मुंबई : महाराष्ट्रात सध्या आढळणाऱ्या सर्व कोरोनाबाधितांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. राज्यात जानेवारी २०२५ पासून १२ हजार ११ कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्यात ८७३ रुग्ण बाधित आढळले. यापैकी ३६९ रुग्ण बरे झाले असून, सध्या सक्रिय रुग्णसंख्या ४९४ इतकी आहे. मुंबईत या काळात ४८३ रुग्णांची नोंद झाली आहे.
सध्या राज्यात कोविड रुग्णसंख्या तुलनेने कमी असून, निदान झालेल्या सर्व रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. तथापि, जानेवारीपासून आतापर्यंत सहव्याधीने ग्रस्त असलेल्या १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे, ज्यात कर्करोग, ब्रेन स्ट्रोक, मधुमेह यांसारखे गंभीर आजार असलेल्या रुग्णांचा समावेश आहे. राज्यात कोविडसंबंधी आयएलआय (इन्फ्लूएंझा सारखा आजार) आणि एसएआरआय (तीव्र श्वसन संसर्ग) यांचा नियमित सर्वेक्षण चालू असून, पॉझिटिव्ह नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पुणे आणि इतर प्रयोगशाळांमध्ये पाठवले जात आहेत. जिल्हा आणि स्थानिक आरोग्य अधिकारी कोविडसाठी रुग्णालये सुसज्ज ठेवण्याचे आदेश देत असून, आरटीपीसीआर चाचणी, ऑक्सिजन बेड, आयसीयू व व्हेंटिलेटर उपलब्धतेबाबत पूर्ण तयारी ठेवण्यास सांगितले आहे.
व्याधीग्रस्तांनी काळजी घ्यावी
- गर्दी टाळा, खोकताना व शिंकताना रूमाल वापरा, आणि सर्दी, ताप, खोकला, धाप लागणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयांशी संपर्क साधावा. नागरिकांनी घाबरून न जाता सावधगिरी बाळगावी, विशेषतः आजारी व व्याधीग्रस्त लोकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
- महाराष्ट्रातील कोविडसंबंधी परिस्थिती सध्या नियंत्रणात असून सौम्य स्वरूपाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शासनाने योग्य ती तयारी केली असून, नागरिकांनी काळजी घेऊन नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.