वेदिका ब्राम्हण महिला मंडळ भीशीच्या माध्यमातून महिलांचे एकत्रीकरण

    11-Jun-2025   
Total Views |
 
Vedika Brahmin Mahila Mandal Bhishi
 
भिशीचे फायदे अनेक असले, तरी भिशीच्या माध्यमातून महिलांचे एकत्रीकरण आणि त्याद्वारे पुढे सामाजिक कार्य उभे राहिल्याचे आपण क्वचितच ऐकले असेल. मनमाडमधील ‘वेदिका ब्राह्मण महिला मंडळ’ भिशीच्या माध्यमातून शेकडो महिलांना एकत्र करून सामाजिक आणि धार्मिक कार्यात आपला सक्रिय सहभाग नोंदवत आहे. केवळ पैसा हे उद्दिष्ट न ठेवता, महिलांनी एकत्र येऊन सामाजिक, धार्मिक कार्यात सहभागी व्हावे, तसेच एकमेकांशी संवाद वाढावा, हे या मंडळाचे उद्दिष्ट आहे. जाणून घेऊया, मनमाडमधील नोंदणी नसतानाही सर्वदूर प्रसिद्धीस पावलेल्या या अनोख्या महिला मंडळाविषयी...
 
भीशी हा प्रकार काही तसा नवीन नाही. कित्येक वर्षांपासून हा प्रकार छोट्या छोट्या बचतीसाठी महत्त्वाचा ठरत आहे. अनेकांच्या अडीअडचणीच्या काळात तर भिशीनेच अनेकांना तारल्याचे आपल्या कानांवर पडले असेल. भिशीमध्ये सहभागी होणारे सदस्य प्रत्येक महिन्याला एक ठरलेली रक्कम जमा करतात. ही रक्कम एकाच ठिकाणी जमा होते आणि मग ती एका सदस्याला दिली जाते. त्यानंतर, दुसर्‍या महिन्यापासून दुसरा सदस्य पैसे घेतो आणि अशा प्रकारे सगळे सदस्य आळीपाळीने पैसे घेतात. भिशीचे फायदे अनेक असले, तरी भिशीच्या माध्यमातून महिलांचे एकत्रीकरण आणि त्याद्वारे पुढे सामाजिक कार्य उभे राहिल्याचे आपण क्वचितच ऐकले असेल. मात्र, मनमाड शहरामधील ‘वेदिका ब्राह्मण महिला मंडळा’ने भिशीच्या माध्यमातून आतापर्यंत शेकडो महिलांना एकत्र करून सामाजिक आणि धार्मिक कार्यात आपला सहभाग नोंदवला आहे. या महिला मंडळाच्या स्थापनेमागील कथाही तितकीच रंजक आहे.
 
प्रारंभी मनमाड शहरात सून म्हणून आलेल्या महिला एकमेकींना ओळखत नव्हत्या. कुणाचाही कुणाशी परिचय नाही. त्यामुळे महिलांनी एकत्र येण्याच्या उद्देशाने सर्वप्रथम 2006 साली भिशी सुरू करण्यात आली. सुरेखा गरूड, शोभना निंभोरकर आणि प्रभावती भुसारी यांच्या पुढाकाराने 100 रुपये महिनाप्रमाणे भिशी सुरू करण्यात आली. मंडळाला ‘वेदिका ब्राह्मण महिला मंडळ’ असे नाव देण्यात आले. पहिल्याच बैठकीत पैसा हे उद्दिष्ट नाही, तर एकत्र येऊन एकमेकांमधील संवाद वाढविणे, हे मंडळाचे उद्दिष्ट असल्याचे निश्चित करण्यात आले. भिशी हे फक्त एकत्र येण्यासाठीचे माध्यम होते. सुरुवातीला मंडळात 25 ते 30 महिला होत्या. मंडळासाठी वार्षिक वर्गणी घेण्यास सुरुवात झाली. यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी अगदी छोटेखानी हळदीकुंकू समारंभ घेण्यात आला. मंडळात महिलांची संख्या दरवर्षी वाढत राहिली. चैत्र गौरीचा हळदीकुंकू समारंभ घेण्यास सुरुवात केली. कोजागिरीच्या दिवशी सर्वांनी एकत्र येत गाण्याच्या भेंड्या, विविध कलांचे सादरीकरण केले जाऊ लागले. मंडळाच्या सर्व सदस्या दर चतुर्थीला श्री गणपती अथर्वशीर्ष पठण आणि नवरात्रोत्सवात श्रीसुक्ताचे पठण करतात. गुढीपाडव्याच्या दिवशी शोभायात्रा काढली जाऊ लागली. त्याचप्रमाणे, गुढीपाडव्यापासून ते श्री रामनवमीपर्यंत श्रीरामरक्षा स्तोत्राचे पठण सर्व एकत्र येऊन करतात. मार्च महिन्यात महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. हे सर्व उपक्रम मंडळाच्या सदस्यांच्या घरीच आयोजित केले जातात. यासाठी सदस्यांना कार्यक्रम त्यांच्या घरी घेण्यासाठी आधीच नोंदणी करावी लागते.
 
