मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (New York Banner) 'बांगलादेशात हिंदूंवरील हिंसाचार थांबले पाहिजेत' अशा आशयाचा एक बॅनर शुक्रवारी सकाळी अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये आकाशात फडकताना दिसला. हा बॅनर एका विमानाच्या मागे बांधला असून तो हडसन नदीवर आणि जगप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ लिबर्टीनजीक फडकताना पाहायला मिळाले. याचे आयोजक बांगलादेश वंशाच्या हिंदू समुदायातील सितांशु गुहा यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. बांगलादेशी हिंदूंच्या समस्यांबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हे बॅनर झळकवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
हे वाचलंत का? : संघटित आणि शिस्तबद्ध सामाजिक शक्ती निर्माण करणे शताब्दी वर्षाचे मूळ ध्येय!
बांगलादेशातील हिंदू नरसंहार हे दुसऱ्या महायुद्धानंतरचे दुसरे सर्वात मोठे हत्याकांड आहे. अमेरिकन सरकारला बांगलादेश सरकारवर हिंदू समुदायावरील हिंसाचार थांबवण्यासाठी दबाव आणण्याचे आवाहन केले. बांगलादेशातील कट्टरतावादी शक्तींचा उदय हा चिंतेचा विषय असून त्यामुळे भारतालाही धोका निर्माण झाला आहे. असे म्हणत, बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचार थांबेपर्यंत बांगलादेशी कपड्यांवर बहिष्कार घालण्याचे आवाहनही आयोजकांनी अमेरिकन लोकांना केले.
बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद यूनुस हे नुकतेच अमेरिका दौऱ्यावर होते. तेव्हा न्यूयॉर्कमध्ये त्यांना प्रचंड विरोधाला सामोरे जावे लागले. बांगलादेशात अल्पसंख्याकांवर होत असलेल्या कथित हल्ल्यांवरून आंदोलकांनी युनूसच्या विरोधात घोषणाबाजीही केली. मोहम्मद युनूस गलिच्छ राजकारण खेळून सत्तेत आल्याचा आरोप आंदोलकांकडून यावेळी करण्यात आला होता. त्यानंतर हे बॅनर प्रकरण समोर आले आहे.