केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा कान्हेरी गुंफा येथे योगाभ्यास!

    21-Jun-2025
Total Views |



मुंबई : जागतिक योग दिनाच्या निमित्ताने केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी शनिवार, २१ जून रोजी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात असलेल्या कान्हेरी लेण्यांमध्ये मुंबईकर नागरिकांसह योगाभ्यास केला.

यावेळी भाजप नेते प्रवीण दरेकर, माजी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार संजय उपाध्याय, जिल्हाध्यक्ष दिपक (बाळा)तावडे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अधिकारी अनिता पाटील आणि रेवती कुलकर्णी, गणेश खणकर, अमर शहा, नीला सोनी, नगरसेवक, भाजप पदाधिकारी यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. यावेळी थेट दिल्लीवरून पंतप्रधान मोदी यांच्यासोबत उपस्थित नागरिकांनी योगासन केले.


केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, "योगाबद्दल जागतिक जागरूकता पसरवण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. भगवान बुद्धांचे जीवन आणि शिकवण दर्शविणाऱ्या कान्हेरी येथे ध्यान आणि योग करताना मला जाणवले की, आंतरिक शांती ही प्रगतीचे मूळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात जगभरात प्रत्येक घरघरांत योग पोहोचला आहे. आज, जगाच्या कानाकोपऱ्यात योगाचा अवलंब केला जात आहे. आपण योगाबद्दल जागरूकता पसरवली पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीला प्रोत्साहन दिले पाहिजे. भारताकडे असलेली ताकद आणि संस्कृतीतून भारत देश आज संपूर्ण जगाला एका नव्या उंचीवर नेण्याचे ग्रोथ इंजिन बनला आहे. संपूर्ण जगाची नजर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतावर आहे," असे ते म्हणाले.

त्यानंतर मंत्री गोयल यांनी आमदार योगेश सागर यांच्यासोबत चारकोप येथील स्ट्रीट योहा चारकोप स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन येथे, आमदार संजय उपाध्याय यांच्यासोबत बोरिवलीतील कोरा केंद्र मैदानावर, माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासोबत पोईसर जिमखान्यात तर आमदार मनीषा चौधरी यांच्यासमवेत दहिसर पश्चिम येथील लोकनेता गोपीनाथ मुंडे स्टेडियमवर योगाभ्यास केला.