इराणी रेशीम मार्ग-तेहरान ते बैरुत

    दिनांक  13-Sep-2019 20:03:33   इराणी सरकारच्या डोळ्यांसमोर एक भव्य व्यापारी स्वप्न उभं राहिलं. तेहरान ते बगदाद ते दमास्कस ते बैरुत असा चारही देशांच्या राजधान्या जोडणारा तब्बल १७०० किमींचा महामार्ग!

 


गेल्या महिन्यात म्हणजे २४ ते २६ ऑगस्ट
, २०१९ या कालखंडात ‘जी-७’ राष्ट्रांची परिषद पार पडली. ‘जी-७’ याचा अर्थ ‘ग्रुप ऑफ सेव्हन.’ आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थेने जगातल्या ज्या राष्ट्रांना ‘आर्थिकदृष्ट्या पुढारलेली राष्ट्रे’ अशा वर्गात टाकले आहे, त्यापैकी सात राष्ट्रांची ही परिषद होती. कॅनडा, फ्रान्स, इटली, जर्मनी, जपान, ब्रिटन आणि अमेरिका ही ती सात राष्ट्रं. फ्रान्सच्या नैऋत्येला अटलांटिक समुद्राच्या किनार्‍यावर ब्यारिट्झ नावाच्या निसर्गसुंदर शहरात ही परिषद पार पडली. यजमान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी ‘जी-७’चे सदस्य नसलेल्या काही राष्ट्रांच्या प्रमुखांना मुद्दाम विशेष निमंत्रित म्हणून बोलावलं होतं. त्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होते.


अचानक मॅक्रोन यांनी इराणचे परराष्ट्रमंत्री मुहम्मद जावद जरीफ यांना आमंत्रण देऊन बोलावून घेतलं. जरीफदेखील इतर कामं बाजूला ठेवून आले. मॅक्रोन यांच्या या अचानक चालीचा अर्थ होता इराणचा अण्वस्त्र विकास कार्यक्रम, त्यातून अमेरिकेने त्याच्यावर घातलेली व्यापार बंदी आणि त्यातून सन २०१९च्या प्रारंभापासून इराणी आखातात अमेरिका व इराण यांच्यात युद्ध जुंपण्याची निर्माण झालेली शक्यता याबाबत काहीतरी तोडगा काढणं. इराणी परराष्ट्रमंत्री आणि अमेरिकन उच्चाधिकारी यांच्या वाटाघाटीमधून आशेचा किरण दिसू लागला. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी राष्ट्राध्यक्ष हासन रूहानी यांची प्रत्यक्ष भेट घेण्याची तयारी दाखवली. मग रूहानी यांनीही ट्रम्प यांच्याशी चर्चा करण्याची तयारी दाखवणारं वक्तव्य केलं. पण, इराणमधल्या कट्टर अमेरिका विरोधकांमुळे हा सगळाच बनाव बारगळला. इराणवरील अमेरिका व्यापारबंदी सुरूच राहिली आहे.


या घटनाक्रमामुळे इस्रायलने सुटकेचा श्वास टाकला
. आंतरराष्ट्रीय राजकारणात कुणाचे हितसंबंध कुठे नि कसे गुंतलेले असतात पाहा. भौगोलिकदृष्ट्या इराण हा पश्चिम आशिया खंडातला एक अवाढव्य आकाराचा खनिज तेलसंपन्न देश आहे, तर इस्रायल हा त्याच पश्चिम आशियामधील एक चिमुकला नि नैसर्गिक साधनसंपत्तीची चणचण असलेला देश आहे. पण, तरीही इराण इस्रायलला कट्टर वैरी मानतो. इस्रायल नष्ट करणं हे आपलं दैवदत्त कार्य आहे, असं इराण समजतो. त्यामुळेच इराणवरचा अमेरिकेचा व्यापारबंदीचा दबाव तसाच टिकून राहाणं, हेच इस्रायलला हवं होतं. तशीच परिस्थिती कायम राहिली आहेअलीकडेच इराकमध्ये घातपाती बॉम्बहल्ल्यांची एक मालिका झाली. इराकी अधिकार्‍यांनी त्याबद्दल इस्रायलला जबाबदार ठरवलं. इस्रायलने बॉम्बस्फोटांची जबाबदारी थेट न स्वीकारता असं म्हटलं की, इराकमधल्या ज्या ठिकाणांवर घातपाती हल्ले झाले, त्या ठिकाणी इराणने पुरवलेली ड्रोन विमानं आणि क्षेपणास्त्र साठवून ठेवलेली होती. इतकंच नव्हे, तर ती शस्त्रं कशी वापरावी याचं प्रशिक्षण इराणी अधिकारी इराकी अतिरेक्यांना देत होते.

