इंद्रायणी वरील पूल कोसळला 38 जणांना वाचविले - कुंडमळा दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, बचाव कार्य सुरू, जखमींवर उपचार सुरू

    15-Jun-2025
Total Views |

पुणे, मावळ तालुक्यातील येथील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेल्या आजुबाजूच्या गावांना जोडणारा लोखंडी पूल कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत 38 जणांचा बचाव करण्यात बचाव पथकाला यश आले असून दुर्देवाने यात दोघांचा मृत्य झाला असून 18 जण जखमी झाल्याची माहिती आपत्ती निवारण विभागाने दिली आहे.

रविवारी दुपारी 3:30 च्या सुमारास हा लोखंडी पूल कोसळल्याची घटना घडली असून लोखंडी पुलाच्या ठिकाणी अंदाजे 100 पर्यटक वर्षा विहारासाठी आले होते. यादुर्घटनेनंतर लगेचच बचाव कार्य सुरू करून एकूण 38 व्यक्तींचा बचाव करण्यात आल्याची माहिती आपत्ती निवारण विभागाकडून कळविण्यात आली. तथापि ही घटना घडल्यानंतर माध्यमांवर अनेक पर्यटक बुडाल्याची भीती व्यक्त केल्याने खळबळ उडाली होती मात्र या घटनेत दोघा पर्यटकांचा मृत्यू झाला असून 18 व्यक्ती जखमी झाले असून त्यांना रुग्णवाहिकेच्या मदतीने सोमाटणे फाटा, ता. मावळ येथीलपवना रुग्णालय, मायमर हॉस्पिटल, अथर्व हॉस्पिटल इत्यादी हॉस्पिटल मध्ये उपचाराकरीता दाखल केले आहे. उपचारा दरम्यान 2 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. पूलाच्या कोसळलेल्या भागाखाली नदीपात्राच्या पाण्यात एकूण 3 व्यक्ती अडकले असल्याची प्राथमिक माहिती आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे 2 पथक, आपदा मित्र, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि अग्निशमन दल व स्थानिक मदत बचाव संस्था इत्यादी घटनास्थळी दाखल होऊन कार्यरत आहेत.दरम्यान मावळ भागात पाऊस खूप असल्याने पाण्याचा प्रवाह मोठा आहे. त्यामुळे पाण्याला वेग आहे. बचाव कार्यात अडथळे येत होते. आमदार सुनील शेळके, माजी आमदार संजय भेगडे, यांनी घटनास्थळी भेट दिली.

नेमकं काय घडलं?

रविवारी दुपारी कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून घटना घडली आहे. मावळ तालुक्यात कुंडमळा हे प्रसिद्ध ठिकाण आहे. पावसाळ्यात या ठिकाणी रोज अनेक पर्यटक भेट द्यायला येतात. कुंडमळा ओलांडण्यासाठी येथील इंद्रायणी नदीवर एक पूल बांधलेला आहे. हाच पूल कोसळला आहे.
रविवार असल्याने या भागात पर्यटकांनी गर्दी केली होती. नदी ओलांडताना अनेक पर्यटक जीर्ण झालेल्या या पुलावर वाहने घेऊन चढले होते. त्यामुळे पुलावरील वजन वाढले आणि हा पूल कोसळला.

दुर्घटनेच्या कारणांची चौकशी

मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेली दुर्घटना दुर्दैवी, वेदनादायी असल्याचे सांगत या दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

दुर्घटनेत काही नागरिक व पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, स्थानिक प्रशासनाने तात्काळ दुर्घटनास्थळी पोहचून बचाव आणि मदतकार्य सुरू केले. जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दलही (छऊठऋ) दुर्घटनेनंतर अल्पावधीतच घटनास्थळी पोचले असून त्यांनीही बचाव व मदतकार्यास सुरुवात केली आहे.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, कुंडमळा येथे स्थानिक प्रशासनाने तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे. जखमी नागरिकांना आवश्यक सर्व वैद्यकीय उपचार उपलब्ध करण्याचे निर्देशित देण्यात आले आहेत. या पुलाची अवस्था जीर्ण असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले असून, देखभालीबाबत कोणतेही दुर्लक्ष झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

राज्य शासन या संकटाच्या काळात बाधित नागरिकांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, जखमींना आवश्यक ती वैद्यकीय मदत शासनामार्फत तातडीने दिली जाईल. अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत यंत्रणांकडून मिळणार्‍या माहितीवरच विश्वास ठेवावा. आपण सर्वांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.



'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय)ची सेवा जगभरातील काही देशांनी स्वीकारली आहे. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल म्हणावे लागेल. मोदी सरकारला नुकतीच ११ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सरकारच्या अनेक उपलब्धींपैकी एक असलेल्या डिजिटल व्यवहार प्रणालीचेही विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पण, अशापद्धतीने व्यवहार करताना बँक ग्राहकांनी ‘यूपीआय’ आणि ‘डिजिटल वॉलेट’ पेमेंट सिस्टममधील फरक समजून घेण्याबरोबरच खबरदारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121