अंधेरी तहसील कार्यालय : ‘लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु।’

    28-May-2025   
Total Views | 20
 
experienced the administrative framework of Andheri Tehsil
 
लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे हे जन्म त्रिशताब्दी वर्ष, तर संविधानाचे हे अमृत महोत्सवी वर्ष. या विशेष काळात मुंंबईतील अंधेरी तहसीलच्या कार्यालयाला भेट देण्याचा योग आला. प्रशासकीय कार्य गतिशील, पारदर्शक, सुकर आणि लोकाभिमुख व्हावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी 100 दिवसांच्या कृती आराखड्याचे निर्देश दिले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर अंधेरी तहसीलचे प्रशासकीय चौकटीतले, पण लोकाभिमुख, संवेदनशील, कार्यक्षम स्वरूप अनुभवले. त्या प्रेरणादायी अनुभवाची मांडणी करणारा हा लेख...
 
एक आजोबा कार्यालयातील कारकुनाला काहीतरी अतिचिंतेने विचारत होते, “मला माझ्या नातीचे आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचे प्रमाणपत्र हवे आहे, नाहीतर, मी माझ्या नातीला महाविद्यालयामध्ये प्रवेश करू शकणार नाही. मग मी काय तोंड दाखवू तिला? दे बाबा, मला आताच्या आता ते प्रमाणपत्र दे.” यावर संबंधित कारकून विनम्रतेने सांगत होता की, “पण, तुम्ही आताच अर्ज केला. मग लगेच कसे मिळेल प्रमाणपत्र?” पण, ते आजोबा ऐकायला तयार नव्हते. ते म्हणाले, “आम्हाला माहीत आहे, सरकारी काम, सहा महिने थांब! मला तुमच्या साहेबांना भेटू दे. त्यांचेही उत्तर ऐकू दे एकदा.” कारकून म्हणाला, “हो, तुम्ही भेटू शकता.” पण, आजोबांचा गलका ऐकून एक महिला तिथे म्हणाली, “तुम्ही काळजी करू नका. प्रवेश घेण्याची शेवटची तारीख काय आहे? त्याआधीच तुम्हाला प्रमाणपत्र मिळवून देऊ. काही काळजी करू नका.” मात्र, तरीही ते आजोबा म्हणाले, “मॅडम, तुम्ही कोण? मला तहसीलदार साहेबांना भेटून त्यांना सांगायचे आहे.” यावर कारकून म्हणाला, “अहो सर, याच तहसीलदार मॅडम आहेत.” हे ऐकून ते आजोबा थक्क होत म्हणाले, “बेटा, तूच तहसीलदार आहेस का या आफिसातली? माफ करा; तुम्ही इतक्या आपुलकीने बोलत आहात, आता मला धीर आला की माझ्या नातीसाठी मी नक्की प्रवेश घेऊ शकेन.” मी ही घटना पाहात होते आणि समोरच्या भिंतीवर लिहिलेल्या सुविचाराकडे लक्ष गेले, ‘मनसा सततं स्मरणीयं, लोकहितं मम करणीयम्।’ अर्थात, माझ्या मनात कायम स्मरणात आहे की, मला लोकहितच करायचे आहे.
 