 

पण, हे तर काहीच नाही. ‘जी ७’ परिषद सुरू असताना इस्रायली हवाई दलाने सीरियन राजधानी दमास्कसच्या परिसराच्या एका ठिकाणावर सरळ हल्ला केला. त्याच दिवशी म्हणजे दि. २५ ऑगस्ट, २०१९ ला इस्रायल हल्ल्यांनतर काही तासांतच इस्रायली ड्रोन्सनी लेबेनॉनची राजधानी बैरूतमधल्या एका ठिकाणावर हल्ला केला. पाठोपाठ २६ ऑगस्टला लेबेनॉन, सीरिया यांच्या सीमेवरील एका ठिकाणावरही इस्रायली विमानांनी आग ओकली. इस्रायली अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, या सर्व ठिकाणी इराणी अधिकारी स्वत: किंवा हेझबोल्लासारख्या अतिरेकी गटांना सोबत घेऊन क्षेपशास्त्र, ड्रोन्स किंवा तत्सम शस्त्रास्त्रांचा साठा करीत होते, जो आगामी काळात नक्कीच इस्रायलविरुद्ध वापरला जाणार आहे. तेव्हा मुळातच त्याचा निकाल लावलेला बरा! न रहेगा बाँस, न बजेगी बाँसुरी!

 

हे सगळं प्रकरण नीट समजून घेण्यासाठी आपल्याला आशिया खंडाचा नकाशा नीट पाहावा लागेल
. ते पाहा भारताच्या पश्चिमेला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. त्यांच्या पश्चिमेला तो पाहा अवाढ्य इराण. त्याचं डोकं कॅस्पियन समुद्राच्या काठाने युरोप खंडाला भिडलंय. त्याचा एक पाय अरबी समुद्रात आहे, तर दुसरा पाय त्याच्याच नावाने ओळखल्या जाणार्‍या आखातात आहे - पर्शियन गल्फ उर्फ इराणचं आखात. इराणच्या पश्चिमेला आहे मेसोपोटेमिया म्हणजेच इराक. तैग्रिस आणि युफे्रटिस नद्यांच्या समृद्ध दुआबात वसलेली इराकची प्राचीन राजधानी शहर बगदाद. इराकच्याही पश्चिमेला सीरिया देशाचं अफाट वाळवंट. त्या वाळवंटाच्या पश्चिम काठावर वसलेली बगदादइतकीच प्राचीन राजधानी दमिश्क म्हणजेच आधुनिक दमास्कस आणि त्याच्याही पश्चिमेला लेबेनॉन देशाची राजधानी बैरुत. भूमध्य समुद्राच्याकाठावर वसलेलं एक प्रख्यात बंदर. त्या लेबेनॉनच्या दक्षिणेला तो पाहा इस्रायल देश. इराण, सीरिया, खालचा सौदी अरेबिया, वरचा तुर्कस्तान यांच्या तुलनेत उंदराच्या शेपटीसारखा बारीकसा दिसणारा इस्रायल देश!


ज्यू लोकांच्या पुराणकथांमध्ये डेव्हिड आणि गोलायथ यांची प्रसिद्ध कथा आहे
. गोलायथ हा प्रचंड देहाचा राक्षस आणि त्याच्या हातातली तशीच भलीमोठी गदा, तर डेव्हिड हा एक किरकोळ पोरगा. त्याच्या हातात असते फक्त एक गलोल किंवा गोफण. डेव्हिड गोलायथच्या गदेच्या पठ्ठ्याबाहेर राहतो आणि गोफणीतून गोलायथला वर्मी धोंडे मारून अखेर ठार करतो. इस्रायलने ही पौराणिक कथा वर्तमानात प्रत्यक्षात उतरवली. चौफेर वेढा घालून उभ्या ठाकलेल्या सर्व अरब इस्लामी राष्ट्रांना इस्रायलने साफ जेरीस आणले. हे सगळे अरब सुन्नी मुसलमान होते. अरब देशांच्या पलीकडचा इराण हा शिया मुसलमान आहे. अरब देश इस्रायलला भूमध्य समुद्रात बुडवण्याच्या भीमगर्जना करीत असताना इराणने म्हणजेच इराणच्या शहा रेझा पहलवी यांच्या सरकारने इस्रायल राष्ट्राला अधिकृत मान्यता देऊन टाकली. इस्रायल आणि इराण यांचे व्यापारी संबंधही बर्‍यापैकी होते. पण १९७९ साली सगळ बदललं. अयातुल्ला खोमेनी या धर्मगुरूने इराणमध्ये राज्यक्रांती केली. शहा रेझा पळून गेले. इराणमध्ये लोकशाही सरकार येणार असं जगाला वाटलं, पण लवकरच जगाचा भ्रमनिरास झाला. खोमेनी राजवट ही मध्ययुगीन इस्लामी सुलतानशाहीची नवी आवृत्ती ठरली. लोकनियुक्त प्रतिनिधींनी राज्यघटना बनवण्याऐवजी खोमेनीने काढलेल्या फतव्यांच्या आधारे राज्यकारभार सुरू झाला.


