मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासूनच सैनिकी प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच देशभक्ती, शिस्त, व्यायामाची सवय आणि संघटितपणाची भावना रुजविणे हा आहे.
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या निर्णयाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, मुलांमध्ये देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा, शिस्त, व्यायाम आणि संघटितपणाची भावना रुजविण्यासाठी राज्यातील शाळांमध्ये मुलांना लष्करी प्रशिक्षण दिले जाईल, यासाठी निवृत्त सैनिकांची मदत घेतली जाईल. या प्रशिक्षणासाठी राज्यातील २.५ लाख माजी सैनिकांची मदत घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर, क्रीडा शिक्षक, राष्ट्रीय कॅडेट कोर (एनसीसी), स्काऊट्स आणि गाईड्स यांचाही सहभाग असणार आहे. प्रशिक्षण महिन्याच्या शेवटच्या शनिवारी दिले जाईल.
हेतू काय?
- शालेय शिक्षण आणि माजी सैनिक कल्याण विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा, स्वतःच्या शरीराची काळजी घेणे, व्यायाम आणि शिस्त असे चांगले गुण विकसित होतील, असा विश्वास मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला.
- राज्यभरातील शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने ही योजना राबवली जाणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, धैर्य आणि नेतृत्वगुण वाढण्यास मदत होईल, असे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.
- या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शाळांमध्ये शिक्षणाच्या क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि शिस्त जोपासण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.