सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रगतीची 'उमंग'

    19-Mar-2024   
Total Views |
Umang The Youth Forum

आपल्या शिक्षणाचा, बुद्धीचा आणि युवाशक्तीचा समाजासाठी विधायक उपयोग व्हावा, या हेतूने स्थापन झालेल्या ‘उमंग द युथ फोरम’ या संस्थेच्या प्रवासावर टाकलेला हा प्रकाश.


'उमंग’ संस्थेची कहाणी जशी रंजक, तसाच ‘उमंग’चा आजवरच प्रवासदेखील समाजसेवेची मनापासून आवड असलेल्या मित्रमंडळी आणि तितक्याच खंबीरपणे पाठीशी उभ्या असलेल्या पाठराख्यांमुळे अधिक सुखकर झाल्याचे सदस्य आवर्जून नमूद करतात. मुंबईतील भांडुपस्थित शाळकरी मित्रांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांची अनौपचारिक भेट झाली. त्यावेळी शालेय आठवणींपासून सुरु झालेल्या गप्पा सामाजिक विषयांवर कधी येऊन थांबल्या, हे त्यांनाही समजले नाही. पण, केवळ सामाजिक प्रश्नांवर चर्चा करण्यापेक्षा आपण ज्या समाजात वाढलोय, शिकलोय, त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, अशी भावना या मित्रांमध्ये निर्माण झाली आणि त्यातूनच ‘उमंग’चा जन्म झाला. आपल्या शिक्षणाचा, बुद्धीचा आणि युवाशक्तीचा समाजासाठी काहीतरी विधायक उपयोग व्हावा, या हेतूने दि. १ मे, २०११ रोजी ‘उमंग’ या संस्थेचा जन्म झाला. सुरुवातीला भांडुप विभागात रक्तदान शिबीर, परिसरातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी सामाजिक प्रश्नांवर आधारित वेगवेगळ्या स्पर्धा, वृद्धाश्रमात जाऊन ज्येष्ठांची सेवा असे अनेक उपक्रम राबविले गेले. कोणत्याही आर्थिक पाठबळाशिवाय केवळ स्वत:च्या पदरचे पैसे खर्च करून निधी उभारला जात होता आणि त्यातून संस्थेची आजवरची वाटचाल सुरू होती.


सामाजिक क्षेत्रात काम करताना शैक्षणिक क्षेत्रातील विविध समस्याही ‘उमंग’च्या निदर्शनास आल्या आणि ‘उमंग’ने ‘शिक्षण’ या विषयावर पूर्णवेळ काम करायचे ठरविले. सोईसुविधा आणि शासकीय अनास्थेपायी झालेली जिल्हा परिषद शाळांची दुरवस्था लक्षात आल्यावर, ‘उमंग’ने आदिवासी विद्यार्थ्यांना सुलभतेने शिक्षण घेता यावे, म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरीपाडा, (विळशेत) तालुका, विक्रमगड, जिल्हा पालघर ही शाळा साधारणपणे दोन वर्षांपूर्वी दत्तक घेतली. सोईसुविधांच्या अभावामुळे मुख्य शैक्षणिक प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी पाड्यातील युवा पिढीला शिक्षणाच्या साहाय्याने आत्मविश्वास देऊन साक्षर आणि सुशिक्षित बनवणे, यासाठी ‘उमंग’ प्रयत्नशील आहे. या उद्देशानेचभिवंडी तालुक्यातील पिंपळनेर जिल्हा परिषद शाळादेखील‘उमंग’ने दत्तक घेतली आणि आपले कार्य जोमाने सुरू ठेवले. ‘उमंग’ तीन वर्ष नियमितपणे येथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहे. या कामात तेथील शिक्षक आणि इतर गावकर्‍यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल दिसून येत आहे.