अशाच एक फतव्याद्वारे इस्रायलला
‘राष्ट्र’ म्हणून दिलेली मान्यता काढून घेण्यात आली. इस्रायल हे सार्वभौम राष्ट्र नसून ती फक्त एक पाखंडी यहुद्यांची राजवट आहे. ती समूळ नष्ट करणं हे आपलं परमकर्तव्य आहे, असं इराणने घोषित केलं. मध्ययुगात प्रत्येक मुसलमान सुलतानाने यहुद्यांना ठार मारलं, हे धर्मकार्य मानलं होतं. अयातुल्ला खोमेनीने त्याच वारशाचं पुनरुज्जीवन केलं. तेव्हापासून इस्रायल आणि इराणचे संबंध बिघडले आणि अजूनही ते तसेच आहेतसप्टेंबर १९८० मध्ये इराकने इराणवर हल्ला चढवला. इराक-इराण युद्ध सुरू झालं. याची कारण अर्थिकही होती नि धार्मिकही होती. इराकला इराणच्या दक्षिणेकडंच आबादान हे अत्यंत समृद्ध तेलक्षेत्र कायमचं हडप करायचं होतं, हे एक कारण. दुसरं म्हणजे खोमेनी कडवा मुसलमान असला तरी शिया होता, तर इराकचा सद्दाम हुसैन स्वत:ला डाव्या विचारांचा म्हणवत असला तरी सुन्नी होता. इराक-इराणचं हे युद्ध आजही संपलेलं नाही. कारण, कोणत्याही बाजूकडून अधिकृतपणे युद्धबंदीची घोषणा आजतागायत झालेली नाही. दहा वर्षं बेगुमान राजवट गाजवून अयातुल्ला खोमेनी १९८९ साली अखेर आटपले. तत्पूर्वी म्हणजे १९८५ त्यांच्या आशीर्वादाने मध्य-पूर्वेत एक नवी इस्लामी अतिरेकी संघटना निर्माण झाली. तिचं नाव ‘हेजबोल्ला’ म्हणजे देवाचा पक्ष. मध्य-पूर्वेत अतिरेकी संघटना कमी नव्हत्या. पण, हेजबोल्लाचं वैशिष्ट्य म्हणजे ती शिया अरब मुसलमान संघटना होती.खोमेनींच्या नंतरच्या इराणी राज्यकर्त्यांना इराणला अण्वस्त्रसज्ज करण्याची स्वप्न पडू लागली
. २००५ साली राष्ट्राध्यक्ष बनलेल्या मुहम्मद अहमदीनबाद यांनी तर त्या दिशेने जोरदार मुसंडी मारली. मधल्या काळात झालेला एक मोठा बदल म्हणजे अमेरिकेने इराकमध्ये उतरून सद्दाम हुसैनची राजवट उलथून टाकली. अमेरिकेच्या पाठिंब्यावर उभी असलेली वर्तमान इराकी सत्ता कितपत स्थिर आहे, हा भाग वेगळा. पण ती अल्पसंख्य सुन्नींची सत्ता नसून, बहुसंख्याक शियांची सत्ता आहे. त्यामुळे इराण-इराक-सीरिया-लेबेनॉन असा शिया सत्ताधार्‍यांचा एक सलग भूप्रदेश इतिहासात प्रथमच निर्माण झाला. त्यामुळे आता इराणी सरकारच्या डोळ्यांसमोर एक भव्य व्यापारी स्वप्न उभं राहिलं. तेहरान ते बगदाद ते दमास्कस ते बैरुत असा चारही देशांच्या राजधान्या जोडणारा तब्बल १७०० किमींचा महामार्ग! होय! चीन जर हिमालयाच्या दुर्गम पहाडातून काइगर ते ग्वादार असा २८०० किमीचा महामार्ग बांधून हिंदी महासागरात पोहोचतो, तर आम्ही अलबुर्झ पर्वतातून, तैग्रिस-युफे्रटिसच्या खोर्‍यातून, सीरियाच्या वाळवंटातून भूमध्य समुद्रात पोहोचायला काय हरकत आहे? आता प्रश्न फक्त एवढाच आहे की, ज्या मार्गावरून व्यापारी वाहतूक होणार त्या मार्गावरून लष्करी वाहतूक होणार नाही, अशी काही इराणने शपथ घेतलेली नाही. नेमका हाच इस्रायलच्या चिंतेचा विषय आहे. त्यामुळे अण्वस्त्रसज्ज इराणने भूमध्य सागरापर्यंत पोहोचू नये, यासाठी इस्रायल शक्य ते सर्व प्रयत्न करणारच. आपल्याला नष्ट करण्याची जाहीर प्रतिज्ञा केलेल्या इराणला झोंबायला इस्रायल म्हणजे काँग्रेस सरकार नव्हे!