‘स्पेशल ऑलिम्पिस भारत’तर्फे महाराष्ट्रात पहिल्यांदाच राष्ट्रीय जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सरदार वल्लभभाई पटेल जलतरण तलाव, कांदिवली (पश्चिम), मुंबई येथे दि. ३ ऑगस्ट ते दि. ६ ऑगस्ट दरम्यान या स्पर्धा संपन्न झाल्या. मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट येथील सभागृहात महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यानिमित्ताने...
स्पेशल ऑलिम्पिस भारत’ (SOB) ही जागतिक स्पेशल ऑलिम्पिक चळवळीची भारतीय शाखा आहे. ही संस्था बौद्धिक अक्षम (पूर्वी ‘मतिमंद’ म्हणत. आता या शब्दावर प्रतिबंध आहे) असलेल्या व्यक्तींना खेळांचे प्रशिक्षण व स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत आहे. १९९२ साली स्थापन झालेल्या या संस्थेने सामाजिक समावेश वाढवण्यात, खेळाडूंना सक्षम बनवण्यात आणि बौद्धिक दिव्यांग ते (intellectually disable) संदर्भातील रूढ समजुतींना आव्हान देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला संज्ञानात्मक कार्य आणि ज्यामध्ये भाषा, सामाजिक आणि स्व-काळजी कौशल्ये यांसारख्या संकल्पनात्मक, सामाजिक आणि व्यावहारिक कौशल्यांमध्ये काही मर्यादा असतात, तेव्हा ‘बौद्धिक अक्षमत्व (ID)’ हा शब्द वापरला जातो. ‘बौद्धिक दिव्यांगत्व’ किंवा सोप्या भाषेत ‘अक्षमता’ कशी ठरवतात, त्याचे पुढीलप्रमाणे काही आंतरराष्ट्रीय मापदंड आहेत.
अ) ज्या मुलांचा बुद्ध्यांक ७०च्या खाली आहे.
ब) समाजात राहण्यासाठी, काम करण्यासाठी आणि वावरण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये कमी आहेत.
क) ही स्थिती २२ वर्षांच्या वयाच्या आधी कळलेली आहे.
तसेच ‘बौद्धिक अक्षमत्व’ या चार कारणांमुळे येऊ शकते. जसे की, आरोग्यविषयक समस्या, अनुवंशिक परिस्थिती, पर्यावरणीय घटक आणि गर्भधारणेदरम्यान आणि बाळंतपणातील समस्या.
राष्ट्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालय, तसेच ‘भारतीय क्रीडा प्राधिकरण’ (SAI) यांच्या मान्यतेने ही संस्था कार्य करते. सर्व खेळ व स्पर्धा या संस्थांद्वारे ठरवलेल्या नियमानुसार घेतल्या जातात. ‘स्पेशल ऑलिम्पिस’ ही एक अशी जागतिक चळवळ आहे, जी सर्वसमावेशक समाज निर्माण करू इच्छिते, जिथे प्रत्येक व्यक्तीचे स्वागत व सन्मान केला जातो; तो दिव्यांग असो वा नसो. ज्यात एक खेळाडू, एक स्वयंसेवक, प्रत्येक कुटुंबातील एक सदस्य या प्रत्येकाच्या माध्यमातून जग अधिक चांगले, निरोगी व आनंदी बनविण्यास हातभार लावतो.
रोजमेरी केनेडी या चळवळीमागील प्रेरणास्थान होत्या. त्या राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी आणि युनिस केनेडी श्रायव्हर यांच्या भगिनी होत्या. रोजमेरी या बौद्धिक अक्षम होत्या. युनिस केनेडी श्रायव्हर यांनी बौद्धिक दिव्यांग व्यक्तींसाठी काम करण्यास सुरुवात केली. जुलै १९६८ मध्ये पहिल्या आंतरराष्ट्रीय स्पेशल ऑलिम्पिस खेळांचे आयोजन शिकागो, इलिनॉय, अमेरिका येथे करण्यात आले. त्यात हे सिद्ध झाले की, बौद्धिक दिव्यांग-अक्षम मुले उत्कृष्ट खेळाडू ठरू शकतात आणि खेळांच्या माध्यमातून ते प्रगती करू शकतात. स्पेशल ऑलिम्पिक ही संस्था जगभरातील बौद्धिक दिव्यांगांना खेळण्याची संधी, स्पर्धेत सहभागी होण्याची संधी व प्रगती करण्याची संधी देईल, असे निश्चित केले.