‘उमंग’ने ‘शिक्षण’ या मूलभूत विषयांवर काम करतानाच, सामाजिक आरोग्य आणि जीवनातील निखळ आनंद सर्वांना मिळावा म्हणून ‘प्रोजेक्ट हेल्थ’ आणि ‘प्रोजेक्ट स्माईल’ अंतर्गत वृद्धाश्रम, अनाथाश्रम येथे केली जाणारी मदत, तसेच नैसर्गिक अथवा इतर संकटकाळात सर्वांच्या मदतीला धावून जाणारी संस्था, असा नावलैकिक अल्पावधीतच मिळविला. नि:स्वार्थी कार्य आणि संवेदनशील कार्यकर्ते यामुळे ‘उमंग’च्या पाठीराख्यांच्या ‘उमंग’ संस्थेकडून असलेल्या अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत.त्या पूर्ण करण्यासाठी ‘उमंग’ कटिबद्ध असल्याचे सदस्य सांगतात. त्यादृष्टीने ‘उमंग’ची वाटचाल ही जोमाने सुरू आहे. आपली कार्यकक्षा रुंदावण्यासाठी आणि आणखी प्रभावीपणे कार्य करण्यासाठी ‘उमंग’ प्रयत्नशील आहे.


‘उमंग’चा प्रवास

‘प्रोजेक्ट शिक्षा २०१७’ अंतर्गत १४० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
डोंगरीपाडा आणि पिंपळनेर या जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्यात आल्या.
शाळांमध्ये जलशुद्धीकरण यंत्रे लावण्यात आली आहेत.
परिसरातील इतर गरजू विद्यार्थ्यांना वेळोवेळी शैक्षणिक साहित्य गेली तीन वर्षांपासून उपलब्ध करून देण्यात आले आहे.
प्रागतिक विद्यालय, भांडुप येथील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी विविध स्पर्धा आणि उपक्रमांचे नियोजन
‘दिवाळी पहाट’ उपक्रमांतर्गत आदिवासी पाड्यात फराळ, रोषणाई सोबतच आनंद पोहोचवण्याचे कार्य
दत्तक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन
ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांच्या आश्रमासाठी धान्य आणि इतर वस्तूंची मदत
मालाड येथील आग दुर्घनेतील २०० कुटुंबांना मदतीचा हात
दिवाळी २०१७ मध्ये डोंगरीपाडा येथील ग्रामस्थांना धान्य, कपडे आणि इतर उपयोगी वस्तूंची मदत लोक सहभागातून उपलब्ध केली.
‘प्रोजेक्ट हेल्थ’अंतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन
वृद्धाश्रम आणि अनाथश्रमांना भेट देऊन सेवा आणि मदत करणे

‘उमंग’चे भविष्यातील उपक्रम

‘प्रोजेक्ट शिक्षा २०१८’ अंतर्गत किमान ५०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करण्याचे लक्ष्य
दत्तक जिल्हा परिषदेच्या शाळांची डागडुजी
जिल्हा परिषद शाळेत स्वच्छतागृहांची उभारणी
दुर्गम भागातील शाळांमध्ये विजेची समस्या सोडविण्यासाठी सौरऊर्जेद्वारे शाळांना स्वावलंबी बनवणे
जिल्हा परिषद शाळांमध्ये वाचनालयाची उभारणी
‘प्रोजेक्ट हेल्थ’ अंतर्गत दुर्गम आदिवासी पाड्यात प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे
मुंबईतील गरीब विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना
आदिवासी पाड्यातील पालकांना शिक्षणाचे महत्त्व आणि त्याची गरज समजवून सांगण्यासाठी पथनाट्ये आणि शिक्षणाची टक्केवारी वाढवणे.
ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत
दत्तक शाळांमधील विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन आणि व्यवासायिक प्रशिक्षण देणे.
दुर्गम आदिवासी शाळातील विद्यार्थ्यांसाठी प्रगत शेतीप्रधान रोजगारनिर्मिती
दुर्गम ग्रामीण भागात वैद्यकीय शिबिरे
भावी पिढीला सुशिक्षित तसेच सुसंस्कृत बनवण्यासाठी विविध मार्गदर्शन शिबिरे आणि उपक्रम राबविणे.


जान्हवी मोर्ये
अधिक माहितीसाठी संपर्क-
९८३३८४१३०९/७०४५२०४५४५