हे कार्यालय होते अंधेरीचे तहसील कार्यालय. पूर्वी कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी धुळीने माखलेल्या वाहनांना पार करावे लागत असे. पण, आता प्रवेशद्वारासमोर स्वच्छता होती. ती धूळखात पडलेली वाहने तिथे नव्हती. परिसर प्रसन्न, वृक्षराजी, फुले-पानांनी बहरून गेला होता. क्षणभर वाटले, कदाचित तहसील कार्यालय दुसरीकडे हलवण्यात आले असेल. पण, देखणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारे सुसज्ज आणि तितकेच कार्यक्षम स्वरुपात उभे ठाकलेले ते अंधेरीचे तहसील कार्यालयच होते. सामाजिक कार्यकर्ता अधिक पत्रकार यादृष्टीने कार्यालयाचा मागोवा घेऊ लागले. कार्यालयातील प्रत्येक विभागातील संबंधित कार्याच्या अधिकार्‍याच्या टेबलावर त्याच्याशी संबंधित कामांची यादी लावलेली होती. तसेच, त्या अधिकार्‍याचे पूर्ण नाव, अगदी नवीन शासकीय निर्णयानुसार आईच्या नावासह लिहिलेले होते. थोडक्यात, कार्यालयात कामासाठी येणार्‍या व्यक्तींना कोणते कर्मचारी कोणते काम करतात, याची स्पष्ट माहिती मिळत होती. तसेच या कार्यालयाचे संकेतस्थळही अद्ययावत आहे. त्यानुसार, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर तहसील कार्यालयाची अद्ययावात माहिती उपलब्ध आहे. ‘आपले सरकार’ पोर्टलवरील दि. 1 एप्रिल अखेर 100 टक्के तक्रारींचे निराकारण करण्यात आले, तर ‘पी. जी.’ पोर्टलवरील 100 टक्के तक्रारींचे निराकरण करण्यात आलेले आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, ‘ई-सेतू’चा क्यूआर कोड तहसील कार्यालयाच्या दर्शनी भागात डिजिटल डिस्प्लेवर लावण्यात आला आहे. कार्यालयात ‘ई-ऑफिस’ वापरण्याचे प्रमाण 100 टक्के आहे. या अंधेरी कार्यालयात आता प्रतीक्षागृहही आहे बरं का! पण, या प्रतीक्षागृहाला कल्पकतेने नाव देण्यात आले आहे ‘रिफ्लेक्शन रूम!’
 
या ‘रिफ्लेक्शन रूम’मध्ये आगंतुकांसाठी आरामदायी बसण्याची व्यवस्था आहे. तिथे कथा-कादंबर्‍या आणि जवळजवळ सर्वच महापुरुषांच्या जीवनकार्याचा, विचारांचा आढावा घेणार्‍या कॉफी टेबल बुक्स ठेवलेली आहेत. कुणाही व्यक्तीला कामासाठी कार्यालयात प्रतीक्षा करावी लागली, तर कथा-कादंबर्‍या, वैचारिक आिए प्रेरणात्मक जीवनचरित्रे वाचता यावीत ही सुविधा, तसेच याच रूममध्ये मोबाईल चार्जिंग पॉईंट्सचीही सुविधा देण्यात आली आहे. या रूममध्ये स्नेहलता स्वामी यांची कविता लिहिलेले एक पोस्टरही लावण्यात आले आहे. त्या कवितेचा अर्थ आहे, ‘प्रत्येक कामाला अवधी द्यावा लागतो. आपले लक्ष्य, उद्दिष्ट योग्य असले, तर त्या अवधीतून आपल्या इच्छेचे अवकाश निर्माण होतेच होते.’ ही कविता वाचून निराश किंवा कोणत्याही विचाराने त्रस्त असलेल्या माणसाच्या मनात आशा पल्लवित होतीलच होतील. विचारांना सकारात्मक सृजनशीलतेकडे परावर्तीत करणारी ही ‘रिफ्लेक्शन रूम.’
 
कधीकधी या कार्यालयात माता आपल्या लेकरांना घेऊन येतात. त्यांच्यासाठी मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या निधीतून ‘हिरकणी’ नावाची एक सुसज्ज व्यवस्थाही या कार्यालयात आहे. ‘हिरकणी’मध्ये प्रवेश घेतानाच डोळ्यांना आणि मनाला आनंद देतात, ती तिथली सुंदर, मनमोहक आकर्षक खेळणी, विचारपूर्वक केलेली व्यवस्था. याचाच अर्थ आपल्या तहसील कार्यालयात माता-बालकांसाठी अशी व्यवस्था उभी राहावी, यासाठी अंधेरी तहसीलने लोकाभिमुख प्रयत्न केले होते. पूर्वी या कार्यालयात महिलांसाठी स्वच्छतागृह नव्हते. मात्र, आता इथे महिलांसाठी स्वच्छतागृह आहे. तसेच स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही आहे. कार्यालयातील अधिकार्‍यांशी तसेच तिथे कामासंदर्भात आलेल्या लोकांशी संवाद साधला. त्यांचे म्हणणे, “कार्यालयामध्ये वैद्यकीय उत्पन्न दाखला, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक यांना 24 तासांच्या आत तत्काळ सेवा पुरवली जाते व इतर दाखलेसुद्धा कमीत कमी कालावधीत देण्यात येतात. लोकांना या कार्यालयात अधिकार्‍यांना कामासाठी कार्यालयीन वेळेत कधीही भेटता येते. तसेच, या कार्यालयात दर महिन्याच्या तिसर्‍या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.
 
