आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 व आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने ‘महिलांचा सहकार क्षेत्रातील सहभाग व उपलब्ध संधी’ या कार्यक्रमाचे औचित्य साधून ‘ईशान्य मुंबई सहकार भारती’ व ‘म्हाडा कॉलनी नवरात्र उत्सव मंडळा’तर्फे दि. 17 मे रोजी मुंबईतील मुलुंंड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा सारांश या लेखात मांडला आहे.
विना संस्कार नाही सहकार, विना सहकार नाही संस्कार’ हे अगदी खरं आहे. सहकाराच्या माध्यमातून ‘सहकार भारती’ समाजाच्या विविध आयामांमध्ये सक्षमपणे कार्य करत आहे. हे कार्य गृहनिर्माण सोसायटीसंदर्भात असू दे की पतसंस्थेसंदर्भात की बचतगट आणि तत्सम समान क्षेत्रांमध्ये ‘सहकार भारती’चे काम वटवृक्षासारखे लक्षणीय आहे. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आणि अंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने ‘सहकार भारती’ने महिलांचा सहकार क्षेत्रातील सहभाग व उपलब्ध संधी या विषयावर कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवले. त्यानुसार ईशान्य मुंबईमध्ये ‘सहकार भारती’च्या सर्व पदाधिकार्यांनी तन, मन, धन अर्पून तो कार्यक्रम घडवून आणलाच.
सहकार क्षेत्रातील विविध आयामांत काम करणार्या मातृशक्तींना या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले होते. ‘सहकार भारती’ ईशान्य मुंबई समाजातील विविध स्तरांतून परंतु सहकाराशी निगडित अशा महिलांनी सहभाग घेतला. तसेच सामाजिक प्रश्नांवर समाजाच्या सहकार्याने काम करणार्या महिलाशक्तीलाही आमंत्रित केले होते. त्यानुसार दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या सामाजिक न्याय विभागाच्या प्रमुख योगिता साळवी, उद्योजिका मनिषा मराठे, ‘सहकार भारती’ महाराष्ट्र प्रदेश हाऊसिंग प्रकोष्ठ प्रमुख अश्विनी बुलाख, ‘सहकार भारती’ महाराष्ट्र प्रदेश बचतगटप्रमुख जया आलमचंदानी, जनकल्याण बँकेच्या डायरेक्टर माधुरी शेंबेकर, ‘जिजाऊ वुमन लीगल फोरम’ व दक्षिण मुंबई महिला प्रमुख अॅड. शुभांगी सारंग, ‘घे भरारी’ बचतगटाच्या स्नेहा भालेराव, ईशान्य मुंबई ‘सहकार भारती’च्या सर्व महिला पदाधिकारी, खजिनदार सीए दिशा कोयंडे, ऑडिट प्रकोष्ठ प्रमुख माधुरी मिठबावकर, महिला प्रमुख अॅड. शिल्पा खातू, सहमहिला प्रमुख भादुरी दळवी, कार्यकर्त्या प्राप्ती चव्हाण, प्रिया शेलार, मनीषा मोलावडे, नीलम चव्हाण, श्रद्धा आचरेकर, प्रिया महाडिक, कोमल दळवी, अपर्णा, भावना गिरी, अंकिता आणि इतर अनेक मान्यवर महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात ‘सहकार गीता’ने झाली. कार्यक्रमांमध्ये ‘महिलांची सहकार क्षेत्रातील स्थान व संधी’ या विषयावर अश्विनी बुलाख त्यांनी अतिशय सुंदर माहिती दिली. स्नेहा भालेराव यांनी व जया आलमचंदानी यांनी महिला बचतगटाबद्दल अत्यंत उपयुक्त निवेदन केले. जनकल्याण बँकेच्या डायरेक्टर माधुरी शेंबेकर यांनी तसेच महिला व्यवस्थापक आदिती बराईच यांनी सहकारी बँकिंग क्षेत्राबद्दल माहिती दिली. अॅड. व ‘जिजाऊ वुमन लीगल फोरम’ अध्यक्ष शुभांगी सारंग यांनी कायदेविषयक क्षेत्रांमधील स्त्रियांना लागणार्या सहकार्याकरिता कशा प्रकारे त्या ‘दर्द से हम दर्द’ या माध्यमातून ‘वकील तुमच्या दारी’ या संकल्पनेतून समाजातील स्त्रियांना कशी मदत करता येईल, त्याची