जैन समाजाच्या विकासाचा नवीन अध्याय सुरू : मंत्री मंगल प्रभात लोढा

    02-Jun-2025
Total Views | 11
A new chapter in the development of Jain society has begun

मुंबई : “जैन समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक सशक्तीकरणाच्या दिशेने शासन कार्य करीत आहे. जैन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार आहे,” असे कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

मुंबई शहरातील मल्होत्रा हाऊस इमारतीत ‘जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळा’चे कार्यालय सुरू करण्यात आले. या कार्यालयाचे उद्घाटन कौशल्य विकासमंत्री लोढा यांच्या हस्ते आणि ‘राष्ट्रीय अल्पसंख्याक आर्थिक महामंडळ’ अध्यक्षा आभा सिंह यांच्या उपस्थितीत झाले.

मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, “जैन समाजाच्या विकास आणि उत्थानासाठी शासन कटिबद्ध आहे. महामंडळाच्या सुयोग्य आणि प्रभावी संचालनासाठी आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता करण्यात येईल.” महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी महामंडळाचे कार्य विशद केले. त्यांनी 26 जिल्ह्यांचा दौरा करत 22 जिल्हा कार्यालयांचे उद्घाटन केले. या दौर्‍यांदरम्यान जैन समाजासाठी महामंडळाच्या विविध योजनांच्या प्रसार आणि प्रचारासाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले, असल्याचे त्यांनी सांगितले.

महामंडळासाठी केंद्राच्या माध्यमातून पुरेसा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे राष्ट्रीय अल्पसंख्याक आर्थिक महामंडळ अध्यक्षा आभा राणी सिंह यांनी सांगितले. सरकारच्या विविध महामंडळांमध्ये जैन महामंडळाची स्वतंत्र व विशेष ओळख निर्माण करणे; तसेच समाजामध्ये विविध सरकारी योजनांबाबत जनजागृती निर्माण करणे, हा एक सातत्यपूर्ण आणि यशस्वी प्रयत्न महामंडळामार्फत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

समारंभास महामंडळाचे उपाध्यक्ष मीतेश नहाटा, समन्वयक संदीप भंडारी, जवाहरभाई शाह, हितेश मोता, व्यवस्थापकीय संचालक जी.पी मकदूम, पंजाबी अकादमीचे अध्यक्ष बल मलकत सिंह, विकास आच्छा यांच्यासह जैन समाजातील मान्यवर उपस्थित होते.

'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121