कर्मचारी अधिकारी वर्गासाठी इथे विविध विषयांवर प्रशिक्षण देण्यात येते. उदाहरणार्थ, नव्याने सेवेत प्रविष्ट कर्मचारी ग्राम महसूल अधिकारी यांना कार्यालयीन कामकाज प्रशिक्षण देण्यात येते. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचे प्रशिक्षणही देण्यात येते. तसेच ‘अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंध कायद्या’चे प्रशिक्षणही देण्यात आले. इथल्या तहसीलदारांसकट सर्वच अधिकारी इतके तणावरहित आणि हसमुख कसे बरे आहेत, त्याचेही कारण कळले की, या कार्यालयात स्नेहलता यांनी ‘योग ब्रेक्स’ची व्यवस्था केली आहे. दररोज संध्यकाळी 4 वाजता पाच मिनिटे ‘योग ब्रेक’ घेतला जातो. यात चार शारीरिक व्यायाम व दोन प्राणायाम केले जातात. तसेच, सर्व कर्मचारी अधिकार्‍यांमध्ये शिस्त व एकात्मतचे प्रतीक म्हणून झाडाच्या नव्या पालवीच्या, अर्थात फिकट पोपटी रंगाचा ड्रेसकोड दर गुरुवारी लागू केला आहे.
 
असो. स्नेहलता स्वामींच्या कक्षामध्ये गेले, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांना संविधान सुपूर्द करत असल्याची भिंतीवर लावलेल्या मोठया कलाकृतीने लक्ष वेधून घेतले ते तसेच भिंतीवर शासनाने निर्देशित केलेल्या सर्व म्हणजे एकूण 44 राष्ट्रपुरुषांची तैलचित्रे. स्नेहलता यांच्याशी संवाद साधला. तहसीलदार कार्यालयाचे बाह्य आणि अंतर्गत स्वरुपाचा कायापालट केला. याबदद्ल त्यांना विचारले तर त्या म्हणाल्या, “याचे श्रेय या कार्यालयातील प्रत्येक व्यक्तीचे आहे. ‘संगच्छध्वं संवदध्वं सं वो मनांसि जानताम्’ याचा अर्थ, आपण सर्वांनी एकत्रितपणे विचार करावा, निर्णय घ्यावा आणि समाजाच्या हितासाठी एकसंघ राहावे. हा विचार कार्यालयातील प्रत्येकजण जपतो त्यामुळे हे शक्य आहे. तसेच, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे प्रशासकीय कर्तृत्व माझा आदर्श आहे.” अंधेरी तहसील आणि तहसीदार स्नेहलता यांना भेटल्यानंतर वाटते की, ‘लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु।’ या उद्दिष्टासाठी आपण या कार्यालयात आहोत, याचे भान अंधेरी तहसील कार्यालयातील तहसीलदार ते सर्वच अधिकारी, अगदी शिपायांनासुद्धा आहे. अंधेरी तहसील कार्यालय प्रशासनातल्या पारदर्शी आणि लोकाभिमुख कार्याचे प्रतिनिधित्व करते, हे नक्की!
 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
अग्रलेख
जरुर वाचा
बहुचर्चित रो रो सेवा एक सप्टेंबर पासून सुरू; दक्षिण आशियातील सर्वांत जलद रो-रो सेवा - मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची माहिती

बहुचर्चित रो रो सेवा एक सप्टेंबर पासून सुरू; दक्षिण आशियातील सर्वांत जलद रो-रो सेवा - मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची माहिती

गणेशोत्सव, होळी अशा विविध सणांनिमित्त कोकणवासीय कोकणात मुक्कामी जातात. त्यांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी राज्य शासनाने मुंबई ते (जयगड) रत्नागिरी आणि मुंबई ते (विजयदुर्ग) सिंधुदूर्ग रो-रो सेवा सुरू केली असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुंबई ते कोकण समुद्रामार्गे प्रवास करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या रो-रो सेवेची माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषदेचे मंत्रालयात आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोकणवासीयांना आणि पर्यटकांन..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121