आज हीच चळवळ ‘स्पेशल ऑलिम्पिस आंतरराष्ट्रीय’ म्हणून उभी आहे. त्यात सध्या २०० देशांमध्ये ६० लाखांहून अधिक बौद्धिक दिव्यांग व्यक्तींचा समावेश आहे. त्यांना विकासाची संधी दिली जाते. आज ‘स्पेशल ऑलिम्पिक’ दरवर्षी ३० हून अधिक ऑलिम्पिक-प्रकारच्या खेळांचे प्रशिक्षण व एक लाखांहून अधिक स्पर्धा आयोजित करते. खेळ, आरोग्य, शिक्षण आणि नेतृत्वाच्या माध्यमातून बौद्धिक दिव्यांगांविरुद्धच्या भेदभावाला समाप्त करून त्यांना सशक्त बनविण्यास कटिबद्ध आहे.
सध्या डॉ. टिम श्रायव्हर हे ‘स्पेशल ऑलिम्पिस, आंतरराष्ट्रीय’चे अध्यक्ष आहेत, तर डॉ. मल्लिका नड्डा या ‘स्पेशल ऑलिम्पिस, भारत’च्या अध्यक्ष आहेत.
शारीरिक दिव्यांगत्व आणि बौद्धिक दिव्यांगत्व
- बौद्धिक दिव्यांग ते (intellectually disable) संदर्भातील रूढ समजुतींमध्ये बदल होणे गरजेचे आहे. शारीरिक दिव्यांगांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने व वैद्यकीय उपचारांद्वारे सर्वसामान्य व्यक्तींच्या बरोबरीचा दर्जा त्यांना प्राप्त होऊ शकतो. भारतात अशी अनेक उदाहरणे आहेत. परंतु, दिव्यांग, बौद्धिक दिव्यांगासाठी अशा प्रकारची कोणतीही उपलब्धता नाही. त्यांची बौद्धिक क्षमता एका मर्यादेपर्यंत वाढवता येणे शय आहे; पण त्यांचा व्यक्ती म्हणून विकास खेळाद्वारे आणि मनोरंजनाद्वारे होऊ शकतो. त्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत. त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी काही कौशल्य प्रशिक्षण आपण देऊ शकतो. त्यासंबंधात अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे, जेणेकरुन राष्ट्रीय विकास प्रक्रियेत सहभागी होण्याचे समाधान त्यांनाही मिळेल.
‘स्पेशल ऑलिम्पिक भारता’चे उद्दिष्ट बौद्धिक दिव्यांगांचा विकास करणे, समाजात सन्मान मिळवून देणे, हीच प्राथमिकता आहे.
ऑलिम्पिस, पॅरालिम्पिस व स्पेशल ऑलिम्पिस
ऑलिम्पिस व पॅरालिम्पिस या वेगवेगळ्या संस्थांच्या ताब्यात असल्या, तरी दशकांपासून त्यांचे आयोजन एकाच यजमान शहरात व त्याच वर्षी केले जाते. पॅरालिम्पिस खेळाडूंना ठराविक पात्रता निकष व गुणवत्तापूर्ण मानक पूर्ण करणे आवश्यक असते. ‘स्पेशल ऑलिम्पिस’ खालील तीन बाबतीत वेगळे आहे :
अ) संस्थात्मक रचना, आ) खेळाडूंच्या अपंगत्वाच्या गटांचे स्वरूप इ) सहभागाचे निकष व तत्त्वज्ञान. ‘स्पेशल ऑलिम्पिस’ वर्षभर प्रशिक्षण व स्पर्धा पुरविते, तसेच दर दोन वर्षांनी जागतिक खेळांचे आयोजन केले जाते. (उन्हाळी व हिवाळी असे आलटून-पालटून). ‘स्पेशल ऑलिम्पिस’मध्ये सर्व बौद्धिक दिव्यांग खेळाडूंना-कोणत्याही क्षमतास्तरावर, वयवर्षे आठपासून लिंगभेद न करता सहभागी होण्याची संधी मिळते. ‘स्पेशल ऑलिम्पिस’चे ध्येय खेळांच्या माध्यमातून सामाजिक समावेश साधणे आहे.
युनिफाईड स्पोर्ट्स
या उपक्रमाद्वारे बौद्धिक दिव्यांग आणि सामान्य व्यक्तींना एकाच संघात एकत्र आणले जाते. ‘युनिफाईड स्पोर्ट्स’मध्ये खेळाडू वय व क्षमतेनुसार संघबद्ध होतात. त्यामुळे सराव अधिक आनंददायी होतो व सामने अधिक आव्हानात्मक आणि रोचक होतात.