पुढे 2013 साली ‘गौराई महिला मंडळा’ची स्थापना करण्यात आली. दरवर्षी मुलांच्या शाळा सुरू झाल्या की, मग मंगळागौरीच्या सरावाला सुरुवात केली जाते. 2024 साली ‘गौराई महिला मंडळा’ला तब्बल आठ ठिकाणी मंगळागौर सादरीकरणासाठी बोलावण्यात आले होते. मंडळाच्या एका सदस्याच्या घरीच सराव केला जातो. मंगळागौरीमध्ये फुगड्यांचे विविध प्रकार, गोफ, झिम्मा अशा विविध पारंपरिक प्रकारांचा समावेश असतो. कानबाई महोत्सवासाठीही ‘गौराई महिला मंडळा’ला आमंत्रित करण्यात येते. मंगळागौर संघामध्ये सध्या 16 ते 17 महिला सक्रिय आहेत.
 
अनेक महिलांना गीत लिहिण्याचा किंवा गायनाचा छंद असतो. अशा महिलांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने पुढे ‘वेदिका भजनी मंडळा’चीही स्थापना करण्यात आली. या मंडळाअंतर्गत दर आठवड्यातून एकदा सराव केला जातो. यात विविध गाणी बसविली जातात. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांनिमित्त भजनी मंडळाला बोलावले जाते. मागील काही वर्षांपासून मनमाड शहरातील गांधी चौकातून परशुराम जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढली जाते. श्री रामरक्षापठणाने या मिरवणुकीची सांगता केली जाते. स्वा. सावरकर आत्मार्पण दिन आणि ‘सावरकर जयंतीदेखील मंडळा’तर्फे उत्साहात साजरी केली जाते. अयोध्येतील प्रभु श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेआधी मंडळातील महिलांनी 15 ते 20 दिवस घरोघरी जाऊन निधी संकलित केला होता. त्याचप्रमाणे, अक्षतांचे वाटपदेखील घरोघरी करण्यात आले.
 
कोरोना काळाआधी सटाण्यातील दिव्यांग निवासी आश्रमात धान्य देण्यात आले. मंडळातील सदस्य महिलेवर अचानक दुःखाचा डोंगर कोसळल्यास तिला आर्थिक मदत मिळावी, याकरिता मदतनिधी संकलित केला जातो. श्री रामनवमी, दत्तजयंतीला ‘वेदिका भजनी मंडळा’ला भजनाकरिता बोलावले जाते. पिंपळगाव जलाल येथे 300 वर्षे जुन्या राम मंदिरात मागील दोन वर्षांपासून भजनासाठी मंडळाला आमंत्रित केले जाते. कुणाच्या घरी मयत झाल्यास मंडळाकडून पहिला डबा त्या घरी पोहोचविला जातो.
भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी करून पाकिस्तानला धडा शिकविला. त्यानिमित्त मंडळातर्फे भारतीय सैन्याचे मनोबल वाढविण्यासाठी व अभिनंदन करण्यासाठी रॅली काढण्यात आली. मनमाडमधील पाणीप्रश्नीही महिलांनी वेळोवेळी आवाज उठविला. सध्या मंडळाच्या 150 हून अधिक सदस्या आहेत. पुढील पिढीलाही या कार्यात कसे सहभागी करता येईल आणि त्यांनाही या कार्यात कसे सामावून घेता येऊ शकते, यासाठीही मंडळ प्रयत्नशील आहे. नोंदणी नसतानाही भिशी हे निमित्त ठेवून महिलांचे एकत्रीकरण घडवून आणणार्‍या मनमाड शहरातील या अनोख्या महिला मंडळाला आगामी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा...
 
वेदिका समूह उद्योग महोत्सव
 
मंडळातील अनेक महिला घरघुती उद्योग सुरू करून स्वयंपूर्ण होत आहेत. मंडळाच्या सदस्यांना आपल्या उत्पादनांची विक्री करता यावी, तसेच त्यांना त्याकरिता व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी मागील काही वर्षांपासून ‘वेदिका मंडळा’ने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार ‘वेदिका उद्योग समूहा’तर्फे भव्य उद्योग महोत्सव आयोजित केला जातो. महिला दिनाचे औचित्य साधून या खाद्य महोत्सव तथा गृहोद्योग मेळाव्याचे आयोजन इंडियन हायस्कूल, लोकमान्य हॉल येथे करण्यात येते. या महोत्सवात वेदिका उद्योजिकांकडून उत्तम प्रकारचे विविध स्टॉल्स लावले जातात. या महोत्सवात उद्योजिकांना तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन केले जाते.
 
पर्यावरण संवर्धनासाठी मंडळाचा पुढाकार
 
मंडळातर्फे पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहेत. सदस्य महिला पावसाळ्यात मोकळ्या जागेत बिया फेकतात. वृक्षरोपणाचा उपक्रमही राबविला जातो. जुन्या काळात घरात काही कागदपत्रे साठविण्यासाठी तारेचा वापर केला जायचा. तारेला सगळी कागदपत्रे किंवा लग्नपत्रिका अडकवल्या जात होत्या. त्याच धर्तीवर मंडळाने तारांचे वितरण केले आहे. त्या तारेला घरातील सर्व प्लास्टिक अडकवून ठेवायचे आणि तार भरली की त्याचे संकलन केले जाते. त्यानंतर ते विकास काकडे यांच्याद्वारे नाशिकला पुनर्वापरासाठी पाठवले जाते. भाजी घेण्यासाठीही घरातूनच कापडी पिशवी घेऊन बाहेर पडण्यासाठी आवाहन केले जाते. बाजारातून प्लास्टिक हद्दपार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मंडळातील सदस्य महिला घरात शाडूच्या गणेशमूर्तीची स्थापना करण्यास प्राधान्य देतात. तसेच मूर्तीचे घरीच विसर्जन केले जाते.
 
 

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.