औपचारिक घोषणा बाकी; आज घेणार पद आणि गोपनियतेची शपथ
08-Dec-2024
Total Views | 51
मुंबई : विधिमंडळ राजकारणाच्या इतिहासात सर्वात चर्चेत राहिलेला चेहरा म्हणजे राहुल नार्वेकर. ते पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी ( Assembly Speaker ) विराजमान होणार आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नामांकन दाखल करावयाच्या मुदतीत एकमेव अर्ज आल्याने, त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा बाकी आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विधिमंडळ सदस्य ॲड. राहुल नार्वेकर यांनी रविवार, दि. ८ डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी विधिमंडळ सदस्य तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीकरिता रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. या मुदतीत केवळ राहुल नार्वेकर यांचा अर्ज दाखल झाला. तोकड्या संख्याबळाअभावी महाविकास आघाडीने या निवडणुकीत उमेदवार देण्याचे धाडस केले नाही. त्यामुळे नार्वेकर यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. सोमवार, दि. ९ डिसेंबर रोजी याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे. त्यानंतर त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली जाईल.
विरोधी पक्षनेतेपदासाठी 'मविआ'च्या पायघड्या
महाविकास आघाडीतील एकाही घटक पक्षाकडे विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी अपेक्षित संख्याबळ नाही. त्यामुळे यावेळेस हे पद रिक्त राहण्याची दाट शक्यता आहे. मात्र, निवडणूक पूर्व आघाडीत लढलेली 'मविआ' एकत्रितरित्या हा आकडा पूर्ण करित असल्यामुळे विरोधी पक्षनेतेपद आपल्याला देण्यात यावे, अशा पायघड्या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून घातल्या जात आहेत. रविवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि उबाठाचे गटनेते भास्कर जाधव यांनी या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्याचप्रमाणे विधानसभा उपाध्यक्ष पदही महाविकास आघाडीला मिळावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. याबाबतचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांकडे असतो. त्यामुळे मविआच्या दोन्ही मागण्यांबाबत काय निर्णय घेतला जातो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
सल्लागार समितीची आज बैठक
विधानसभा आणि विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक सोमवार, दि. ९ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. दोन्ही सभागृहांचे कामकाज संपल्यावर ही बैठक होईल. नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचे वेळापत्रक या बैठकीत ठरवले जाणार आहे.