ला अशा तीन हल्ल्यांचे कट सैफुल्लाहनेच रचले होते.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\