राष्ट्रीय जलतरण स्पर्धा - २०२
राष्ट्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालय (MYAS) तसेच ‘भारतीय क्रीडा प्राधिकरण’ (SAI) यांच्या मान्यतेने ही संस्था कार्य करते. ‘स्पेशल ऑलिम्पिस भारत’तर्फे राष्ट्रीय जलतरण स्पर्धा पहिल्यांदाच महाराष्ट्रात आयोजित केली गेली. दि. ६ ऑगस्ट रोजी उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला. पदसंचालन, क्रीडा ज्योत प्रकटीकरण शपथग्रहण आदी कार्यक्रम शिस्तबद्ध रितीने पार पडले. ज्येष्ठ नेता आणि ’SOB’चे पालक डॉ. किरीट सोमय्या यांचे मार्गदर्शन-प्रोत्साहन मिळाले. त्यासाठी २२ राज्यांतून ११० बौद्धिक अक्षम जलतरणपटूंनी सहभाग घेतला. ही स्पर्धा पाहण्यासाठी मुंबई महानगर पालिकेच्या १९ विशेष शाळांतील तसेच मुंबईतील २७ शासकीय विशेष शाळांतील बौद्धिक अक्षम विद्यार्थी आले होते. यावेळी राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत फ्री-स्टाईल, बॅक स्ट्रोक, बटरफ्लाय, रिले यांसारख्या विविध प्रकारांचा समावेश होता. यामध्ये अॅथलिट्सनी सुवर्ण २२, रौप्य २१, तर २० कांस्यपदकांची कमाई केली.
दि. ६ ऑगस्ट रोजी स्पेशल ‘ऑलिम्पिक भारत, महाराष्ट्र’तर्फे दोन दिवस चाललेला नॅशनल जलतरण स्पर्धेचा रोमहर्षक थरार पार पडला. त्याच्या बक्षीस समारंभासाठी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. अतुल सावे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विभागमंत्री, तसेच डॉ. मल्लिका नड्डा, राष्ट्रीय अध्यक्ष स्पेशल ऑलिम्पिक इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यपाल महोदयांनी ‘स्पेशल ऑलिम्पिस’च्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेचे तोंड भरून कौतुक केले. तसेच, लागेल ती मदत देण्याची तयारी दर्शवली. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांबरोबर सामंजस्य करार करून तेथील सर्व सुविधा ‘स्पेशल ऑलिम्पिसच्या विशेष-बौद्धिक अक्षम मुलांसाठी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
‘स्पेशल ऑलिम्पिस महाराष्ट्रा’समोरील आव्हाने आणि समाधान
दिव्यांगांसाठीच्या ज्या स्पर्धा तालुका स्तरापासून ते राज्यस्तरावर दरवर्षी घेण्यात येतात, त्यात बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ‘स्पेशल ऑलिम्पिस’ स्पर्धांनुसार निकष ठेवावेत, ज्यायोगे त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्येसुद्धा सहभागी होता येईल. सध्या तसे होत नाही, त्यामुळे बौद्धिक दिव्यांग-अक्षम वंचित राहात आहेत, ही बाब गंभीर आहे.
‘राष्ट्रीय क्रीडा धोरणा’नुसार महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण सुधारित केलेले नाही. त्यामुळे दिव्यांग विभागाचे साहाय्य सरकारची इच्छा असूनही मिळत नाही. हे तातडीने होणे गरजेचे आहे. ते तत्काळ करावे. तसेच ‘राष्ट्रीय क्रीडा धोरणा’नुसार ज्या विद्यार्थ्यांना ऑलिम्पिसमध्ये यश मिळाले आहे, त्यांना सरकारतर्फे ठराविक रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येते, ती रक्कम महाराष्ट्रात उपलब्ध करून द्यावी.
तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा की, या बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग मुलांना सामाजिक सुरक्षिततेच्या न्यायानुसार ठराविक रक्कम पेन्शन या स्वरूपात देण्यात यावी. त्याचा निकष वयवर्षे ३० असावा. त्यांना आर्थिक मिळकतीचा कोणताही मार्ग उपलब्ध नसल्यामुळे, त्यांचा भार उचलणे हे त्यांच्या कुटुंबीयांना सहजपणे शय होईल. अशी तरतूद गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश आदी राज्यांत लागू आहे, ती महाराष्ट्र राज्यातही लागू व्हावी. या लेखाद्वारे जाणीव जागृती होऊन बौद्धिक दिव्यांग-अक्षम व्यक्तीवरील अन्याय दूर होईल; ते राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात सामील होऊ शकतील, याची खात्री वाटते.
मेधा सोमय्या
(मेधा सोमय्या लेखिका आणि समाजशास्त्रज्ञ असून गेली २५ वर्षे बौद्धिक अक्षम व्यक्तींसाठी कार्यरत आहेत व ‘स्पेशल ऑलिम्पिस भारत’च्या ‘महाराष्ट्र चॅप्टर’च्या अध्यक्षा आहेत.)
९८६९०६७०७०