कल्पना दिली. महिला उद्योजिका मनीषा मराठे यांनी महिलांना उद्योगांमध्ये येणार्या अडचणी व त्यावर कशा प्रकारे मात करावी, यावर भाष्य केले. उर्वी बंड, कल्पना बाचीम व आरती चौहान यांनी ‘सहकार क्षेत्रातील विविध संधी’ याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये योगिता साळवी यांनी ‘सहकार आणि महिला सुरक्षा’ यावर मनोगत व्यक्त केले. ‘महिलांना भेडसावणार्या विविध समस्या आणि त्यावर सहकाराने केलेली मात’ यावर भाष्य करताना त्यांनी सद्य परिस्थितीतील अनेक उदाहरणे दिली. “एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या सूत्रानेच समाजाला ‘लव्ह जिहाद’ आणि ‘ड्रग्ज जिहाद’ला संपवता येईल,” असे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले. ‘सहकार भारती’ मुंबई संघटन प्रमुख संतोष सुर्वे यांनी उपस्थितांना ‘सहकार भारती’बद्दल इत्थंभूत माहिती दिली. तसेच ‘सहकार भारती’ कशा प्रकारे सहकार क्षेत्रात आपल्याला मदत करू शकते, याबद्दल महत्त्वाची माहिती पुरविली.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश ‘सहकार भारती’ अध्यक्ष दत्ताराम चाळके हे उपस्थित होते. सहकार क्षेत्रातील त्यांचे काम सर्वमान्य आणि आदर्श आहे. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला आणखीन महत्त्व प्राप्त झाले. महामंत्री हरीश हिंगे, हाऊसिंग प्रकोष्ठ प्रमुख सत्यनारायण गौर, लीगल हेड प्रकोष्ठ प्रमुख अॅड. निलेश तिरोडकर, संघटन प्रमुख सुनील देसाई, सहसंघटन प्रमुख अनिल देशमुख, कंज्यूमर प्रकोष्ठ प्रमुख सुजय पाटील व दर्शन जोशी तसेच आजच्या कार्यक्रमास सन्मानित इतर महिला ऑडिटर उर्वी बंड, अकाऊंटंट व ऑडिटर कल्पना संतोष टक्के, मॅनेजर, इलेक्शन व प्रशासकीय क्षेत्रातील महिला, ‘हाऊसिंग सोसायटी टेरेस फार्मिंग अॅवॉर्ड’विजेती महिला आरती चौहान व विभागातील बर्याच महिला आवर्जून उपस्थित होत्या.कार्यक्रमाची फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी प्रतीक मोरे व साईष साळुंखे यांनी केले.
‘सुमन फूड्स भांडुप’ यांच्या माध्यमातून रेखा पुजारे यांनी कार्यक्रमस्थळी स्नॅक्स बॉक्स पुरविले. कार्यक्रमाचे प्रायोजक राहुल पाटील मुंबई ‘सहकार भारती’ अध्यक्ष, भाऊ सकपाळ शिक्षण क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व, निलेश तिरोडकर, जनकल्याण सहकारी बँक तसेच कार्यक्रमाकरिता ‘म्हाडा कॉलनी नवरात्र उत्सव मंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने वरील कार्यक्रम संपन्न करण्याकरिता रवी नाईक पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांचे आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमांमध्ये सुरक्षेकरिता पोलीस बंदोबस्त दिल्याबद्दल नगर पोलीस ठाणे यांचेही आभार मानले. कार्यक्रमास प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष उपस्थिती लावून ज्यांनी ज्यांनी योगदान दिले, त्या सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता समापन मंत्राने झाली. ईशान्य मुंबई ‘सहकार भारती’ अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमाची कमान सांभाळताना अनेक अनुभव आले. ‘विना संस्कार नाही सहकार आणि विना सहकार नाही उद्धार’ हा मूलमंत्र या कार्यक्रमाचा आत्मा होता. समाजात सर्वतोपरि ‘सहकार’ रूजला आहे हे या कार्यक्रमातून जाणवले.
- दिवाकर कोयंडे