मुंबई बँकेच्या संचालकपदी तेजस्विनी घोसाळकर सद्नभावनेने निर्णय घेतल्याची दरेकरांची माहिती

    20-Jun-2025
Total Views |

मुंबई - मुंबई बँकेचे संचालक अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यूनंतर संचालक पदाची जागा रिक्त होती. आता त्या जागेवर त्यांच्या पत्नी तेजस्वि घोसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती भाजपा गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांनी आज पत्रकार परिषदेतून दिली. तसेच तेजस्विनी घोसाळकर यांच्या नियुक्तीचा निर्णय हा सद्नभावनेने घेण्यात आला असल्याचेही दरेकर म्हणाले.

पत्रकार परिषदेत बोलताना प्रविण दरेकर यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानाचीही चिरफाड केली. दरेकर म्हणाले कि, मुळात मराठी माणूस, मराठी मतदार हा केवळ त्यांच्याकडेच आहे या भ्रमातून त्यांनी बाहेर यावे. राज्यात भाजपाला सत्तेत आल्यावर मोठ्या प्रमाणात जनाधार मिळाला. भाजपाला मिळालेला जनाधार हा पाकिस्तानी नाही तर ९० टक्के मराठी माणसाने दिला. मुंबईत गेल्यावेळी ८४-८५ च्या आसपास जागा निवडून आल्या. तो भाजपाला मतदान करणारा मराठी माणूसच होता. मराठीच्या नावावर राजकारण करायला गेलात तर लोकांना तुमच्याविषयीं विश्वास राहिलेला नाही. त्याचवेळी देवेंद्र फडणवीस राज्याचे नेतृत्व करत असताना मराठी माणसांचा पूर्ण विश्वास त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा,मराठीचा आणि हिंदुत्वाचा विचार सोबत नेला ज्याला उद्धव ठाकरेंनी तिलांजली दिली. त्यामुळे मराठी माणूस स्वभाविकपणे महायुतीच्याच मागे उभा आहे यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. मराठी माणसासाठी काहींनी घोषणा, वलगना केल्या आम्ही कृती केली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे काम देवेंद्र फडणवीसांच्या पुढाकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले याची जाणीवही मराठी माणसाला निश्चितपणे असल्याचे दरेकर म्हणाले.

ते पुढे म्हणाले कि, बाळासाहेब ठाकरे यांचा ब्रँड होता. दुर्दैवाने उद्धव ठाकरे यांना टिकवता आला नाही. बाळासाहेबांच्या विचारांचा ब्रँड एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेला आहे. त्यातच आम्ही आमचा हिंदुत्ववादी पक्ष शिंदे यांच्यासोबत असल्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचा ब्रँडही आमच्यासोबत आहे. तसेच राजकारणात यश अपयश येत असते. परंतु बाळासाहेबांनी स्थापन केलेला एवढा मोठा पक्ष त्याचे नेतृत्व एवढे हतबल दिसून येते त्यावरुनच त्यांच्यात लढायची ताकद असल्याचे दिसत नाही. हेच त्यांच्या भविष्यासाठी वाईट असल्याचा टोलाही दरेकरांनी उबाठा पक्षाला लगावला.

संजय राऊत यांच्या विधानावर बोलताना दरेकर म्हणाले कि, बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड काल होता आजही आहे आणि उद्याही आहे. परंतु तो वैचारिक ब्रँड दुर्दैवाने उद्धव ठाकरेंना जपता आला नाही. तसेच उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजिबात घेत नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आयुष्यात बेरजेचे राजकारण केलेय. उद्धव-राज यांनी एकत्र यावे किंवा येऊ नये हे अमित शहा ठरवणार नाहीत. त्यांना दखल घेण्याची आवश्यकताही वाटत नसल्याचेही दरेकर म्हणाले.