मुंबई : अजित पवार यांनी २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्याला शरद पवार यांची परवानगी होती, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवार, दि. २५ जानेवारी रोजी केला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर त्यांची उलटसाक्ष नोंदविण्यात आली.
राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी गुरुवारी विधानभवनात झालेल्या सुनावणीला खा. शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यासह अजित पवार गटाकडून सुनील तटकरे आणि प्रतोद अनिल पाटील उपस्थित होते. शरद पवार गटाकडून अॅड. शरण जेथयानी, तर अजित पवार गटाकडून अॅड. विरेंद्र तुळजापूर यांनी युक्तीवाद केला. २३ नोव्हेंबर २०१९ रोजी अजित पवार यांना पक्षनेतृत्वाने शपथ घेण्यासाठी मान्यता दिली होती का, असा सवाल जेथयानी यांनी केला. त्यावर, हो असे उत्तर सुनील तटकरे यांनी दिले.
शरद पवार काही जणांचे ऐकतात आणि मनमानी पद्धतीने कारभार करतात. त्यामुळे पक्षात असंतोष निर्माण झाल्याने आम्ही वेगळा निर्णय घेतला, असे सुनील तटकरे यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. हा पक्षांतर्गत असंतोष किती काळ चालला, असा सवाल शरद पवार गटाच्या वकिलांनी केला. त्यावर, २०१४ पासून असंतोषाला सुरूवात झाली. २०१९ च्या निवडणूक निकालानंतर त्यात खूपच वाढ झाली, असेही सुनील तटकरे यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निदर्शानास आणून दिले.