मुंबई : आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पनांतर आता वांद्रे रेक्लेमेशनमधील २४ एकर जागेत व्यवसाय केंद्र उभारणीसाठी अदानी रिअल्टीने निविदाप्रक्रियेत बाजी मारली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाच्या जागेत हे व्यवसाय केंद्र आणि निवास स्थाने उभारले जाणार असल्याची माहिती मिळते आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ(एमएसआरडीसी)ने माहीम खाडीसमोर आणि सी लिंक ॲप्रोच रोडच्या बाजूने प्राइम लँड पार्सलसाठी निविदा मागवल्या होत्या. ज्यामध्ये कास्टिंग यार्ड आणि एमएसआरडीसी कार्यालयाचा समावेश आहे. हा भूखंड विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली २०३४अंतर्गत व्यावसायिक आणि निवासी वापरासाठी दिला गेला आहे. या जागेची किंमत ₹३०,००० कोटी असल्याचा अंदाज आहे. लँड पार्सलचे संभाव्य विकास क्षेत्र ४५ लाख चौरस फूट आहे. अदानी रियल्टी ही लार्सन अँड टुब्रोला मागे टाकत मुंबईतील २४ एकर भूखंडाच्या पुनर्विकासासाठी सर्वाधिक बोली लावणारी कंपनी ठरली आहे. अदानी, एल अँड टी आणि मेफेअर हाऊसिंग ही तिसरी बोली लावणारी होती. अनेक विकासकांनी प्री-बिड मीटिंगमध्ये भाग घेतला होता, परंतु ₹१५,००० कोटींच्या निव्वळ किमतीच्या कठोर पात्रता निकषांमुळे शर्यतीत फक्त तीनच विकसक राहिले.
निविदेतील अटींनुसार, पायाभूत सुविधा प्रकल्पांना निधी देण्यासाठी या प्रक्रियेतून किमान ८,००० कोटी रुपयांचा महसूल मिळवण्याचे एमएसआरडीसीचे उद्दिष्ट आहे. पहिल्या टप्प्यात विजयी बोलीदार विकासासाठी एमएसआरडीसीची ६ ते ७ एकर जमीन घेईल. यासाठी बोलीदाराला एमएसआरडीसीच्या कार्यालयाचे स्थलांतर करावे लागेल आणि त्यांना सध्याच्या कार्यालयाच्या पाच किलोमीटरच्या परिघात पूर्ण सुसज्ज ५०,००० चौरस फूट कार्यालय उपलब्ध करून द्यावे लागेल.