मुंबई : मुंबईतील कोविड रुग्णसंख्येत काही प्रमाणात वाढ होत असली, तरी घाबरण्याची गरज नाही. मात्र, ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा गंभीर स्वरूपाचे आजार आहेत, त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मास्क वापरणे गरजेचे असल्याचे मत कोविडविषयक आढावा बैठकीत तज्ज्ञांनी व्यक्त केले. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, दि. २ जून रोजी ही बैठक संपन्न झाली.
मुंबईतील मान्सूनपूर्व कामांच्या आढाव्यासाठी शेलार यांनी ‘एमएमआरडीए’ कार्यालयात जाऊन आढावा बैठक घेतली. या बैठकीला एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त विक्रम कुमार, अश्विन मुदगल, आस्तिककुमार पांडे, महा मेट्रोच्या संचालिका रुबल अग्रवाल, यांच्या सह मुंबई महापालिका आणि संबंधित प्राधिकरणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एमएमआरडीए व मेट्रो प्रकल्पाच्या बैठकीनंतर, त्याच ठिकाणी राज्याचे आरोग्य खाते, मुंबई महापालिका व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र कोविड आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत सध्याची रुग्णसंख्या, उपचार व्यवस्था, आरोग्य सुविधा आणि लसीकरणाबाबत चर्चा झाली.
“रुग्णसंख्या वाढत असली, तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. ज्यांना मधुमेह, बीपी किंवा अन्य गंभीर आजार आहेत त्यांनी मास्क वापरावा. गरज पडल्यास लसीकरणाची प्रक्रिया पुन्हा राबवण्यासह अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवर केंद्र सरकारच्या यंत्रणांसोबत राज्य सरकारचा सतत संपर्क सुरु असून त्यानुसार आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे”, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
मेट्रो प्रकल्पांसाठी आपत्कालीन योजना
या बैठकीत मेट्रो प्रकल्पांसाठी पावसाळी तयारीचा आढावा घेण्यात आला. पालकमंत्री शेलार यांनी अंधेरी, घाटकोपरसारख्या गर्दीच्या मेट्रो स्थानकांवर आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी योजना तयार करण्याचे आदेश दिले. मुंबई महापालिका आणि बेस्ट यांचीही त्यात भूमिका असणार आहे. शेलार यांनी सर्व यंत्रणांना एकत्र काम करण्याचे आवाहन केले आणि दोषारोप टाळून समन्वयाने काम करण्याचा सल्ला दिला.
बैठकीत काय ठरले?
· भूमिगत मेट्रो स्थानकांमध्ये वायफाय सेवा सुरु करण्याचे निर्देश
प्रत्येक प्रकल्पासाठी २४x७ आपत्कालीन मदत केंद्र कार्यरत
१९ ठिकाणी रुग्णवाहिका, १०७ ठिकाणी पंप, ११४ किमी बॅरिकेट्स हटवले
खड्डे बुजवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तैनात