प्राध्यापक गजेन्द्र देवडा यांना “डिजिटल युगात दूरचित्रवाणी बातम्यांच्या सादरीकरणातील बदल” या विषयावर पीएच.डी. पदवी
03-Jun-2025
Total Views |
मुबंई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने प्राध्यापक गजेन्द्र देवडा यांना "डिजिटल युगात दूरचित्रवाणी बातम्यांच्या सादरीकरणातील बदल" या विषयावर पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे.
या संशोधनात डिजिटल माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे दूरचित्रवाणी बातम्यांच्या स्वरूपात, सादरीकरणाच्या शैलीत आणि प्रसारण पद्धतीत झालेल्या बदलांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. प्रेक्षकांच्या बदलत्या अपेक्षा, नवतंत्रज्ञान आणि सोशल मीडियाच्या उदयामुळे पारंपरिक दूरचित्रवाणी बातम्यांवर कसा प्रभाव पडतो आहे, याचे विश्लेषण या प्रबंधात करण्यात आले आहे.
प्राध्यापक देवडा यांनी हे संशोधन ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ आणि माजी कुलगुरू डॉ. विजय धारूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. प्राध्यापक देवडा सध्या विलेपार्लेतील साठये महाविद्यालयातील जनसंवाद विभागाचे प्रमुख असून मुंबई विद्यापीठाच्या जनसंवाद आणि पत्रकारिता अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आहेत.मुंबई आकाशवाणी केंद्रासाठी निवेदक म्हणून आणि भारत सरकारच्या पत्र सूचना कार्यालयासाठी भाषांतर कार म्हणून सुद्धा ते अंशकालिक तत्वावर कार्य करतात. माध्यम क्षेत्रातील तज्ज्ञ आणि शैक्षणिक वर्तुळात या संशोधनाचे स्वागत होत असून, याला अत्यंत समयोचित व अभ्यासपूर्ण योगदान मानले जात आहे.